नवीन लेखन...

सिंधूदुर्गातील “कांदळगाव” – ऐतिहासिक महत्त्व ..!

॥ श्री देव रामेश्‍वर प्रसन्न ॥
॥ श्री देव रवळनाथ प्रसन्न ॥
॥ श्री देवी भराडी माऊली प्रसन्न ॥
सिंधूदुर्गातील “कांदळगाव” – ऐतिहासिक महत्त्व ..!
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कांदळगाव हे एक ऐतिहासिक गाव आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. मालवण एस.टी. स्टॅंड पासून अवघ्या ७ ते ८ कि.मी. अंतरावर असलेले कांदळगाव याला ऐतिहासिक महत्त्व आहे. कांदळगावचे श्री देव रामेश्‍वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा श्री देव रामेश्‍वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो.
सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना समुद्रातील भरतीच्या पाण्याने तटबंदीचे दगड ढासळत होते. किल्ला आकार घेत असताना लावलेले दगड कोसळत होते. बांधकामात सतत व्यत्यय येत होता. महाराज व्यथित झाले. त्याच वेळी त्यांना दृष्टांत झाला. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्‍वर त्यांच्या स्वप्नात आले. ”मालवणच्या उत्तरेकडे माझी पिंडी आहे. ती उघड्यावर असून तिच्यावर प्रथम छत्र उभे कर…आणि नंतरच किल्ल्याचे बांधकाम सुरू कर…!” रामेश्‍वराने दिलेल्या दृष्टांतानुसार छत्रपतींची स्वारी उत्तरेकडे शिवपींडी शोधावयास निघाली. जंगलमय, सखल भाग, कांदळवन, पाणी व चिखलाची दलदल असा परिसर असलेल्या एका राईमध्ये महाराजांना पिंडी आढळून आली.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री देव रामेश्‍वराच्या सांगण्यानुसार शिवपिंडीवर एका रात्रीत घुमटी बांधली. स्वयंभू पाषाणाला पुराचे पाणी लागू नये यासाठी घुमटीच्या चारही बाजूने कठडा उभारला. त्या घुमटीसमोर आठवण म्हणून वटवृक्षाचे रोपटे लावले. ते वडाचे झाड सध्या ‘शिवाजीचा वड’ म्हणून ओळखले जाते. घुमटी बांधून झाल्यानंतर किल्ल्याच्या बांधकामात कोणतेही विघ्न आले नाही आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि कांदळगाव यांचे नाव अधिक दृढ करणारा आणि या नात्याची आजच्या पिढीला साक्ष देणारा असा हा उत्सव. रामेश्‍वर पंचायतन सकाळी वाजत गाजत बाहेर पडते.
पालखी, तरंगे व वारीसुत्रांसह सिंधुदुर्ग किल्ल्यावर निघालेली ही स्वारी मार्गातील कामरादेवी, सीमा म्हारतळ, मारुती घाटी यांना सांगणे करून पुढच्या प्रवासाला निघते. गांगोचा अवसर कोळंब खाप्रेश्‍वराला भेटायला जातो. कोळंब पुलावर रामेश्‍वराच्या स्वारीचे शाही स्वागत होते. त्यानंतर मेढा जोशी महापुरुष मांडावर देव स्थिर होतात. या मांडावर इतर वारीसुत्रे विसर्जित होतात. मात्र रामेश्‍वराचा अवसर विसर्जित होत नाही. दुपारी श्री देव रामेश्‍वर आपल्या लवाजम्यासह जोशींच्याच होडीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातो. किल्ल्यात प्रवेश करताना २१ नारळ फोडले जातात. हा सोहळाच अपूर्व असा असतो.
कांदळगाव गावची एकी वाखाणण्याजोगी आहे.
शिवकालीन बरोबरच पांडवकालीनही वारसा या गावाला लाभला असल्याचे स्पष्ट होते. कांदळगाव गावाला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. या गावामध्ये पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे प्रमाण मुबलक आहेत. दसरोत्सव, रामनवमी, हरिनाम सप्ताह, श्री देव रामेश्वर मंदिर वर्धापन दिन, लक्ष्मीपूजन, राखणीचा नारळ आणणे आदी धार्मिक कार्यक्रम गावामध्ये मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. निर्मळ मनाने त्याला साद घातली की त्याचा आशीर्वाद लगेच मिळतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. रामेश्वराच्या आशीर्वादाने या गावाला पर्यटनदृष्टय़ा खास दर्जा प्राप्त झाला आहे.
देश विदेशातील असंख्य भाविक रामेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. या मंदिराची रचना, येथील निसर्गरम्य वातावरण, गावातील ऐतिहासिक पाऊलखुणा, येथील प्रथा-परंपरा हे सारेच अनुभवण्याजोगे आहे. रामेश्वर मंदिरातील विविध उत्सव आणि या उत्सवांचा थाटमाट आपल्याला श्रद्धेची प्रचिती देत असतो.
श्री देव रामेश्‍वर मंदिर, कांदळगाव,मालवण,सिंधूदुर्ग
– गणेश उर्फ अभिजित कदम

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..