२६ मार्च १९६३ या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी मंदारमाला हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते.
“मंदारमाला‘चे १९६३च्या गुढीपाडव्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ‘भारत नाट्य प्रबोधन संघा’ने हे नाटक परत रंगभूमीवर आणले. दादर येथील रंगमंदिरात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. पहिले शंभर प्रयोग ‘रंगमंदिर’तर्फे झाल्यावर नाट्यनिर्माते राजाराम शिंदे यांच्या ‘नाट्यमंदार’ने हे नाटक चालवायला घेतले आणि ४०० प्रयोगांचा पल्ला कधी ओलांडला हे रसिकांनाही समजले नाही. संपूर्ण देशभर प्रयोग झाले. अडीच-अडीच महिने सलग दौरे होत. कधीकधी नाटकाचे दिवसाला तीन-तीन प्रयोग होत. या नाटकाचे असे एकूण १२००हून अधिक हाऊसफुल्ल प्रयोग झाले. या नाटकाद्वारे विद्याधर गोखले यांनी मोठ्या आणि आळवून आळवून म्हणावयाच्या नाट्यपदांच्या परंपरेला छेद दिला. लागोपाठ पदे येणार नाहीत अशी नाटकाची सुरेख मांडणी त्यांनी केली.चटपटीत संवादांदरम्यान ही रसाळ पदे गुंफली होती. पंडित राम मराठे आणि प्रसाद सावकार यांच्यातील ‘बसंत की बहार आयी’ ही अजरामर जुगलबंदी ऐकण्याला प्रेक्षक उत्सुक असत. त्यासाठी नाटक साडेचार तास चालले तरी ते चुळबूळ करीत नसत.
‘संगीत मंदारमाला’चं कथानक सतराव्या-अठराव्या शतकात राजपुतान्यातील असल्याचे गृहीत धरण्यात आलं आहे. आपल्याकडे जे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, बंदीशकार, नायक, विद्वान पंडित होऊन गेले त्यांच्यापैकीच काहींच्या जीवनातील मोजक्या प्रसंगांना विद्याधर गोखले कल्पनेची अफलातून जोड दिली आणि ‘मंदार’ या कमालीचा स्त्रीद्वेष असलेल्या, जीवनाला विटलेल्या, मात्र सप्तसुरांच्या नादब्रह्मात कायम रमणार्याा आणि संगीत भक्तीच्याच बळावर मनपरिवर्तन झालेल्या अवलिया वनवासी संगीतकाराचा जीवनप्रवास ‘संगीत मंदारमाला’च्या रूपानं रसिकांसमोर आला अन् इतिहास बनून गेला. ‘सोऽहम हर डमरू बाजे’ ही या नाटकातील तोडी रागावर आधारित बंदिश आजही लोकप्रिय आहे. नाटकातील इतर पदांमध्येही पं. राम मराठे यांनी अनेक राग-रागिण्यांचा वापर केला. ज्योतकंस, अहिरभैरव, गौडमल्हार, बसंत बहार, बैरागी भैरव, तोडी, मालकंस, बिहाग, हिंडोल, भैरवी असे अनेक राग रामभाऊंनी चपखलपणे वापरले. ‘बसंत की बहार आयी’ या जुगलबंदीतील ‘चक्रधार’ हा तर त्यांच्या सांगीतिक गणिताचा उत्तम नमुना होता.
सोऽहम हर डमरू बाजे
मंदारमाला नाटकातील इतर गाजलेली पदे
कोण अससि तू न कळे (राग जोगकंस, गायक राम मराठे)
जय शंकरा गंगाधरा (राग अहिर भैरव, गायक राम मराठे)
जयोस्तुते हे उषादेवते (राग देसकार, गायक राम मराठे)
तारिल हा तुज गिरिजाशंकर (राग हिंडोल, गायक राम मराठे)
तारे नहीं ये तो रात को (राग मिश्र खमाज, गायक प्रसाद सावकार)
बसंत की बहार आयी (राग बसंत आणि बहार, गायक राम मराठे आणि प्रसाद सावकार)
बुझावो दीप ए सजनी (राग मिश्र भैरवी, गायक प्रसाद सावकार)
हरी मेरो जीवनप्राण-अधार (राग मिश्र पिलू, गायक राम मराठे)
— संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply