गणपतीची फक्त अर्धीच मूर्ती –
उत्तर कन्नडमधील बनवासी ही प्राचीन कर्नाटकाची राजधानी होती. येथे कदंब कुलातील राजांची सत्ता होती . बनवासी हे काशी वाराणसी क्षेत्रा इतकेच प्राचीन आहे. याला दक्षिणेची काशी असे म्हणतात. येथे एक मधुकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर कदंब कुळातील राजा मयूर शर्मा याने बांधले आहे. ते १५०० वर्षांपूर्वींचे असून कर्नाटकातील सर्वात जुन्या देवळांपैकी एक देउळ आहे. या देवळात एका अखंड दगडातून कोरलेला ७ फुटांचा नंदी आहे. वेगळा असा दीपस्तंभ ( जयस्तंभ ) आहे. प्रत्येक ठिकाणी अत्यंत क्रुद्धमुद्रेत दिसणारा नृसिंह येथे चक्क शांत व प्रसन्न मुद्रेत पाहायला मिळतो. ऐरावतावर विराजमान इंद्र आणि शची यांची दुर्मिळ मूर्ती येथे पाहायला मिळते.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे एक गणेश मंदिर असून येथील गणेश मूर्ती ही अर्धीच आहे. वास्तविक एखादी मूर्ती भंगली तर ते अशुभ मानून अशा मूर्तीचे तात्काळ विसर्जन केले जाते. परंतु येथे मात्र या अर्ध्याच मूर्तीची रोज वर्षानुवर्षे यथासांग पूजा केली जाते. या मूर्तीच्यावर थेट अभिषेक होईल असे एक तांब्याचे अभिषेक पात्र टांगलेले असून अभिषेकानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी शिवपिंडीप्रमाणे व्यवस्था आहे .
या मूर्तीचा उरलेला अर्धा भाग हा मूळ काशी शहरामध्ये आहे असे सांगितले जाते. येथे असलेला अर्धा भाग पाहता उरलेला अर्धा भाग काशी नगरीत सापडणे अशक्यच आहे.
माघी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एकमेव अशा या एका अर्ध्या गणेशमूर्तीचे हे आख्यान !
( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा. )
— मकरंद करंदीकर.
Leave a Reply