१९७८ साली थिएटर ॲकॅडमीने पु. ल. देशपांडे यांच्या तीन पैशाचा तमाशा या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे रात्रौ ९.३० वाजता केला होता. डॉ. जब्बार पटेल यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते.
विसाव्या शतकातला श्रेष्ठ जर्मन नाटककार, दिग्दर्शक, संगीतज्ञ, कवी आणि तत्त्वचिंतक बटरेल्ट ब्रेश्ट याच्या ‘द थ्री पेनी ऑपेरा’ या मूळ जर्मन नाटकाचं केलेलं स्वैर रूपांतर म्हणजे ‘तीन पैशांचा तमाशा’ हे नाटक.
‘तीन पैशाचा तमाशा’ च्या बद्दल पु. लं. नी आपल्या ‘तीन पैशाचा तमाशा’ या पुस्तकात लिहिलेली प्रस्तावना.
जर्मन नाटककार ब्रेश्टच्या ‘थ्री पेनी ऑपेरा’ ह्या नाटकावरून मी हा ‘तीन पैशाचा तमाशा’ रचला आहे. ब्रेश्टच्या नाटकांचे रचनेच्या दृष्टीने मराठी तमाशाशी जवळचे नाते आहे. ब्रेश्टने रंगभूमीला लोकशिक्षणाचे साधन मानले. नाटकी रम्यवादातून मुक्त केले; पण मनोरंजनाशी नाते तोडले नाही. संगीत, नृत्य, विनोद अशा नाटकाच्या रंजकतेत भर घालणार्याी घटकांचे वैचारिक गांभीर्याच्या नावाखाली उच्चाटन केले नाही.
नाटककार, दिग्दर्शक, कवी, संगीतज्ञ आणि तत्त्वचिंतक ब्रेश्ट हा मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाला होता. उपाशीपोटी नीती, संस्कृती वगैरे परवडत नाहीत हे त्याला पक्के उमजले होते. मार्क्स म्हटले की, काही लोकांच्या मनात उगीचच किल्मिषे निर्माण होतात. त्यांना लगेच प्रचारकी साहित्य, बोधवाद वगैरेची आठवण होते. ललित साहित्यातून बोध झालाच पाहिजे आणि बोध होताच कामा नये अशा दोन टोकांच्या भूमिकांवरून वाद चालू असतात. कमकुवत प्रतिभेच्या लेखकाच्या कृतीतल्या बोध आणि कला दोन्ही कमकुवत प्रतिभेचा माणूसच शिक्षण आणि रंजन यांतला समतोल राखू शकतो.
जीवनात कला जो आनंद किंवा उल्हास निर्माण करतात त्याला ब्रेश्टने कधीही गौण मानले नाही. नाटकाला त्याने ‘खेळ’च मानले. “No matter how fearful the problems they handle, plays should always be playful.” हे त्याचे उद्गार ध्यानात घेण्यासारखे आहेत. आणि असा हा खेळकरपणा त्याच्या सर्व नाट्यकृतींतून दिसतो. ब्रेश्ट कवी होता. नाजुकतेचे व सुंदरतेचे त्यालाही आकर्षण होते. पण त्याला ‘मेजाशी खेचून लेखनाला प्रवृत्त करीत होती’ ती मात्र माणसांच्या दुनियेत सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी चालणारी अमानुषता. त्यातून निर्माण होणार्याय दु:खाविषयीची सहानुभूती ही त्याची मूळ प्रवृत्ती. ‘थ्री पेनी ऑपेरा’ ही त्याच्या ह्या मूळ प्रवृत्तीतून उभी राहिलेली नाट्यकृती आहे. समाजातल्या उपेक्षित आणि काही प्रमाणात अभागी अशा जीवांची कथा त्याने आपल्या खास नाट्यशैलीला अनुसरून हसवीत, गाणी गात, भेदक थट्टा करीत सांगितली आहे.
पूर्व बर्लिनमधल्या ‘बेर्लिनेर आंसांब्ल’ ह्या ब्रेश्टने उभारलेल्या नाटक मंडळीने त्यांच्या थिएटरात केलेल्या त्याच्या नाटकांचे काही प्रयोग पाहण्याची मला संधी लाभली. रंगभूमीसाठी आयुष्य वाहणारे कलावंत स्त्रीपुरूष त्या नाट्यगृहात साऱ्या जगातल्या नाट्यप्रेमी स्त्रीपुरूषांना मंत्रमुग्ध करीत असतात. त्या रंगमंदिराचा आणि कलावंतांचा आर्थिक भार त्यांचे सरकार वाहत असते. तसले पाठबळ नसूनही पुण्यातल्या थिएटर ॲकॅडमीतल्या माझ्या कलाप्रेमी मित्रमैत्रिणींनी हा ‘तीन पैशाचा तमाशा’ रंगभूमीवर आणण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
पु. ल. देशपांडे.
या नाटकाची श्रेयनामावली.
निर्मिती-श्रीधर राजगुरू, निर्मिति व्यवस्था-प्रकाश अर्जुनवाडकर दिग्दर्शन-जब्बार पटेल दिग्दर्शन साहाय्य-चंद्रकांत काळे.
संगीत नियोजन -भास्कर चंदावरकर, आनंद मोडक, नंदू भेंडे
नेपथ्य वेशभूषा-अनिकेत-जय नेपथ्य व्यवस्था-मनोरंजन प्रकाशयोजना-समर नखाते, शरद पायगुडे ध्वनियोजना-नंदू पोळ, रवींद्र साठे
रंगभूषा-निवृत्ती दळवी कपडेपट-जाधव नाट्यसंसार रेखांकन-नचिकेत ध्वनिव्यवस्था-मदनकुमार, सूदन साठे
नृत्यरचना-माधुरी पुरंदरे, श्यामला वनारसे रंगमंच-अरविंद ठकार मिलिंट डोंगरे
वाद्यवृंद.
विलास आडकर, सतीश पंडित, जयवंत तिवारी, विवेक परांजपे, मुकेश डोडिया, लतीफ अहमद, अशोक गायकवाड, अन्वर कुरेशी, दीपक बारावकर, बाळासाहेब साळोखे.
अभिनय (कलाकार)
श्यामला वनारसे, माधुरी पुरंदरे, वंदना पंडित, हेमा लेले, रजनी चव्हाण, मीरा पुंड, चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, अन्वर कुरेशी, विजय जोशी, टेक्सस गायकवाड, अविनाश आंबेडकर, रमेश टिळेकर, मुकुंद चितळे, सतीश आग्रवाल, उल्हास मुळे, अशोक गायकवाड, देवेंद्र साठे, अशोक स्वामी, प्रकाश अर्जुनवाडकर, मकरंद ब्रह्मे, अनिल भागवत, विनय बेलसरे, सुरेश बसाळे, प्रवीण गोले, उदय लागू, श्रीकांत गद्रे, उमेश देशपांडे आणि नंदू भेंडे.
या नाटकाचे प्रयोग १९९१ साली थांबले. दुर्दैवाचा भाग म्हणजे याचे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply