डेव्हलपर त्याच्या डोक्यावरील भार लवकरात लवकर उतरवायला उत्सुक असतो. तर कधी दिलेली आश्वासनं बिल्डरने पूर्ण करत नाही तोपर्यत काही सदस्य संस्थेचा ताबा घेण्यास तयार नसतात. काही संस्थेचे सदस्य आणि बिल्डर याचे वाद कोर्टात प्रलंबित असतात. तर अनेक सदस्यांना प्रश्न असतो, संस्था नोदणी झाली… पुढे काय? नविन संस्था एक इमारत १५० ते २०० त्याहून अधिक सदस्य असल्याने कामाचे स्वरूप सुद्धा वेगळे आणि वाढले आहे. अनेक प्रकारचे करार तपासावे लागतात. तेव्हा अशा स्वरूपाच्या कामाची माहिती असलेला कायदेतज्ञ यांच्या सल्ल्याने कारभार केल्यास सदस्याचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदतच होईल. आजच्या भागात पहिल्या सर्वसाधारण सभेची माहिती आपल्यासाठी.
प्रश्न क्र. ९१) संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा कधी, कोण आणि कोणत्या नियमाप्रमाणे घेण्यात येते?
उत्तर: संस्थेच्या नोंदणी अर्जावर सह्या करणाऱ्या प्रवर्तकांची (Promoter) पहिली सर्वसाधारण सभा नियम ५९ खाली तरतूद करण्यात आल्याप्रमाणे संस्थेची नोंदणी करण्यात आल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत घेण्यात येते. ठरलेल्या मुदतीत संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याची जबाबदारी मुख्य प्रवर्तकाची (Chief Promoter) राहील.
प्रश्न क्र. ९२) संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्यात मुख्य प्रवर्तकाने कसूर केल्यास सदर सभा कोण बोलावण्याची व्यवस्था करील?
उत्तर: ठरलेल्या मुदतीत पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्यात मुख्य प्रवर्तकाकडून कसूर केल्यास नोंदणी अधिकारी ती सभा बोलविण्याची व्यवस्था करील.
प्रश्न क्र. ९३) संस्थेची पहिली सर्वसाधारण सभेसाठी किती दिवसांची नोटीस दयावी लागते ? सदर नोटीस कोणास देणे अपेक्षित असते आणि सदर नोटीस काढण्याची जबाबदारी कोणाची असते?
उत्तर: संस्थेचा मुख्य प्रवर्तक किंवा यथास्थिति नोंदणी अधिकाऱ्याने प्राधिकृत केलेला अधिकारी, नोंदणी अर्जावर सह्या करणाऱ्या सर्व प्रवर्तकांना पहिली सर्वसाधारण सभेसाठी १४ पूर्ण दिवसांची नोटीस देईल.
प्रश्न क्र. ९४) संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत कोणती कामे केली जातात?
उत्तर:
१) सभेसाठी अध्यक्षांची निवड करणे.
२) प्रवर्तकाव्यतिरिक्त ज्यांनी संस्थेच्या सदस्यत्वासाठी अर्ज केले आहेत अशा नवीन सदस्यांना दाखल करून घेणे.
३) संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने, पहिल्या सर्वसाधारण सभेच्या दिनांकापूर्वी १४ दिवसापर्यंतच्या कालावधीसाठी म्हणजे नोटीशीच्या दिनांकास असल्याप्रमाणे तयार केलेल्या लेख्यांचे विवरणपत्र स्वीकारणे व त्यास मंजुरी देणे.
४) संस्थेच्या उपविधीअधीन संस्थेची नियमित निवडणूक होईपर्यंतच्या कालावधीसाठी हंगामी समिती स्थापना करणे. समितीस अधिनियम, नियम व उपविधी यानुसार निवडण्यात आलेल्या समितीस जे अधिकार व कार्याधिकार असतील तेच सर्व अधिकार व कार्याधिकार राहतील.
५) बाहेरून उभारावयाच्या निधीची निश्चिती करणे.
६) मुख्य प्रवर्तकाकडून (बांधकाम व्यावसायी) संस्थेच्या नावे मालमत्तेतील हक्क, मालकी हक्क व हितसंबंध हस्तांतरित करून घेण्याकरीता समितीकडे अधिकार सुपूर्द करणे.
७) गरज असल्यास त्या वर्षाकरिता अंतर्गत लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्याचे परिश्रमीक ठरविणे.
८) हंगामी समितीच्या कोणत्याही एका सदस्यास हंगामी समितीची पहिली सभा बोलविण्याचे अधिकार देणे.
९) जिल्ह्याच्या असलेल्या गृहनिर्माण संघाचा व उपविधी क्र. ६ मध्ये नमूद केलेल्या इतर संस्थांचा सदस्य म्हणून संलग्न होण्याबद्दल विचार करणे.
१०) जे विषय कार्यक्रम पत्रिकेवर घेण्यासाठी योग्य नोटीस देणे आवश्यक आहे ते खेरीज करून अध्यक्षांचे परवानगीने अन्य कोणतेही विषय सभेसमोर ठेवणे. (सदनिका खरेदीदारांसाठीच्या संस्थाकरिता पुढील अतिरिक्त तरतुदी लागू आहेत)
११) बांधकाम प्रकल्पाच्या अंतिम योजनेच्या आर्थिक व प्रत्यक्ष विविध बाजूच्या संदर्भात किती बांधकाम झाले आणि किती व्हावयाचे आहे यासंबंधात आढावा घेणे आणि सोसायटीच्या मुख्य प्रवर्तकाचा अहवाल मंजूर करणे.
१२) संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने विक्रेत्या बरोबर संस्थेसाठी भूखंड/इमारत खरेदी करण्याबाबत केलेल्या कराराला मान्यता देणे.
१३) बांधकामाच्या जागेचे नियोजन आणि बांधकामाची योजना मंजूर करणे.
१४) संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने, वास्तूशास्त्रज्ञांची नियुक्ती केलेल्या त्या नियुक्तीला मान्यता देणे किंवा अशी नियुक्ती झालेली नसेल तर वास्तूशास्त्रज्ञाची नियुक्ती करणे किंवा अगोदर नियुक्त करण्यात आलेल्या वास्तुशास्त्राच्या जागी नवीन वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती करणे.
१५) हंगामी समिती आणि सचिव यांची नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी करणे. (Provisional/Nominated Committee)
प्रश्न क्र. ९५) संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त यावर कोण स्वाक्षरी करील?
उत्तर: जी व्यक्ती पहिल्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान भूषवेल ती व्यक्ती सभेचे इतिवृत्त लिहिल व त्यावर स्वाक्षरी करील.
– अॅड. विशाल लांजेकर.
Leave a Reply