ग्रामीण महाराष्ट्रातली युवकांची आजची मानसिकता आणि त्याचे होणारे परिणाम यावर भाष्य करणारा आणि जळजळीत अंजन घालणारा हा लेख. WhatsApp वरुन आला आणि जास्थित जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून येथे शेअर केला. लेखकाचे नाव माहित नाही.
ग्रामीण भागातील तरुण आळशी होत चाललाय…
फक्त फेसबुक आणि व्हाट्सअप वर शेतकऱ्यांच्या पोस्ट करणारा युवक प्रत्यक्षात मात्र दिवसभर स्टॅण्डवर पडीक दिसतो. २३-२४ वय झालं कि १९-२० वर्षाच्या मुलीला लग्न करून घरी आणायचं, चार दिवसांचं कौतुक संपलं की तिला कामावर जुंपायच आणि स्वतः मात्र मस्तपैकी स्टॅण्डवर गप्पा मारात पत्ते खेळत बसायचं असाच सध्या ग्रामीण भागातील तरुणांचा कार्यक्रम आहे. बायकोला आठवडाभराचा रोज मिळाला कि त्यातून स्वतःसाठी चार पाचशे रुपये घ्यायचे, चहा, दारू आणि पत्त्यांत उडवायचे एवढाच दिनक्रम असतो युवकांचा.
कोणत्या नेत्याने काय केलं, कुठं कुणी काय डाव टाकले, निवडणूक, राजकारण याच्याबाहेर हा तरुण यायलाच तयार नाहीये. वर्षातून येणारे सगळे सण साजरे करायचे त्यासाठी स्थानिक नेत्यांकडून पैसे गोळा करायचे, गणपतीच्या मंडपाखाली पत्त्याचे डाव मांडायचे आणि पुढच्या ४-५ महिन्याची सोय करायची. नेत्याला सुद्धा माहित असतं या तरुणांना कुत्र्यासारखा आपलं गुलाम कस बनवायचं. पैसे फेकले कि हि तरुण ताकद अलगद आपल्या हाताखालची मांजर बनते.
राज्यात कोणत्याही कोपऱ्यात जा हीच परिस्थिती दिसेल. सगळेच वाईट आहेत असे नाही, पण जे चांगले आहेत ते हाताच्या बोटावर मोजण्याइतके सुद्धा सापडणार नाहीत. कधी एखाद्या गावात पारावर बसलेल्या मुलांना जाऊन विचाराव कि शेतात काम करायचंय, तीनशे रुपये रोज मिळेल, चलता का ? सगळी पोरं एका क्षणात गायब होतात.
घरी बायको म्हणून आणलेली २०-२१ वर्षाची कोवळी पोर यांच्यासाठी आता हक्काची गुलाम असते. ती कमावते आपण मजा मारायची. घरातील स्त्री शेतावर राबत असताना हा महान आत्मा स्टॅण्डवर उभा राहून आपल्या मानसन्मानाच्या गप्पा झोडत असतो. एखादा व्हाट्सअप वर शेतीसंबंधी मेसेज आला की मस्तपैकी पुढच्या ग्रुप वर फॉरवर्ड करून शेतकऱ्यांसाठी काहीतरी केल्याचा आव आणतो. एखाद्या गावात जाऊन शेती आंदोलनाला येण्यासाठी आवाहन करावं तर हीच शेतकऱ्यांची मुलं पैसे किती मिळणार याचा हिशोब करतात, पण गावात स्टॅण्डवर आपला फोटो छापलेला किमान एक तरी बॅनर झळकला पाहिजे असली भुक्कड स्वप्ने पाहतात. मग यासाठी एखाद्या नेत्याचा वाढदिवस, सण, जयंत्या असतातच.
गावाच्या राजकारणात धडाडीने उतरणारा आजचा युवक घरासाठी काहीतरी काम करायच म्हटलं तर क्षणार्धात मागे हटतो. त्याला काम नकोय, कुणीतरी हातात पैसे आणून द्याव असं त्याला वाटतंय. आणि यासाठी हक्काची गुलाम बायको आणि हक्काचा मालक नेता हे दोन मुख्य स्रोत असताना त्याला भविष्याची चिंता सतावत नाही. काय अपेक्षा करावं यांच्याकडून? घंटा क्रांती घडणार यांच्या हातून ?
तोंडात तंबाखू आणि मावा, डोक्यात नुसतं राजकारण, हातात कुणाचातरी झेंडा, आणि डोळ्यात भला मोठा शून्य अशी युवकांची अवस्था आहे… राजकारणात इंटरेस्ट कुणाला नसतो ? सगळ्यांनाच राजकारणात स्वारस्य असतं… पण हे काम सांभाळून करायचं असतं एवढही भान राहील नाहीये कुणाला….
आपण असला मूर्खपणा करतोय म्हणूनच आपल्याबद्दल अपशब्द वापरायची हिम्मत दाखवू शकतात एवढही कळत नाहीये यांना. सगळेच नेते आज शेतकऱ्यांबद्दल असलाच दृष्टिकोन बाळगून आहेत, आणि याच कारण म्हणजे शेतकऱ्यांची मुले, ज्यांच्या जीवावर शेतकरी उज्ज्वल शेतीचं स्वप्न पाहतोय, ती बाहुलं बनली आहेत. जातीचं राजकारण, पैशांचा सुळसुळाट, बॅनरवरची पब्लिसिटी आणि नेत्याचा खांद्यावर हात याला ग्रामीण युवक भविष्य म्हणून पाहतोय… म्हणूनच राजकीय वर्ग शेतकऱ्यांना गृहीत धरतोय.
काम करा म्हटलं की प्रत्युत्तर तयार असतं, काम मिळत नाही, पण राज्यात कामं नसती तर यु.पी. बिहारची मुलं झक मारायला आली असती का महाराष्ट्रात ? कामं भरपूर आहेत. करायची तयारी हवी, नवीन मार्ग अवलंबयाची मानसिकता हवी, भुक्कड राजकारण्यांच्या हातचं खेळणं होण्यापेक्षा चांगल्या राजकारण्यांचा सहकारी होण्याचं स्वप्न शेतकरी तरुणांनी बाळगणं आवश्यक आहे. आधी घर, काम आणि मगच राजकारण असा शिरस्ता असायला हवा… नाहीतर नेतेमंडळी भविष्यात आपले मुडदे पडायला लागली तरी आपण काहीच करू शकणार नाही….
वेळ थांबत नाही… गेलेली वेळ परत येत नाही…. शेतकरी तरुणांनी वेळीच योग्य निर्णय घेतला नाही तर भविष्यात त्यांच्या हातात फक्त गुलामीची साखळदंड असतील…
— संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
Leave a Reply