आर्यन चित्रमंदिर हे पुण्यातील पहिले चित्रपटगृह. ७ फेब्रुवारी १९१५ रोजी गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी लोकरंजनाचे नवीन साधन म्हणून ‘आर्यन’ चित्रपटगृहाची स्थापना केली. त्याचे संस्थापक होते, गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक. ते चित्रपटगृह महात्मा फुले मंडई परिसरात लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर होते. महापालिकेने ते २२ सप्टेंबर १९८३ रोजी पाडले व तेथे पार्किंग स्टँड उभारले. कारण ती जागा महापालिकेची होती. त्याचा शतकमहोत्सवी समारंभ बापुसाहेबांचे चिरंजीव आनंदराव पाठक यांनी पुण्यातील फिल्म अर्काईव्हजच्या दालनात साजरा केला.
‘आर्यन’ १९१५ साली सुरू झाले, तेव्हा तेथे मूकपट दाखवले जात होते. मूकपटांतील दृश्यात जिवंतपणा यावा यासाठी पडद्यामागे बाजाची पेटी, तबला, घोड्याच्या पळतानाच्या टापांचा आवाज वाटावा म्हणून नारळाच्या रिकाम्या करवंट्या वाजवल्या जात. पेटी, तबला वाजवण्याचे काम करणाऱ्या मुलांमध्ये राजा परांजपे यांचा समावेश होता. पुढे ते विख्यात दिग्दर्शक झाले.
पुण्यात पहिले चित्रगृह उभारणाऱ्या व पहिला मूकपट ‘डायमंड रिंग’, पहिला भारतीय बोलपट ‘आलम आरा’, पहिला मराठी बोलपट ‘संत तुकाराम अर्थात जय हरि विठ्ठल’. ‘संत तुकाराम’ आर्यनमध्ये दाखवणाऱ्या गंगाधरपंतांचे स्मरणही केले जात नाही, त्याबद्दल आनंदरावांनी दु: ख व्यक्त केले. सिनेमा म्हणजे काय, अशी उत्सुकता असणाऱ्या प्रोजेक्टरद्वारे चालतीबोलती चित्रे दाखवून ‘आर्यन‘ चित्रपटगृहाने लोकरंजनाचा इतिहास निर्माण केला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारा ‘आर्यन’मध्ये आपण स्वत: अनेक मूकपट व बोलपट पाहिले आहेत असे सांगितले.
महात्मा फुले मंडईत स्थापन झालेल्या त्या चित्रपटगृहाने मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळात सिंहाचा वाटा उचलला; तसेच अनेक मराठी चित्रपटांचे रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव व हीरकमहोत्सव साजरे केले. ते चित्रपटगृह मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी आधारवडच होते. ७ फेब्रुवारी १९२० रोजी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला होता.
‘आर्यन’ला पन्नास वर्षें पूर्ण झाली तेव्हा सुवर्णमहोत्सवी समारंभ झोकात साजरा झाला होता. महापौर बी.डी. किल्लेदार समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. दैनिक ‘सकाळ’चे संपादक ना.भि. परुळेकर हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते अरुण सरनाईक, अनंत माने आदी कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
‘आर्यन’ चित्रगृहास प्रथमपासून भेट देणाऱ्यामध्ये लोकमान्य टिळक, रँग्लर परांजपे, ना.ह. आपटे, वसंतदादा पाटील, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, जयंतराव टिळक, इंदुताई टिळक, काकासाहेब गाडगीळ, मा. विठ्ठल, हिराबाई बडोदेकर, ग.दि. माडगुळकर, दादा कोंडके, उषा चव्हाण, जयश्री गडकर आदींचा समावेश आहे.
आचार्य अत्रे यांनी लिहिलेला ब्रम्हचारी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यावर ‘आर्यन’मध्ये त्याने पन्नास आठवडे पूर्ण केले. तो विक्रमच आहे. ‘एक गाव, बारा भानगडी’ (92 आठवडे), ‘केला इशारा जाता जाता’ (75 आठवडे), ‘सवाल माझा ऐका’ (45 आठवडे), ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ (60 आठवडे), ‘एकटा जीव सदाशिव’ (25 आठवडे), ‘गनिमी कावा’ (23 आठवडे), ‘मोलकरीण’ (25 आठवडे) असे लोकप्रिय चित्रपट तेथे दाखवले गेले. हिंदी ‘बेटीबेटे’, ‘मैं चूप रहूंगी’ हे चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले.
बापुसाहेब पाठक यांनी पुण्यानंतर सांगली, सोलापूर, बडोदा, पाचगणी येथे तेथील पहिली चित्रपटगृहे सुरू केली. ‘आर्यन’ हे खरे चित्रमंदिरच होते. तेथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा होत असे. मंडईतील फळभाजी विक्रेते रात्री तेथे चित्रपट पाहण्यास येत. मिरर स्क्रीन येथे आला, तेव्हा महामहोपाध्याय द.वा. पोतदार उद्घाटनास आले होते. राज कपूर, शत्रुघ्न सिन्हा यांनीही ‘आर्यन’च्या समारंभात भाग घेतला होता.
बापुसाहेब पाठक यांचे ६ ऑक्टोबर १९७० रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव आनंदराव व बाबूराव यांनी व्यवस्था पाहिली.
पुणेकरांच्या आठवणींत आणि इतिहासात विशेष स्था्न मिळवलेले ते चित्रपटगृह काही वर्षांनंतर प्रेक्षकांपासून दूरावले. ‘आर्यन’ची जागा महापालिकेकडून भाडे कराराने घेण्यात आली होती. त्यांनी चित्रपटगृहाला टप्प्याटप्प्याने मुदतवाढ दिली; परंतु त्यानंतर मुदतवाढ द्यायची नाही, असा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला. चित्रपटगृह वाचवण्यासाठी आनंद पाठक यांनी तत्कालीन महापौर, आयुक्तांपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेकांशी पत्रव्यवहार केला. परंतु उपयोग झाला नाही. अखेर चित्रपट क्षेत्रातील ती ऐतिहासिक वास्तू २२ सप्टेंबर १९८३ रोजी जमीनदोस्त करण्यात आली.
चित्रपटगृहाच्या शताब्दीनिमित्त आनंद पाठक यांनी ‘आर्यन’च्या आठवणींना उजाळा देणारे खास कॅलेंडर तयार केले. त्यानिमित्ताने चित्रपटगृहावर आधारित लघुपटही तयार करण्यात आला.
— संजय दिनकर/ थिंक महाराष्ट्र.
संकलन: संजीव वेलणकर.
छायाचित्र सौजन्य: SAHAPEDIA/ANIL ZANKAR.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply