भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झाला.
इम्पिरियल मूव्हीटोन निर्मित, आर्देशीर इराणी दिग्दर्शित या हिंदी चित्रपटाचं नाव होतं ‘आलम आरा’! चित्रपटांमध्ये ध्वनीचे महत्त्व समजून इतर बोलपट प्रदर्शित होण्यापूर्वी इराणी यांनी आलम आरा प्रदर्शित केला. हा चित्रपट तेव्हा इतका लोकप्रिय झाला की, प्रेक्षकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी अक्षरश: पोलिसांची मदत घेण्यात आली होती.
‘आलम आरा’मध्ये पृथ्वीराज कपूर, मास्टर विठ्ठल, जुवैदा, जिल्लो आणि सुशीला यांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची कथा जोसेफ डेव्हिड यांनी लिहिली होती. या पहिल्या बोलपटाची लांबी १२४ मिनिटे इतकी होती. या चित्रपटात संगीताला उत्तम स्थान मिळाले होते. ‘आलम आरा’मध्ये एकूण सात गाणी होती. त्यापैकीच ‘दे दे खुदा के नाम पे’ हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले गाणे मानले जाते. हे गाणे वजीर मोहम्मद खान यांनी गायले होते. ‘बदला दिलवाएगा या रब…, ‘रूठा है आसमान…’, ‘तेरी कातिल निगाहों ने मारा…’, ‘दे दिल को आराम…’, ‘भर भर के जाम पिला जा…’, आणि ‘दरस बिना मारे है…’ ही चित्रपटातील इतर गाणी आहेत.
राजकुमार आणि बंजारनच्या प्रेमकथेवर आधारित असलेला हा चित्रपट एका पारसी नाटकावर आधारित होता. ‘आलम आरा’ पाहण्यासाठी पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी चित्रपटगृहांबाहेर मोठी गर्दी जमली होती. लोकांना आवरण्यासाठी तेव्हा पोलिसांना बोलवावे लागले होते. त्यावेळी जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये पाच रुपयांत खरेदी केल्याचेही म्हटले जाते.
Leave a Reply