जगाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या सर्व शहरांचा वेग २१ व्या शतकात मुख्यतः रेल्वेवर अवलंबून आहे. आजच्या जगातली ही प्रचंड वेगवान आणि बहुसंख्य प्रवासी एकाच क्षणी वाहून नेणारी यशवंत प्रवासी व्यवस्था; ही प्रवासी व्यवस्था रेल्वे हे- आधुनिकतेचं-यंत्रयुगाचं अपत्य आहे आणि उद्योगजगताच्या वाढीचे एक महत्त्वाचं साधन, महत्त्वाचं कारणही आहे.
रेल्वेशिवायचं जग ही कल्पनाही आज अशक्य वाटते; पण रेल्वे अस्तित्वात नसण्याचाही एक काळ होता. आश्चर्याची किंवा गमतीची गोष्ट म्हणजे, तो काळ `रेल्वेमुळे आपल्या सुरळीत, स्वास्थपूर्ण जगण्याचा घात होईल’ अशा भीतीदायक समजुतीचाही होता. मुळात, त्या काळातल्या लोकांना `रेल्वेची गरज का आहे’ हेच कळत नव्हतं . त्यांच्या दृष्टीनं तर तेव्हाही सारं काही आलबेल सुरू होतं! ते दिवस स्वबळावरच्या घोडदौडीचे होते. कुठल्याही भागात वेगाने पोहोचण्यासाठी घोडेस्वारांची मक्तेदारी निर्विवाद होती.
घोड्यांवरचा प्रवास, टापांचे आवाज, ते ऐटबाज वातावरण… ही गोष्ट फार वर्षांपूर्वीची वाटते खरी, पण तरी हा काळ तसा फार जुना नाही. ते दिवस होते जेमतेम दोनशे वर्षांपूर्वीचे, १९ व्या शतकाच्या प्रारंभीचे. इ.स. १८०० ते १८२५ हा तो काळ. जगण्याचा वेग अडून राहिला आहे अशी चिन्ह तर फारशी कुणालाच दिसत नव्हती. मात्र याच पंचवीस वर्षात सामान्य माणसांच्या नकळत काळाने मात्र सांधा बदलला होता. `रेल्वे’ नावाचं वेगवान स्वप्न द्रष्ट्या माणसांना खुणावू लागलं होतं.
वाफेच्या इंजिनाचा शोध जॉर्ज स्टीफन्सन यांनी लावलेलाच होता. एका नव्या क्रांतीला सुरुवात झालेलीच होती.
(क्रमशः)
— डॉ. अविनाश वैद्य
या सदरात आपण रेल्वेचा इतिहास आणि रेल्वेविषयी रंजक माहिती वाचणार आहोत..
Leave a Reply