त्याच्या ह्या विचित्र वागण्याकडे बघून समरने स्वतःला सावरले. तो म्हणाला “मी काही कोणावर उपकार केले नाहीत. आणि राजश्रीवर तर नाहीच. मी माझे कर्तव्य केले, आणि एक मैत्रीचे नाते निभावले. परवा तुम्ही म्हणत होतात ना, तिचे लग्नाआधी काही प्रेमप्रकरण होते. तिचा कोणी मित्र होता म्हणून. तोच तिचा मित्र मी डॉ. समर आहे. आमची मैत्री होती.”
राजश्रीचा नवरा अवाक होऊन समरकडे बघत राहिला होता. त्या किल्ल्या त्याच्या हातात ठेवून समर तिथून निघून आला होता.
घरी परत येताना त्याने संगीताला विचारले, “हा कसला ग योगायोग? इतकी वर्षे ती मला कधीही भेटली नव्हती आता शेवटी कशाला मला भेटायला आली? मी तर तिला विसरूनही गेलो होतो. परमेश्वराने असा खेळ का खेळला असेल?”
संगीता शांतपणे बसून ऐकत होती. तो मात्र डोळ्यात पाणी आणून बोलत होता, “मी तर तिला पूर्णपणे विसरून गेलो होतो. मला कधी तुला हे सांगावे असे सुद्धा वाटले नव्हते. कारण हा भूतकाळ कधी मला इतका महत्वाचा वाटलाच नाही. तू please माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस.”
त्याच्या बोलण्यात तिला guilt जाणवत होती. तिला त्याची खूप दया आली होती. त्याचे म्हणणे अगदी खरे होते. तो एक भूतकाळ होता आणि नियतीने अचानक त्याच्या समोर आणून उभा केला होता. त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नव्हते.
तरीही तिने त्याला थोडा समजविण्याचा प्रयत्न केला होता, “समर कदाचित असे असू शकते कि राजश्रीचे तुझ्यावर खरोखरीच मनापासून प्रेम असेल. पण तिच्या वडिलांनी ज्या वेळेस तिचे लग्न लाऊन दिले असेल त्यावेळेस तिचा नाईलाज झाला असावा. आयुष्यभरात, तुला कुठेतरी एकदा भेटून हे सांगण्याची तिची तीव्र इच्छा असावी. आणि कदाचित ती खरोखरीच निर्दोष असावी.” आता संगीता बोलत होती, आणि समर ऐकत होता. “शेवटी कुठेतरी परमेश्वरालाही तिची दया आली असावी आणि तिला निदान शेवटचे पाणी तुझ्या हातून पाजण्याचे आयोजन त्याने घडवून आणले असावे. परंतु हे करताना तुझ्यावर अन्याय होऊ नये ह्याची सुद्धा त्या परमेश्वराने काळजी घेतली. आज हा एवढा मोठा धक्का सोसायला त्याने तुझ्या सोबत मला तुझ्याजवळ उभे केले आहे.” ती मनात येईल ते बोलतच होती. खरे तर काय बोलावे हे तिला समजत नव्हते. ती फक्त समरला आधार देण्याचा प्रयत्न करीत होती.
“समर मला माहित आहे, हे सगळे विसरणे फार कठीण आहे पण ह्याला एक हादसा समजून भूतकाळात जमा करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न कर. Try to accept it as co-incidence. तरच तू ह्या विचित्र प्रसंगातून लवकर बाहेर निघशील. मला समजतंय हे सगळे बोलणे फार सोपे आहे. पण कृतीत उतरवणे अतिशय अवघड आहे. But you know Samar, I am sure you can do it.”
त्याने तिचा हात घट्ट धरला होता. त्याला खूप धीर आला होता. सगळे बळ एकवटून तो म्हणाला, “संगीता मी तुझा खरच खूप आभारी आहे. ह्या अतिशय कठीण प्रसंगात तू माझी खरी अर्धांगिनी होऊन उभी राहिली आहेस. मी तुझ्यासाठी, माझ्या संगीतासाठी हा प्रसंग लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करीन. तू माझ्यासाठी खूप केले आहेस आणखीन एक छोटीशी गोष्ट करशील का? आजचा दिवस मला एकट्याला सोड, मी स्वतःला नक्की सावरीन. I promise you.”
असे सांगून तिच्याकडून त्यानेच हा एकांत मागून घेतला होता. तिला त्याची खूप काळजी वाटत होती. पण लांबूनच त्याच्यावर नजर ठेऊन ती बसली होती. ह्या विचित्र प्रसंगात ती त्याची काहीही मदत करू शकत नव्हती. पण तिचा तिच्या समरवर पूर्ण विश्वास होता. तो लवकरच ह्या सगळ्यातून बाहेर निघेल ह्याची तिला खात्री होती.
नियतीचा खेळ अजब असतो एवढे मात्र खरे हे तिला कळून चुकले होते.
सौ वैजयंती गुप्ते.
9638393779
Leave a Reply