जन्म. २८ डिसेंबर १८९९ पटियाला मधील सुनम येथे.
उधम सिंगांचे खरे नाव शेर सिंग असे होते. अवघ्या ७ वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरून आई बापाचे छत्र हरवले. त्यानंतरचे जीवन त्यांनी केंद्रीय खालसा अनाथालयामध्ये व्यतीत केले. येथेच त्यांना नवीन नाव मिळाले ते म्हणजे ‘उधम सिंह’! १९१७ साली त्यांच्या वडील भावाचे देखील निधन झाले आणि उधम सिंग पूर्णपणे एकाकी पडले. सर्वधर्मसमभाव या तत्वावर विश्वास ठेवणा-या मानवतावादी विराने स्वतःचे एक नाव तीन विभिन्न धर्माचे प्रतिनिधित्व करणारे “राम महंमदसिंग आझाद” असेही ठेवून घेतले होते. पंजाबातील अमृतसर येथे १३ एप्रिल १९१९ ला झालेल्या जालियानवाला हत्याकांडाचे ते साक्षीदार होते. त्यामध्ये गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. या घटनेत हजारो भारतीयांच्या हत्येस कारणीभूत कमांडर डायर व जनरल ओडवायर आहेत ही माहिती मिळाल्यानंतर या दोहोंचा प्रतिशोध घ्यायची खूणगाठ उधमसिंग यांनी मनात बांधली.
या हत्याकांडानंतर डायर व ओडवायर या दोघांनाही ब्रिटनमध्ये परत पाठवण्यात आले. अनेक निष्पापांची हाय लागून; डायर खंगून खंगून आणि पश्चातापदग्ध होऊन मेला. त्याला अर्धांगवायू झाला होता. मात्र साऱ्या क्रूर प्रकाराचा कर्ता करविता ओडवायर जिवंत होता. नव्हे तर नियतीनेच जणू त्याला जिवंत ठेवले होते – उधमसिंगांच्या सुडासाठी!
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत; वेळप्रसंगी अर्धपोटी राहूनदेखील ओडवायरचा माग काढत काढत उधमसिंग ब्रिटनला पोहोचले. एकीकडे ओडवायरशी मैत्रीचे नाटक करत दुसरीकडे त्यांनी अत्यंत चतुराईने ४५५ चे रिव्हॉल्वर मिळविले. तेही थेट ब्रिटीश सैनिकाकडून! आणि अखेरीस प्रतिशोधाचा दिवस ठरला… १३ मे १९४०.
स्वच्छ दाढी करून, सुट-बूट आणि फेल्ट हॅट अशा पोषाखात लंडनच्या ‘कॅकस्टन हॉल’मध्ये जेथे ओडवायर चे भाषण होते तेथे उधमसिंग पोहोचले. ओडवायर च्या भाषणानंतर सभा संपली; इतक्यात मागच्या रांगेत उभे असलेले उधमसिंग विद्युतवेगाने पुढे सरसावले. क्षणार्धात पिस्तुल काढून त्यांनी ओडवायरवर गोळ्या झाडल्या. धाड् धाड् … ओडवायर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडला. २९ वर्ष वाट बघत असलेल्या राष्ट्रीय प्रतिशोधाचे चक्र संपले होते.
ब्रिटीशांनी उधमसिंग यांना याकरिता ३१ जुलै १९४० रोजी पेंटनव्हिले तुरुंगात फाशी दिली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply