पोटासाठी, कुटुंबासाठी अर्थार्जन करणे, हा एक पुरुषार्थ. यासाठी पुरुष नोकरी, व्यवसाय किंवा काम करतच असतो. नोकरी पेशातली अगदी शिपाई ते कलेक्टर पर्यन्त नोकरीत असतात. या सगळ्यांमध्ये मला सर्वात जास्त कीव म्हणा, दया म्हणा, हळहळ म्हणा किंवा सॉफ्टकॉर्नर म्हणा आहे तो “मालगाडीचा गार्ड” या पेशा बाबत…..
प्रवासासाठी जगातलं सर्वात उत्तम साधन म्हणजे रेल्वे. हे लहानपणापासून तयार झालेलं मत आज पन्नाशीत आलो तरी कायम आहे. माझं रेल्वे वरच प्रेम अगदी जॉर्ज फर्नांडिस,ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव, सुरेश प्रभू किंवा पियुष गोयल यांच्या पेक्षा तुसुभर ही कमी नाहीयेय.
तर, लहानपणापासून रेल्वे ने प्रवास करत असतांना क्रॉसिंग* साठी गाडी थांबली की त्या स्टेशनवर आधीपासून थांबलेली मालगाडी दिसे, कधी मी ज्या रेल्वेत आहे ती रेल्वे एखाद्या छोट्या स्टेशनवर न थांबता पुढे जात असेल तेंव्हा त्या स्टेशनवर मालगाडी दिसे, कधी मी ज्या स्टेशनवर उभा आहे तिथून मालगाडी जाताना दिसे, तर कधी आम्ही टवाळखोर मित्र चहा ची तल्लफ आली म्हणून रात्री बेरात्री स्टेशनवर जाऊ तेंव्हा एखादी मालगाडी जात असलेली दिसे….
(* क्रॉसिंग- ज्या भागात डबल रेल्वे ट्रॅक नाही तिथे एखाद्या स्टेशन वर एक गाडी थांबवून समोरच्या गाडीला ट्रॅक उपलब्ध जरून दिला जातो)
या प्रत्येक दिसण्यात मी दयाळू, कनवाळू, कौतुकाने पाहत असे ते मालगाडी च्या गार्ड ला. त्या अनोळखी गार्ड ला आवर्जून टाटा करत असे नव्हे अजूनही करतो.
थोडासा विचार करा, कित्ती अवघड आहे हा जॉब ! मुळात मालगाडी ला कुठलाच time table नाही. Duty या स्टेशन पासून ते त्या स्टेशन पर्यन्त. किती वेळ लागणार? माहित नाही. पुढचा स्टॉप कुठे? माहीत नाही. या स्टेशन वर कितीवेळ थांबणार? माहित नाही. स्टेशनवर गाडी थांबली तरी ‘हा’ स्टेशन च्या कितीतरी बाहेर. चहा घेण्याचा mood झाला तरी 1km पायी जा चहा प्या तितकंच परत या. कधी रात्रीच्या किर्रर्रर्र अंधारात 2/4 तास घालावा. आजूबाजूला काहीच दिसत नाही. समोर अजस्त्र बोगी, मागे फक्त अंधार, डावीकडे – उजवीकडे अंधार……
त्यात कधी हा एखाद्या बोगद्यात सुद्धा असू शकतो…..
तर कधी गावाबाहेरच्या स्मशानभूमी जवळ….. जळणाऱ्या प्रेताच्या ज्वाळा पाहत…..
कधी तो थांबून असतो रणरणत्या उन्हात, 48 डिग्री तापमानात…..
कधी थांबून असतो जीवघेण्या थंडीत, कुडकुडत…
तर कधी राक्षसी पावसात, आडोश्याला….
तर कधी तोंड देतो दबा धरून बसलेल्या चोरट्यांना….
माहिती म्हणून सांगतो, मालगाडीच्या गार्डची कॅबिन ही सुविधा शून्य कॅबिन असते. त्यात ना लाईट असतो, ना फॅन असतो, ना बर्थ असतं इतकंच काय त्या कॅबिन मध्ये वॉशरूम च्या नावाखाली फक्त भलं मोठं छिद्र असतं, रुळा कडे उघडणारं, पाणी सुद्धा नसतं हो त्या कॅबिन मधे…..
तळ टीप :- वाचनसंस्कृती जेंव्हा जोरात होती त्या काळी “पॉकेट बुक” ची विक्रीही जोरात होती. त्याचे लेखकही ठरलेले होते. वेदप्रकाश पाठक, जेम्स हेडली चेस, ओमप्रकाश शर्मा, वेदप्रकाश शर्मा,….
तेंव्हा आणि आजही मला असं वाटायचं/वाटतंय की हे पॉकेटबुक चे तमाम लेखक पूर्वाश्रमी नक्कीच मालगाडीचे गार्ड असावे! तेंव्हाच त्यांना इतका वेळ, इतका एकांत आणि एकाकीपणातुन सुचलेल्या कल्पनांची परिणीती म्हणजे एक एक पॉकेटबुक…..
फोटो सौजन्य- अमोल निळेकर आणि Shailesh Deogaonkar
— विनोद डावरे, परभणी
06-09-2018
●● सहजच सुचलं – 79 ●●
Leave a Reply