होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्म १० एप्रिल १७५५ रोजी जर्मनी मधील मिसेन या गावी झाला.
डॉ.सॅम्युअल हॅनेमन यांना सहा भाषा अवगत असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी वैद्यकीय पुस्तकांची भाषांतरे केली. १७७९ मध्ये ‘स्नायूवाताची कारणे व उपचार’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पदवी प्राप्त केली होती. १७८० ते ८५ या काळात ते लेखनिक, वैद्यकीय चिटणीस अशी काम करत त्यांनी रसायन शास्त्रावरील पुस्तके भाषांतरित करत असतानाच त्यांनी सुप्रसिद्ध वाईन टेस्ट शोधून काढली आणि ‘मर्क्युरीयस झोल्युबिलस हानिमान’नावाचं पाऱ्याचा संयुग देखील शोधलं. अर्सेनिक पाॅयझनिंग, शुद्ध व भेसळयुक्त औषधातील फरक, चिघळणाऱ्या जखमा व त्यावरील उपचार या त्यांच्या कामांचं मोठं कौतुक झालं. ऑस्ट्रियाचा राजा निओपाला चुकीच्या उपचारांमुळे आलेल्या मृत्यूनंतर त्यांनी अशा सदोष उपचार पद्धतीवर आपलं परखड मत मांडलं. त्याकाळी रुग्णाला होत असलेली निरनिराळी लक्षणे विचारात घेऊन औषधांचं मिश्रण करून दिलं जाई परंतु हिवतापातील निरनिराळी लक्षणे क्विनाईन या एकाच औषधाने नाहीशी होत. यामुळे डॉ.हानिमान यांच्या लक्षात आलं की प्रत्येक औषधात अनेक सुप्त गुण आहेत व त्यांच पूर्ण ज्ञान आपल्याला नाही. क्विनाईन निरोगी माणसाने घेतल्यास काय लक्षणे दिसतात याचा त्यांनी अभ्यास केला. त्यावेळी निर्माण होणारे शारीरिक व मानसिक लक्षणे बहुतांशी हिवतापाच्या लक्षणांबरोबर जुळतात हे त्यांच्या लक्षात आलं .अशा पद्धतीने निरनिराळ्या औषधांनी निरोगी व्यक्तींमध्ये निर्माण होणारी लक्षणे क्रमवार लिहून ठेवण्याचे काम त्यांनी सुरू केलं. या अभ्यासाला “ड्रग प्रूव्हिंग ” म्हणतात. “निरोगी माणसात निर्माण झालेल्या लक्षणांप्रमाणेच लक्षणे असलेला रोगी आसल्यास ते औषध ती लक्षणे दूर करतं” असा सिद्धांत त्यांनी या अभ्यासाअंती मांडला आणि हा “सम लक्षण चिकित्सा ” होमिओपॅथीचा मूलभूत सिद्धांत ठरला. १७९६ मध्ये हानिमान यांनी या विषयांची माहिती प्रथम ‘हॉफलॅंड जर्नल’ मध्ये लिहिली . त्यानंतरच्या काळात त्यांनी स्वतःवर, मित्रांवर, कुटुंबीयांवर ९० औषधांचं सिद्धीकरण केलं. त्याची क्रमवार माहिती ” होमिओपॅथिक मटेरिया मेडिका ” या नावाच्या पुस्तकात संकलित केली .याच पुस्तकाचे पुढे १८११ ते १८२१ या काळात सहा भाग निघाले .
हे सगळे प्रयोग करत असताना हानिमान यांच्या असं लक्षात आलं की रोगाची सामान्य लक्षणे विचारात घेण्याऐवजी प्रत्येक रोग्याची स्वतःची अशी वेगळी शारीरिक व मानसिक जडणघडण ,कौटुंबिक पाया या सगळ्यांचा विचार करणे गरजेचे आहे .त्याचबरोबर औषधांचे रुग्णावर जे दुष्परिणाम होतात ते कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयोग केले. त्यातूनच औषधांचं खलन किंवा घर्षण करून, तटस्थ पदार्थात मिश्रण करून त्यांचं तेज व शक्ती वाढते. लक्षणांचा प्रकोप न होता योग्य तो परिणाम होतो. हे त्यांनी अभ्यासलं. आणि मग “औषधाचं शक्तीकरण” हा दुसरा मूलभूत सिद्धांत मांडला. डॉ.हनिमन यांचं रुग्ण आणि ठरलेल्या वर्तुळात कौतुक होत असलं तरी त्यांची ही मत त्याकाळच्या वैद्यकीय व्यावसायिक व औषध विक्रेत्यांना मान्य नव्हती. डॉ.हानिमन यांना न्यायालयाने औषध तयार करण्यास व उपचार करण्यास बंदी घातली. त्यानंतर लिप् झीग् शहर सोडून त्यांनी दहा वर्ष भ्रमंती केली.१८०८ ते १८११ या काळात हानिमान ,तोरगाॅ या गावी होते.तिथे त्यांनी होमिओपॅथीचा मूळ ग्रंथ ” ऑर्गानन ऑफ होमिओपॅथी ” लिहिला. १८१८ साली नेपोलियनच्या भीतीपोटी लिप् झीग् ला परतले. पुन्हा त्यांच्या व्यवसायावर बंदी आल्याने ते शहर सोडून कोथेन इथे गेले.
डॉ.सॅम्युअल हॅनेमन यांचे २ जुलै १८८३ निधन झालं.
Leave a Reply