नवीन लेखन...

दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे

The Great Indian Peninsula Railway

१६ एप्रिल १८५३. हाच तो दिवस. बरोबर १६४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बोरीबंदर ते ठाणेपर्यंत ‘लोखंडी रस्त्या’वरून ‘आगीची गाडी’ गाडी धावली आणि मुंबई ‘महा मुंबई’ म्हणून भराभर वाढू लागली. चित्रपटात ज्याप्रमाणे ‘हिराॅईन्स’चं आकर्षण अनेक जणांना असतं व त्या हिराॅईनला एक झलक पाहाण्यासाठी जशी थेटरात गर्दी होते, तशी गर्दी पुढे मुंबईत रेल्वे या हिराॅईननं खेचली. मुंबईच्या अशा दोन हिराॅइन्स आहेत की ज्यामुळे सर्व देशातून या मुंबई नगरीत लोकं सुरुवातीच्या काळात खेचली गेली, एक रेल्वे आणि दुसरी मिल..!!

मुंबईची, नव्हे देशाची ही पहिली हिराॅईन आज १६४ वर्षांची झाली. इतकं वय होऊनही जराही न थकता ही आपला करिश्मा अजून टिकवून आहे ती तिच्या कर्तबगारीमुळे. पण कर्तबगारी दाखवताना तिला तिच्या जन्माच्यावेळी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. अनेकांचा विरोध, अफवा यांना पुरून उरत हिचा जन्म शेवटी झालाच व पुढे सर्वांचे डोळे दिपण्याएवढै पराक्रम हिने गाजवला व अजुनही गाजवते आहे. ‘रेल्वे’ ही स्त्री लिंगी मानली गेली आहे आणि आपल्या देशात कोणत्याही स्त्रीचा जन्म आजही संघर्षातूनच होतो. स्त्री भ्रुणाची जगण्याची इच्छा पुरूष भ्रुणाहून जबर असते असं शास्त्र सांगते आणि ते ‘ती’ रेल्वेच्याबाबतीतही खरं ठरलं.

देशातील मुंबईत रेल्वे जरी १६ एप्रिल १८५३ रोजी धावली असली तरी लंडन-अमेरीकेत ती यापुर्वीच अवतरली होती व तिची उपयुक्तताही सिद्ध झाली होती. आपल्या देशाचे तत्कालीन राज्यक्रते असलेल्या ब्रिटीशांना आपल्या देशातील त्यांच्या वाढत्या प्रभाव क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक जलद व एकाच वेळेस जास्त वाहतूक करू शकणाऱ्या वाहनाची गरज भासू लागली होती व त्यासाठी त्यांच्यानजरेसमोर रेल्वेएवढं सोयीचं साधन त्याकाळी दुसरं नव्हतं.

इकडे मुंबईतही रेल्वे सुरू करण्याच्या हालचाली १८४३ सालीच सुरू झाल्या होत्या. मुंबईत रेल्वे सुरू करावी म्हणून याच साली ‘दि ग्रेट इस्टर्न रेल्वे कंपनी’ स्थापन केली व त्यात सार्वजनिक कार्यात नेहेमी पुढाकार घेणारे जगन्नाथ शंकरशेट व सर जमशेटजी जिजीभाई या दोघांनी पुढाकार घेतला होता. नाना शंकरशेट व सर जमशेटजी जिजीभाई यांच्या सहीने तसा अर्ज लंडनला रवाना झाला. दि. १९ एप्रिल १८४५ रोजी कंपनीच्या चालकांची सभा टाऊन हाॅलमधे (आताची एशियाटीक सोसायटी) भरली. या सभेत रेल्वेच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी ‘दि इनलॅन्ड रेल्वे असोसिएशन’ ही समिती नेमून या समितीच्या अध्यक्षस्थानी कर्नल जर्व्हीस या ब्रिटीश अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. समितीत नाना व जमशेटजींव्यतिरिक्त मिस्टर विलोधवी आणि मुंबईचे आणखी एक दानशूर व्यक्तीमत्व फ्रामजी कावसजी यांचाही समावेश करण्यात आला होता.

व्यापार रक्तात मुरलेले ब्रिटीशही तिकडे लंडनमधे काही गप्प बसलेले नव्हते. मुंबईच्या हालचालींवर त्यांची बारीक नजर होती. नामांच्या अर्जाला प्रतिसाद म्हणून सन १८४५ साली ब्रिटीशांनी कंपनीची सुत्रं आपल्या हाती ठेवण्यासाठी लंडनला ‘दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे’ ही कंपनी स्थापन केली व मुंबईतील कंपनीच्या संचालकांना त्या कंपनीत घेतलं. त्या कंपनीच्या वतीने मिस्टर चॅपमन नावाचा एक अधिकारी मुंबईत प्रत्यक्ष पाहाणी करण्यासाठी पाठवला. चापमनने पाहाणी करून जुलै १८४८ मधे मुंबईत ३५ कि.मि.ची रेल्वे बांधण्याची परवानगी दिली.

ब्रिटीशांनी मुंबईत सार्वजनिक उपयोगाचं जे जे केलं, त्यासाठी त्यांनी त्याकाळच्या मुंबईकरांकडून वर्गणी जमवून केलं हे इतिहासात नमूद आहे. त्यालाच जागून त्यांनी मुंबईकरांना रेल्वेसाठी वर्गणी (कंपनीचे शेअर्स) घेण्याचं आवाहन केलं. त्यासाठी मोठमोठ्या जाहिराती लावण्यात आल्या. सुरूवातीला हा सरकारचा आपले पैसे लुबाडून लंडनला घेऊन जाण्याचा डाव आहे असं समजून लोकांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. दुसरं म्हणजे अशी काही गाडी असती तर आपच्या ज्ञानी ऋषी-मुनींमी ती अगोदरच सांगीतली असती अशी लोकांची भाबडी समजूत असल्यामुळे लोकांचा विश्वासही बसेना. शेवटी हे बघून कंपनीने स्वत:चं भांडवल म्हणून स्वत:चा काही हिस्सा टाकला. नाना, जमशेटजी, फ्रामजी यांनीही काही शेअर्स घेतले व मग मात्र पुढे लोकांनी कंपनीचे शेअर्स घेतले.

पुरेसे भांडवल जमल्यानंतर सन १८५० मधे कंपनीच्या कामास सुरूवात झाली. दि. ३१ आॅक्टोबर १८५० रोजी मिस्टर विलोधवी यांच्या हस्ते शिव (आताचं अपभ्रष्ट नांव सायन) येथे रुळ टाकण्याची सुरूवात झाली व पुढं सर्वच काम त्वेरेने होऊन पुढच्या तीन वर्षांनी त्या रुळांवरून दि. १६ एप्रिल १८५३ या दिवशी रेल्वे धावलीसुद्धा.

मुंबई ते ठाणे असा लोहमार्ग टाकण्यापूर्वी व टाकतांनाही कंपनीसमोर काही कमी अडचणी आल्या नाहीत. अनेक घटना, अफवा, अंधश्रद्धांवरर मात करून हे काम कंपनीनं पूर्ण केलं आणि मुंबईला आताचं स्वरूप मिळवून दिलं. या अडचणी, लोकांच्या अंधश्रद्धा, स्टेशन्सची बांधकामं, रेल्वेसाठीचे सुरूवातीचे मजेशीर नियम, त्याकाळी असलेली ‘शिवाशिव’ आणि प्रत्यक्ष प्रवासाचं वर्णन पुढच्या भागात सांगेन..

या ऐतिहासिक घटनेला १६४ वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने हा लेख.

— नितीन साळुंखे
9321811091

संदर्भ-
1. मुंबईचा वृत्तांत -ले. मोरो विं शिंगणे व बापू आचार्य.
2. मुंबईचे वर्णन -ले. गोविंद मडगावकर
3. स्थल-काल-ले. डाॅ. अरूण टिकेकर

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा लेखमाला – लेखांक २६ वा

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

1 Comment on दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे

  1. मा नितिन साळुंखे सर सप्रेम नमस्कार दि ग्रेट इंडियन पेननसूला ह्या कंपनीची दस्ताऐवज भारतात कोठे बघावयास मिळेल.समजा भारतात नसेल तर लंडन मधिल पत्ता अथवा ए मेल सान्गू शकाल काय तसदी बद्दल क्षमस्व

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..