आजपर्यंतचा ‘समर’ म्हणजे फक्त हुशार कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ, खूप helping nature चा असाच तिला माहित होता. चोवीस वर्षांपूर्वी का? नाही, जवळ जवळ २६-२७ वर्षांपूर्वी तो तिला मेडिकल कॉलेज मध्ये भेटला होता. तिला सिनियर होता. त्याची आणि तिची पहिली भेट सिविल हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये झाली होती. दोघांची duty बरोबरच होती. त्या दिवशी ती तिची duty संपल्यानंतर बसस्टॉप वर एकटीच उभी होती. तिचा हॉस्पिटलचा पहिलाच दिवस होता. रात्रीची वेळ होती. आजूबाजूला कोणीच नव्हते. ती मनातून घाबरलेली होती. पण दुसरा काही पर्याय नव्हता. समरही त्याची duty संपवून निघाला होता. तिने त्याला तिथून स्कुटरवर जाताना बघितले होते. त्याने सुद्धा तिच्याकडे पहिले होते. एका क्षणी त्याच्याकडे लिफ्ट मागण्याची तिला इच्छा झाली होती पण तो भुर्रकन पुढे निघून गेला होता.
परंतु काही क्षणातच तो माघारी आला होता, “ मी तुला घरी सोडतो, रात्रीचे नऊ वाजून गेलेत. ह्या भागात एवढ्या उशिरा लोकांची चाहुलही नसते. चल बस”. असे सगळे पटापट बोलून गेला होता. तिने स्कूटरवर बसता बसता त्याला आपल्या घराचा पत्ता सांगितला. “अरे वा, तुझे घर माझ्या घराच्या रस्त्यावरच आहे. असे तो हसत हसत म्हणाला होता”. नंतर दोघांमध्ये कसलेच संभाषण झाले नव्हते. तिचे घर आल्यावर त्याने स्कूटर थांबविली, तिने खाली उतरून ‘Thank-you’ एवढेच म्हटले होते.
दुसऱ्या दिवशी पण ती आपल्या dutyवर पोहोचली होती. महिनाभर दोघांची एकाच वॉर्ड मध्ये duty होती. त्या दिवशी देखील ती आपले काम संपवून बस स्टॉपवर उभी राहिली होती. समर देखील त्याची duty संपवून स्कूटरवर आला होता. पण आता तो पुढे जावून मागे न येता पहिल्यांदाच तिच्याजवळ आला आणि तिला स्कूटरवर बसवून दोघे निघून गेले. हा सिलसिला पंधरा वीस दिवस चालूच होता. हळूहळू दोघांची थोडीशी ओळख झाली होती. कामापलीकडे दुसरे काही बोलणे सुद्धा होत होते. आता बस स्टॉपवर थांबून ती बसऐवजी त्याच्या स्कूटरची वाट बघू लागली होती. आणि असे काही तरी होत आहे हे तिच्या लक्षात सुद्धा आले नव्हते.
अचानक एके दिवशी त्याच्या स्कूटरच्या आधीच तिची बस आली होती आणि ती बसमध्ये चढण्यासाठी पुढे सरकली आणि काही कळण्यापूर्वीच ती परत मागे झाली. कंडक्टरने, “ताई चला” म्हणून हाक सुद्धा मारली. परंतु तिने “नाही” म्हणून बस सोडून दिली होती. बस निघून गेली इतक्यात घाईघाईने horn वाजवत समर तिथे पोहोचला.
आणि म्हणाला, “ओ sorry आज मला थोडा उशीर झाला. एक क्षण मला भिती वाटली कि तू आता बसमध्ये चढतेस कि काय? Thank God, तू बस सोडून दिलीस. अग त्या कोपऱ्यातल्या बेडवरच्या पेशंटला injection द्यायचे होते. त्या म्हाताऱ्या आजीबाई सिस्टरला हातच लावून देत नव्हत्या. शेवटी मीच त्यांना injection दिले. त्यामुळे थोडा उशीर झाला”.
“हो खरेतर मी बसने जाणार होते पण मला वाटले कि तुम्ही काळजी कराल मी कुठे गेले? म्हणून बस सोडून दिली. तिने उत्तर दिले होते. पण मी उद्यापासून मी बसनेच जाईन म्हणजे तुम्हाला कुठे उशीर झाला तरी चालेल”. असे तिने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावर त्याने तिला हसत हसत सांगितले होते कि, “उद्यापासून तू बससाठी थांबायचेच नाही आपण दोघेही हॉस्पिटलमधून बरोबरच बाहेर निघत जायचे”.
तेंव्हापासून त्यांची मैत्री वाढत गेली होती. नंतर ती घट्ट होत गेली. आणि अचानक एके दिवशी त्याने तिला प्रपोज ही केले होते. कदाचित ती ही त्या क्षणाची वाट बघत असावी असा पटकन तिने त्याला होकार दिला होता. आणि “झट मंगनी पट ब्याह” तसे दोघे विवाह बंधनात बांधले गेले होते. तसे दोघे नोकरी बरोबरच करत होते. नंतर त्याने M.S. केले. तिने मात्र आपले शिक्षण तिथेच थांबविले. होते. दोघांचाही संसार सुखाने चालू होता. सुखी संसाराला गालबोट लागल्याप्रमाणे, मुलबाळ नव्हते पण त्यावर विचार करत बसण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. स्वतःचा दवाखाना सुरु करून आता पंधरा वर्षे झाली होती. सिस्टर्स, वॉर्डboyes, नर्सेस, लेडी डॉक्टर, इतर दोन डॉक्टर्स असा बराच स्टाफ त्यांच्याकडे होता. डॉ. समर आपले काम बरे आणि आपण बरे, अशा स्वभावाचा माणूस. कधी पण कुठल्याही ladystaff बरोबर तो वेडावाकडा वागत नसे. दवाखान्यात त्याचा भरपूर दरारा होता. कामाच्या वेळेस डॉ. संगीता; त्याची बायको आहे हे तो विसरून जात असे.
Leave a Reply