मध्यंतरी कोणीतरी सांगीतले होते की हिची परिस्थिती खूप वाईट झाली आहे. श्रीमंत बापाच्या ह्या मुलाने सगळा पैसा व्यसनात घालवला. पण मी काही फार चौकशी केली नव्हती, माझ्यासाठी हा विषय केंव्हाच संपला होता. आता अचानक अशा परिस्थितीत ही माझ्यासमोर आली आहे. बहुतेक ती मला आठवण्याचा प्रयत्न करते आहे. पण तिला मी आठवत नसावा. एका दृष्टीने चांगलेच आहे. पण तिची ही दयनीय अवस्था, हे तिचे रिपोर्ट्स; दोनीही मी सहन करू शकत नाही. इतर वेळी मी तिला घरी पाठवून दिले असते. परंतू मी तसेही करू शकत नाही. तिला घरी तरी कसे पाठवू? तिच्या नवऱ्याची तर तिला दोन दिवस औषधपाणी करण्या इतपत देखील परिस्थिती दिसत नाही. बहुतेक त्याला पश्चाताप झालेला असावा. सिस्टर सांगत होती, हा माणूस दोन दिवसापासून काहीही न खाता पिता इथेच बसला आहे.
अशा परिस्थितीत मी काय करू संगीता सांग? मी काय करू हेच मला समजत नाही. डॉक्टर म्हणून हिच्या बरोबर वागू आणि हिला discharge देऊन टाकू की एक जवळचा बालमित्र म्हणून मला शक्य होईल तेवढे औषधपाणी करू? तू सांग काय करू? तू जसे सांगशील तसे करतो.”
असे बोलून रडणारा, हतबल झालेला त्याचा चेहरा तिला अजूनही अस्वस्थ करीत होता.
एवढे त्याचे बोलणे ऐकूनही तिने त्याला काहीच उत्तर दिले नव्हते. शेवटी त्याने सिस्टरला सांगून राजश्रीच्या नवऱ्याला केबिनमध्ये बोलावून घेतले होते. त्याला समोरच्या खुर्चीत बसवले आणि शांत डोक्याने त्याला सांगितले होते की “हे बघा तुमच्या बायकोचे म्हणजे राजश्रीचे कुठलेही report चांगले आलेले नाहीत. आमच्याकडून जे शक्य होते ते सगळे प्रयत्न आम्ही केले. त्या काही जास्त दिवस काढतील असे दिसत नाही. तेंव्हा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांना दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जा किंवा घरी घेऊन जा”. हे सांगत असताना देखील समरचा गळा दाटून येत होता. तो स्वतःला खूप आवर घालतोय हे देखील तिच्या लक्षात येत होते. तरी देखील ती काहीच बोलली नव्हती.
समरचे बोलणे ऐकून राजश्रीचा नवरा मात्र अगदीच केविलवाणा झाला होता. तो दीनवाण्या स्वरात त्या दोघांचीही आर्जवं करत होता. काही वेळाने त्याने स्वतःला सावरले होते आणि तो समरला म्हणाला, “डॉक्टर मी तुम्हाला काय सांगू ? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. परंतु आम्ही दोघेही खूप चांगल्या घरात जन्माला आलेली माणसे आहोत. राजश्री तर वसंतराव देशमुखांची मुलगी आहे. ती खूप सालस आहे. तिने आमचा संसार टिकविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मी अतिशय दुष्टपणे वागलो. आमच्या लग्नापूर्वी हिचे कुठल्यातरी आजूबाजूच्या मुलाशी काही प्रेमप्रकरण होते असे माझ्या ऐकण्यात आले होते. त्यामुळे मी सदैव तिच्यावर संशय घेत राहिलो. तिला कुठेही घराच्या बाहेर एकटीला जावू देत नव्हतो. माहेरी तर बिलकूलच नाही. देशमुखांची ती एकुलती एक मुलगी होती त्यामुळे तेच आमच्या बाजूला येवून राहिले होते. परंतु माझे मन संशयाने पूर्ण खावून टाकलेले होते. मी त्यांच्यावर आणि राजश्रीवर खूप अन्याय केला. कितीतरी वेळा मारझोडही केली. परंतु तिने घराची लाज ठेवण्यासाठी कधी शब्दही उच्चारला नाही. माझ्या या वागण्याचा देशमुखांवर खूप परिणाम झाला. ते दोघेही धसक्याने मरून गेले. त्यानंतर मी स्वतःला खूप दोषी मानू लागलो. राजश्रीला तोंड दाखवण्याची देखील मला लाज वाटू लागली. मी सतत घराबाहेर राहू लागलो आणि व्यसनाधीन झालो. माझ्या वडिलांचीही खूप इस्टेट होती. परंतु माझ्या अशा वागण्यामुळे त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातून काढून टाकले. ते राजश्रीला घरात घ्यायला तयार होते. परतू तिने त्याही परिस्थितीत माझ्याजवळ राहून मला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. आणि मी दुर्दैवी तेंव्हा देखील हाच विचार करत होतो की हिला सासरी राहून तिच्या मित्राला भेटता येणार नाही म्हणून ती माझ्याजवळ राहण्याचे नाटक करते आहे. त्या नंतर दारूच्या आहारी जाऊन मी खूप आजारी पडलो. मला वाचविण्यासाठी तिच्याजवळ जे काही उरले होते ते विकून तिने माझा जीव वाचवला. ह्या नंतर मात्र माझे डोळे उघडले. परंतु तेंव्हा खूप उशीर झाला होता. संसार सावरण्यासाठी आमच्याकडे काहीच राहिले नव्हते. मोठे घर विकून ह्या एक बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहायला आलो. माझ्या तब्येतीमुळे आणि माझ्या विचित्र स्वभावामुळे मला कोणीही कामधंदा दिला नाही. ती मात्र लोकांचे डबे करून आमची पोटे भरण्याचा प्रयत्न करीत राहिली त्यात मी तिला थोडी मदत करत होतो. माझ्या तेवढ्या प्रेमळ सहवासाने देखील ती खूप खुश होती. गेले वर्ष-दीड वर्षच काय ते आम्ही नीट रहायला लागलो होतो. आणि अलीकडे तिची तब्येत सारखी बिघडायला लागली होती. जवळच्याच एका डॉक्टर कडून औषध आणत होतो. तिला थोडे बरे वाटले कि ती उठून परत कामाला लागत होती. आमचे पोट भरण्याची जबाबदारी तिच्यावरच येऊन पडली होती ना? ती तरी काय करणार होती बिचारी. गेल्या महिन्यापासून ते डॉक्टर मागे लागले होते कि तिला मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जा. परंतु आमच्याकडे पैसेच नव्हते. तिला खूप सांगायचा प्रयत्न केला कि हे राहते घर विकून टाकू. भाड्याच्या घरात राहूया पण तुझे औषधपाणी करूया. पण डॉक्टर तिने नाही ऐकले. आणि आता ही वेळ आली आहे”. असे म्हणून तो ओक्साबोक्शी रडायला लागला होता. “डॉक्टर काहीही करा तिला वाचवा. माझे घर मी तुम्हाला देऊन टाकतो, माझ्याकडे तेवढेच आहे पण तिला वाचवा. तो हात जोडून विनवणी करत होता.”
Leave a Reply