नवीन लेखन...

कार्डिअॅक कॅथेटरायझेशन – डॉ. वेर्नर फोर्समान

हृदयशल्‍यचिकित्‍सेच्‍या क्षेत्रात ‘कार्डिअॅक कॅथेटरायझेशन’ या प्रक्रियेमुळे खूप प्रगती झाली. इसीजी यंत्राचा शोध लागला व हृदयाची परीक्षा करणे शक्‍य झाले. हृदयाच्‍या स्‍पंदनांचा, त्‍यांच्‍या लयीचा अभ्‍यास करून त्‍यांची निरिक्षणे नोंदविणे व मग त्‍यातील अनियमितता जाणून घेणे व रोगाच्‍या पाऊलखुणा ओळखणे इसीजीमुळे शक्‍य झाले. ‘कार्डिअॅक कॅथेटरायझेशन’ हे तर त्‍यापुढील पाऊल. यात कॅथेटर (म्‍हणजे खरे तर एक नलिका असते, जी वैद्यकीय निरिक्षणाखाली शरीरात घालून त्‍याद्वारे रोगनिदान व उपचार करता येतात.) हृदयात घालून त्‍याद्वारे उपचार करण्‍याची सुविधा उपलब्‍ध झाली. डॉ. नॉर्मन शुमवे यांनी या पद्धतीचा अतिशय प्रभावी वापर केला. शुमवे यांच्‍या लक्षात आले की प्रत्‍यारोपित रुग्‍णांच्‍या बाबतीत जंतुसंसर्गाचा मोठा धोका असतो. जंतुसंसर्ग टाळण्‍यासाठी औषधाची मात्रा अचूक ठेवणे गरजेचे असते. परंतु ही मात्रा ठरवायची कशी? मात्रा कमी पडली तर रुग्‍णाचे शरीर प्रत्‍यारोपित हृदय नाकारते व जास्‍त झाली तर प्राणघातक जंतुसंसर्गाचा मोठा धोका निर्माण होतो.शुमवे यांनी यावर उपाय शोधून काढला. ते पेशंटच्‍या हृदयात कॅथेटर घालून त्‍याद्वारे एक लहानसा अंश परीक्षेसाठी बाहेर काढत व त्‍याचे विश्‍लेषण करून औषधाची मात्रा कमी अथवा जास्‍त करत. या पद्धतीमुळे मृत्‍युदरात मोठीच घट झाली.

कार्डिअॅक कॅथेटरायझेशन हे हृदयशल्‍यचिकित्‍सेसाठी वरदानच ठरले आहे. अठराव्‍या शतकाच्‍या सुरुवातीपासून यावर कामाला सुरुवात झाली. स्‍टीफन हेल्‍सनी १७२६ साली एका घोड्याच्‍या मांडीतील रोहिणीमध्‍ये (फेमोरल आर्टरी) कॅथेटर घालून रक्‍तदाब मोजला होता. त्‍यानंतर १८४४ मध्‍ये क्‍लॉड बर्नार्ड यांनी परत एकदा कॅथेटरचा वापर करून रक्‍तदाब मोजला.

चैव्‍हेऊ व मारे (Cheaveau & Marey) यांनी १८६३ साली या विषयावर विस्‍तृत विवेचन (intracardiac pressure व cardiac cycle) करणारा शोधनिबंधही प्रसिद्ध केला. एकोणिसाव्‍या शतकाच्‍या अखेरीपर्यंत प्राण्‍यांवर कार्डिअॅक कॅथेटरचा वापर करणे नित्‍याचे झाले होते. बर्‍याच प्रयोगशाळांमध्‍ये असा प्रयोग केला जात होता. परंतु ही प्रक्रिया मानवी शरिरावर उपयोगात आणली गेली नव्‍हती.

कार्डिअॅक कॅथेटरचा मानवी शरिरावर वापर करण्‍याचे श्रेय डॉ. वेर्नर फोर्समान या जर्मन डॉक्‍टरला जाते. डॉ. फोर्समान यांनी प्रथम मानवी शरिरावर कार्डिअॅक कॅथेटर वापरून पाहिला इतकेच नव्‍हे तर एक्‍स-रे मशीन वापरून त्‍याची प्रतिमाही तयार केली. डॉ. फोर्समान यांची ही कहाणी केवळ रोचकच नव्‍हे तर एखाद्या रहस्‍यकथेप्रमाणे रोमहर्षक आहे.

जर्मनीतील बर्लिन येथे २९ ऑक्‍टोबर १९०४ रोजी फोर्समान यांचा जन्‍म झाला. बर्लिन विद्यापीठातून त्‍यांनी त्‍यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्‍यानंतर प्रा. जॉर्ज क्‍लेम्‍परर यांच्‍याकडे काम करायला त्‍यांनी सुरुवात केली. १९२९ मध्‍ये वैद्यकीय पदवी (एम.डी.) घेतल्‍यानंतर फोर्समान,‘एबर्सवाल्‍ड सर्जिकल क्‍लीनिक’ येथे शस्‍त्रक्रियेचे प्रशिक्षण घेत होते.

हृदयात घातलेल्या कॅथेटरची एक्‍स-रे प्रतिमा

यादरम्‍यान त्‍यांनी स्‍वतःवर कॅथेटरचा प्रयोग करून पाहिला. त्‍यांची अशी धारणा होती की, हृदयात जर का कॅथेटर घालता आला तर त्‍याचा उपयोग करून इन्‍ट्राकार्डिअॅक प्रेशर (हृदयाच्‍या विविध कप्‍प्‍यांमधील दाब) मोजता येईल व कॅथेटरद्वारा रंगद्रव्‍ये (radio-opaque dye) शरिरात सोडून त्‍याची एक्‍स-रे प्रतिमा घेता येईल. फोर्समान यांनी बरेच प्रयत्‍न करूनही त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेण्‍यास कोणी तयार होत नव्‍हते. त्‍यामुळे सुरुवातीस फोर्समान यांनी मृत मानवी शरिरांवर प्रयोग करून पाहिले. एबर्सवाल्‍ड येथे काम करीत असतांना त्‍यांनी स्‍वतःवरच हा प्रयोग करण्‍याचे ठरविले. त्‍यांच्‍या विभागप्रमुखांचा यास विरोध होता, तिकडे त्‍यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. ऑपरेशन थिएटर मधील परिचारिका गेर्डा डिटत्‍सेनहिला त्‍यांनी या प्रयोगामध्‍ये सामील करून घेतले. गेर्डाने, फोर्समान यांना मदत करण्‍याची तयारी दर्शविली, परंतु तिची एक अट होती. तिचे म्‍हणणे असे होते की हा प्रयोग तिच्‍यावरच करण्‍यात यावा. फोर्समानयांनी सुरुवातीला होकार दिला. त्‍यांनी तिला ऑपरेशन टेबलवर निजावयास सांगितले. तिला ‘लोकल अॅनस्‍थेशिया’ देण्‍याचा बहाणा करून तिला ऑपरेशन टेबलला जखडून टाकले. स्‍वतःला लोकल अॅनस्‍थेशिया दिला व कोपरातून कॅथेटर आत घातला. मग त्‍यांनी गेर्डाला सोडविले व तिला एक्‍स-रे विभागाला सांगण्‍यास सांगितले. फोर्समान यांनी जवळजवळ दोन फूट इतका कॅथेटर स्‍वतःच्‍या शरिरात घातला होता. एक्‍स-रे विभाग खालच्‍या मजल्‍यावर होता. फोर्समानस्‍वतः चालत तेथे गेले. तेथे गेल्‍यावर त्‍यांनी विभागप्रमुखांचे मन वळविले व कॅथेटरमधून रंगद्रव्‍ये आत इनजेक्‍ट केली (सोडली). मग जेव्‍हा एक्‍स-रे काढण्‍यात आला तेव्‍हा कॅथेटर, फोर्समान यांच्‍या हृदयात उजव्‍या बाजूला (राईट व्‍हेन्‍ट्रीकुलर कॅव्हिटी मध्‍ये) आत स्‍पष्‍ट दिसून आला.

 

या प्रयोगानंतर एबर्सवाल्‍ड येथील एका आजारी महिलेवर असा प्रयोग करण्‍याची परवानगी फोर्समान यांना देण्‍यात आली. ही महिला अतिशय आजारी असून तिच्‍या बरे होण्‍याची आशा नव्‍हती. फोर्समान यांनी कॅथेटरद्वारे तिच्‍यावर उपचार केल्‍यावर तिची प्रकृती सुधारली. फोर्समान यांनी त्‍यांच्‍या संपूर्ण प्रयोगाची साद्यंत हकीकत, नोंदी व निष्‍कर्ष लिहून एक शोधनिबंध प्रकाशित केला. हा शोधनिबंध प्रकाशित झाला तेव्‍हा फोर्समान ‘बर्लिन चॅरिटी हॉस्पिटल’ येथे विनावेतन करीत होते. प्रा. फर्डिनांड झाऊवरबाख यांच्‍या हाताखाली फोर्समान काम करीत होते. स्‍वतः प्रा. झाऊवरबाख संशोधक होते. परंतु फोर्समान यांचा शोधनिबंध वाचल्‍यावर ते संतापले व त्‍यांनी फोर्समान यांची हकालपट्टी केली. कालांतराने त्‍यांना पुन्‍हा रुजू करून घेण्‍यात आले. पण १९३२ मध्‍ये त्‍यांना परत काढून टाकण्‍यात आले. परंतु फोर्समान निष्‍णात शल्‍यचिकित्‍सक होते त्‍यामुळे दुसर्‍या एका रुग्‍णालयात त्‍यांना नोकरी मिळाली. तेथेच त्‍यांची डॉ. एल्‍सबेट एंगेल यांच्‍याशी भेट झाली. डॉ. एंगेल मूत्रविकारतज्‍ज्ञ होत्‍या. कालांतराने डॉ. फोर्समान व डॉ. एंगेल विवाहबद्ध झाले. विवाहानंतर फोर्समान यांनी पत्‍नीसह काम करण्‍यास सुरुवात केली. त्‍यांनी हृदयशल्‍यचिकित्‍सेऐवजी मूत्रशल्‍यविशारद म्‍हणून कामास सुरुवात केली. ते नाझी पक्षाचे सदस्‍य झाले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्‍यावर ते लष्‍करात वैद्यकीय अधिकारी म्‍हणून रुजू झाले. युद्धात ते अमेरिकन युद्धकैदी होते. युद्धकैदी म्‍हणून बंदिवासात असतांना आंद्रे कुर्नो व डिकीनसन रिचर्डस्  या अमेरिकन शास्‍त्रज्ञांच्‍या वाचनात फोर्समान यांचा शोधनिबंध आला. त्‍यावर त्‍यांनी अधिक काम करूनकार्डिअॅक कॅथेटरचा निदान व संशोधनासाठी वापर करण्‍याची पद्धती विकसित केली. कार्डिअॅक कॅथेटरची मूळ कल्‍पना डॉ. फोर्समान यांची होती. त्‍यामुळे डॉ. फोर्समान, कुर्नो व रिचर्डस् अशा तिघांना या क्रांतिकारी शोधासाठी १९५६ सालचे वैद्यकशास्‍त्राचे नोबेल पारितोषिक देण्‍यात आले. याआधी १९५४ मध्‍येडॉ. फोर्समान यांना‘जर्मन अॅकॅडमी ऑफ सायन्‍सेस’च्‍या वतीने ‘लिबनिझ’ पदकही देण्‍यात आले होते.

नोबेल पुरस्‍काराने सन्‍मानित झाल्‍यावर डॉ. फोर्समान यांना ‘मेन्‍झ विद्यापीठात’ शल्‍यचिकित्‍साव मूत्रविकार विभागाचे मानद प्राध्‍यापक करण्‍यात आले. १९६२ मध्‍ये ते ‘जर्मन सोसायटी ऑफ सर्जरी’च्‍या कार्यकारी मंडळाचे सदस्‍य झाले. अमेरिका, स्‍वीडनव जर्मनीतील शल्‍यचिकित्‍सा, मूत्रविकार, हृदयशल्‍यचिकित्‍सा विभागांतील कित्‍येक शिखर संघटनांचे त्‍यांना मानद सदस्‍यत्‍व प्रदान करण्‍यात आले. डॉ. फोर्समान यांनी जेव्‍हा या संशोधन प्रवासास सुरुवात केली तेव्‍हा त्‍यांच्‍या निष्‍कर्षांकडे पाहण्‍यास देखील वैद्यकीय क्षेत्र तयार नव्‍हते. फोर्समान यांना टीकेचे धनी व्‍हावे लागले, नोकरी गमवावी लागली इतकेच नव्‍हे तर हृदयशल्‍यचिकित्‍सा सोडून, मूत्रविकारतज्‍ज्ञ म्‍हणून ते काम करू लागले. युद्धानंतर तर त्‍यांनी काही काळ लाकडे तोडण्‍याचे देखील काम केले. पत्‍नीसह जर्मनीतील ब्‍लॅक फॉरेस्‍टनजीक एका लहानशा खेड्यात ते काम करीत होते. नोबेल पुरस्‍कारानंतर हे चित्र बदलले. डॉ. फोर्समान यांच्‍या कामावर मान्‍यतेची मोहोर उमटली व कित्‍येक विद्यापीठांनी त्‍यांना मानद प्राध्‍यापकपद बहाल केले.

काळाच्‍या पुढे जाऊन विचार करण्‍याची उत्तुंग प्रतिभा डॉ. फोर्समान यांच्‍याकडे होती. त्‍यांनी केवळ विचारच केला नाही तर तो अंमलात आणण्‍याचे, स्‍वतःवर प्रयोग करण्‍याचे अतुलनीय धैर्य दाखविले. त्‍यांच्‍यामुळे आज ‘कार्डिअॅक कॅथेटरायझेशन’द्वारे हृदयशल्‍यचिकित्‍सेतील महत्त्वाचा टप्‍पा आपल्‍या कवेत आला आहे. दि. १ जून १९७९ रोजी डॉ. फोर्समान यांचे जर्मनीतील शॉप्‍फहाईम येथे हृदयविकाराने निधन झाले.

कार्डिअॅक कॅथेटरचा मानवी शरीरातील प्रवास

 

— डॉ. हेमंत पाठारे व डॉ. अनुराधा मालशे

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..