१९ मार्च १९७९ साली लेखक-दिग्दर्शक सतीश आळेकर यांच्या बेगमबर्वे या नाटकाचा पहिला प्रयोग श्रीराम सेंटर नवी दिल्ली येथे झाला होता.
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर हे भारतीय रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव!
आळेकरांच्या महानिर्वाण, मिकी आणि मेम साहेब, महापूर, बेगम-बर्वे अशा अनेक नाटकांनी मराठी प्रायोगिक रंगभूमीवर नवीन प्रवाह निर्माण केला.
पहिल्या प्रयोगाला बरोब्बर ४३ वर्षं पूर्ण झाली. एकोणीसशे एकोणऐंशी साली लिहिलेले हे नाटक ‘फँटास्टिक पॅरोडी’ या प्रकारात मोडते. त्यावेळी त्या नाटकाचे म्हणावे तसे उदार स्वागत सर्वसामान्य मराठी नाट्यरसिकांनी केले नाही याचे एक मुख्य कारण म्हणजे त्यात असणारे स्त्रीसदृष पुरुषाचे लैगिक अंगाने चित्रण हे असावे. जगभरातील अनेक नाट्यसमिक्षकांनी या नाट्यसंहितेबद्दल प्रशंसोद्गार काढले असले तरी तब्बल तीस वर्षांपूर्वी हे चित्रण तसे सभ्य नाटक या प्रकारात मोडणारे नव्हतेच!
बेगम बर्वे (१९७९) हे अनेकार्थांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय नाटक आहे. सामान्यतः एकत्र वा विभक्त कुटुंबातील व्यक्तींचे परस्परसंबंध व त्यातून उत्पन्न होणारे ताणतणाव मराठीतील अनेक नाटकांच्या केंद्रस्थानी असतात. या नाटकात योजून चार व्यक्तिरेखा आहेत. त्यांचे एकमेकांशी रक्ताचे नाते नाही. अनाम पण दृढ भावबंधांनी या व्यक्ती परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत असेही दिसत नाही. नाटकात रूढ अर्थाने नायक-नायिका नाहीत. चौघांपैकी जावडेकर, बावडेकर व शामराव हे तिघेजण मध्यमवयीन पुरुष आहेत. बर्वे बाह्यत: पुरुष आहे परंतु अंतर्यामी तो स्त्रीचे जीवन जगतो. चौघेही कनिष्ठ मध्यमवर्गीय अविवाहीत व कुटुंबविरहीत आहेत. शामरावचा अपवाद वगळता इतर तिघांना नाटककाराने नावे दिलेली नाहीत. ही पात्रे देखील ‘व्यक्ती’ म्हणून आपण कोण आहोत हे अधूनमधून विसरतात. वास्तव जगातून अकस्मात कल्पनाविश्वात, वेगळ्याच भूमिकांत शिरतात. पात्रयोजनेतील या गुंतागुंतीमुळे त्यांच्या भूमिकांतरामुळे व वास्तव आणि आभास यांच्यात सरमिसळ झाल्याने येथे नाट्यांतर्गत नाट्य निर्माण होते. ते वाचकाला/प्रेक्षकाला चक्रावून टाकते. बघायला चार घटका बरे वाटेल, मनाला रिझरवेल आणि प्रयत्न न करता सहज उमजेल असे हे नाटक नाही.
संहितेची वीण बहुपेडी असल्याने ‘बेगमबर्वे’ चा नाट्यानुभव साधा, सरळ व एकपदरी न राहता अनेकपदरी व अर्थबहुल होतो. ‘गोरा रंग आणि काळेभोर लांबसडक केस’ असलेला बर्वे खरे तर कमनशिबी आहे. राजस रूप आणि गोड, गाता गळा लाभूनही नाटक मंडळीत गॅसबत्त्या पुसणे, पडदे ओढणे आणि अडीअडचणीला स्त्री पार्टी नटाची कसर भरून काढणे. त्यातही हळदीकुंकवाच्या सीनमध्ये नायिकेच्या अनेक मैत्रिणीतील एक बनून रंगभूमीवर थोडा वेळ का होईना पण वावरणे बर्वेच्या वाट्याला येते. या उपेक्षेची त्याला खंत वाटते. गंधर्व कंपनीत जाऊन सुभद्रा, रुक्मिणी, वसुंधरा यांच्या भूमिका कराव्यात, झगमगत्या प्रकाशात यावे ही त्याची उत्कट इच्छा कधीही अंशत: देखील पूर्ण होत नाही. भोवतालचे कोणीही त्याच्या असण्याची साधी दखलसुद्धा घेत नाही की त्याच्या मनाची पर्वा करीत नाही. ‘पडद्यामागच्या अंधारात ढकलल्या गेलेल्या बर्वेच्या ठिकाणी त्यातून बाहेर पडण्याचे व स्वत:ला प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य नाही. तो स्त्रैण आणि दुबळा आहे. त्यात संगीत नाटकांच्या जोरावर एकेकाळी वैभव उपभोगलेला मालक वाईट दिवस आल्यावर कंपनी मोडीत काढतो. दिवाळे निघाल्यावर बर्वेसारख्या य:काश्चित नोकराला जड, अचेतन वस्तूचीच अवकळा येते. घन:श्याम आणि वृंदावन या निर्दय व कुटील खलनायकांचा वारसा सांगणाऱ्या नाटकमंडळींच्या पदरी टांगेवाला असलेल्या भणंग शामरावाची नजर विंगेत केस वाळवत उभ्या असलेल्या बर्वेवर जाते. तो मागणी करतो आणि मालक बर्वेला देऊन टाकतो. ऐटीत टांग्यात बसण्याचा मोह बर्वेलाही आवरत नाही. पण तो रूबाबही टिकत नाही. घोडी मेल्याने टांगा निरुपयोगी ठरतो. उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या घोडीचे ‘बेगम’ हे संबोधन बर्वेच्या मागे लागते, जन्मभर ते त्याचा पिच्छा पुरवते. जिन्याखाली टीचभर जागेत शामरावच्या आधाराने राहणारा बर्वे उदबत्त्या विकून कमाई करतो. त्या पैशातून अविचारी व नीच शामरावाला पोसतो. घेतो शामराव दारू पितो, जुगार खेळतो, नको नको ते नाद, छंद लावून घेत आणि एका पायाने अधू असतो तरी मिजाशीत राहातो घोडी मरून गेल्यावर चाबकाचे फटके ओढायला आणि तो निमूटपणे सहन करायला त्याला बर्वेच्या रूपाने हक्काचे माणूस मिळते. घोडीप्रमाणे बर्वेही त्याच्या मालकीचा आहे. बायकी बर्वे ही गुलामी पत्करतो. कारण मर्दानी शामरावच्या सहवासातून त्याला सुख मिळते. दिवस बर्वेचा असला तरी रात्र आपली आहे. हे धूर्त व कावेबाज शामरावने पुरेपूर ओळखले आहे, म्हणून दारिद्र्याने गांजलेला आणि पांगळा असला तरी शामराव येता-जाता बर्वेवर डाफरतो, त्याला फैलावर घेतो, वेठीस धरतो. भैंचोद, भाडखाऊ, भडव्या अशी शिवराळ भाषा बोलतो. कधी त्याचा हात पिरगळतो, कधी त्याच्या खाड्कन मुस्कटात ठेवून देतो तरी बर्वे त्याची अरेरावी मुकाट्याने सोसत राहातो. याचे आणखी एक कारण आहे. शामरावची कृष्णछाया झाकोळून टाकणारी असली तरी बर्वेच्या स्वप्नांवर ती अतिक्रमण करू शकत नाही. स्वप्नसृष्टी बर्वेला जणू वशच आहे. इतका तो गतकाळाच्या रम्य स्मृतींनी वारंवार हरखून व हरवून जातो. एक प्रकारच्या धुंदीत राहतो. वर्तमानात तो क्वचितच आणि अपरिहार्यपणे जगतो एरवी त्याचे भावविश्व संगीत नाटकाच्या सुरेल, सुंदर स्मृतींनी भरून गेले आहे. अण्णासाहेबांचं सौभद्र, त्यातल्या सुभद्रेच्या भूमिकेतील साक्षात नारायणराव तर त्याच्या नजरेसमोर तरळतातच, पण त्याप्रसंगी भोवती पेटलेल्या झिरमिळ्यांच्या बत्त्या, स्टेजवर कनौजी अत्तराचा सुटलेला घमघमाट आणि मखमल – सॅटिनचा मुलायम स्पर्श – हे सारे भारलेले वातावरण त्याला आताही जसेच्या तसे जाणवते.
मराठी रंगभूमीवर आपल्या अविस्मरणीय गाण्याने आणि अभिनयाने युग निर्माण केलेल्या नारायणरावांच्या (हे संबोधनसुद्धा आत्मीयतेचे व प्रेमाचे द्योतक आहे.) काळाचा तो एक साक्षीदार आहे, एवढेच नव्हे तर त्याच्याही आयुष्यात योगायोगाने एक भाग्याचा क्षण त्यावेळेस येऊन गेला आहे. नारायणरावांनी हाती घेतलेला शेला बर्वेच्या खांद्यावर जातो तेव्हा त्या शेल्याला धस लागलेला असला तरी तो त्याला कवचकुंडलांइतका संरक्षक व मायेची ऊब देणारा वाटतो. बालगंधर्वांचा हस्तस्पर्श झालेला हा शेला बर्वेने जिवापाड जपून ठेवला आहे. शेल्याप्रमाणे ऑर्गनच्या स्वर्गीय सूरांनी त्याच्या मनावर घातलेली मोहिनीही तिळमात्र कमी होत नाही. हे पडदे, ह्या दोन्या, हा नेपथ्याचा वास म्हणजे ह्या नटेश्वराचा गाभारा… आणि ह्या गाभाऱ्याचा पंचप्राण म्हणजे ऑर्गनचा सूर देवा! या सूरांच्या साथीने आणि घराला घरपण, देवाला देवपण देणाऱ्या, कंपनीच्या मालकाला सुखी ठेवणाऱ्या – नव्हे अवघे जगच सुगंधित करणाऱ्या उदबत्त्यांच्या सोबतीने बर्वेचे दिवस मंतरलेले होतात. दाहक वास्तव सुसह्य होते. मानीव विश्वासाचा खेळ असे जे नाटकाचे एक मुख्य लक्षण सांगितले जाते त्याचे प्रभावी प्रत्यंतर प्रस्तुत नाटकातून येते. आदि, मध्य व अंत या क्रमाने खटकेबाज संवादातून उलगडत जाणारी गोष्ट येथे नाही. सुसूत्र संविधानकाचा सरळ रेषेत एका दिशेने होणारा विकासही या नाटकात आढळत नाही. आभास व वास्तव यांच्या सरमिसळीतून आणि भूमिकांच्या अदलाबदलीतून जे नाट्य उत्पन्न होते ते ठाव घेते प्रेक्षकांच्या मनाचा. सुरुवातीपासून नाटककार आणि प्रेक्षक यांच्या परस्पर संमतीने हा खेळ नट/पात्रे खेळतात. खेळाचे नियम पाळतात अथवा मोडतात त्यामागेही नाटककाराची काही एक निश्चित धारणा आहे. ती नसती तर बेगम हे मुस्लीम संबोधन आणि बर्वे हे खास कोकणस्थ (चित्पावन) आडनाव यांचे अगम्य मिश्रण असलेल्या शीर्षकापासून नाटक पटले नसते. पात्रे ज्या भूमिका निभावतात (शामराव / सूत्रधार / बंगल्यावरचा माणूस बर्वे / नलावडेबाई) त्या तद्दन कृत्रिम व ओढून-ताणून आणल्यासारख्या वाटल्या असत्या. बर्वेच्या तोंडी असलेल्या नाट्यपदांना भावपोषक वातावरणनिर्मिती करणे आणि ताण हलका होण्यासाठी विरंगुळा देणे यापलीकडे अर्थ उरला नसता आणि मुख्य म्हणजे भूमिकांच्या अदलाबदलीमुळे व आभास वास्तव यांच्या सरमिसळीने निर्माण होणारे नाट्यकृतक झाले असते. तसे ते होत नाही याचे कारण नाट्यांतर्गत तर्कसंगती आळेकरांना उत्तम साधली आहे आणि नाट्यतंत्रावर/रचनेवर त्यांची विलक्षण पकड आहे हे खरेच आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे नाटककाराला मानवी अस्तित्वात अंतर्भूत असलेला संघर्ष आणि ‘मानवी स्थिती’तले कंटाळवाणे पण येथे मूर्त करावयाचे आहे. त्यासाठी ‘स्वप्नांचा आणि विषादयुक्त विनोदाचा आश्रय घेतल्यावाचून गत्यंतर नाही. नाटकातील पात्रांना स्वप्नांच्या दुनियेत मोकाट भ्रमंती कराविशी वाटते. कारण दिवास्वप्ने पाहाण्यात पात्रांचा निदान वेळ जातो, वास्तव सुसह्य होते. परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे नेणिवेत चाललेल्या घडामोडी स्वप्नात उसळी मारून साकार होतात. त्यातून माणसांच्या मनोव्यापाराचा थांग लावता येतो. त्यांच्या अंतर्विश्वापर्यंत पोचता येते. माणसांच्या पृष्ठस्तरीय दर्शनी अस्तित्वात लावत View किंवा कृतीत नाटककाराला रस नाही कारण व्यक्तीचे जागृत मन सावध असते. समाजमान्य संकेत व शिस्त पाळून कमी-अधिक प्रयत्नांनी व्यक्ती जाणीवपूर्वक शहाणपणा आत्मसात करते. अंत:प्रेरणा दाबून-दडपून ‘कळपातला एक’ होऊन जगते. मन मारावे लागते, अंधाऱ्या कोपऱ्यांवर माती लोटावी लागते. कारण बऱ्याचदा अंत:प्रेरणांना अनुसरले तर ‘अंधारात उडी’ घेण्यावाचून, समाजाचा विरोध पत्करण्यावाचून इलाज राहात नाही. याची अर्थातच भीती वाटते म्हणून बहुतेक माणसे गर्दीला शरण जातात किंवा त्यांना ठाकूनठोकून ठाशीव चौकटीत इतरांकडून बसवले/कोंबले जाते. एरवी बांधलेली माणसे ‘स्वप्ना’तच स्वैर विहार करू शकतात. स्वप्नांना सहसा दुसऱ्याची नजर लागत नाही. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. म्हणून मुक्त प्रतिभेचा अविष्कार सह… कारणाने आळेकरांना ‘आभासविश्वा’चे आकर्षण वाटत असावे. स्वप्नांमुळे मानवी अस्तित्वाला, त्याच्या जगण्याला एक प्रयोजन मिळते. अंतर्यामी पोकळ असलेले जावडेकर-बावडेकरसुद्धा स्वप्नांमध्ये अनिर्बधच नव्हे तर त्यांच्या परीने समृद्ध जगतात. (बर्वे याअर्थाने मुळातच भरीव आहे. नको इतक्या आठवणींनी त्याचे भावविश्व भरून गेले आहे.) सामान्य माणसाच्या या जगण्याचा, त्यामधील अर्थपूर्णतेचा शोध सहानुभूतीपूर्वक व सहृदयतेने आळेकरांना घ्यावासा वाटतो.
या नाटकाचे मराठीत ७९ पासून जेमतेम ५०-६० प्रयोगच झाले. पुढे हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मल्याळम् भाषेतही प्रयोग झाले. नाटकावर भरपूर समीक्षा लिहून आली. थोडाफार गाजावाजा वाटय़ाला आला. पण या नाटकाचे प्रयोग मात्र फारसे झाले नाहीत. सदर प्रयोगात श्यामरावाची भूमिका डॉ. मोहन आगाशे यांनी, बेगमची श्री. चंद्रकांत काळे यांनी, बावडेकरांची श्री. रमेश मेढेकर यांनी तर जावडेकरांची स्वतः सतीश आळेकरांनी केली होती. नाटकातील जुन्या नाटय़- संगीताचं संयोजन केलं होते ऑर्गनवादक राजीव परांजपे यांनी.
https://www.youtube.com/watch?v=BvaqiuDadqo
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ: ‘बेगम बर्वे’ या नाटकाचे पुस्तक.
पुणे.
Leave a Reply