ग्लूटेन फ्री डायट हे नाव आता आपल्याला नवीन राहिलेले नाही. तरीही ज्यांना याविषयी माहिती नसेल त्यांच्यासाठी थोड्क्यात सांगतो. ग्लूटेन हे गहू, जव आणि नाचणी यांसारख्या धान्यांत सापडणारे एक प्रोटीन असते. काहीजणांना ते न पचल्याने अनेक त्रास होतात; पैकी सगळ्यात मोठा त्रास म्हणजे Celiac disease. या रोगात ग्लूटेनयुक्त पदार्थ न पचल्याने लहान आतड्यांना इजा पोहचणे, अंगावर रॅशेस येणे वगैरे लक्षणं दिसतात. परिस्थिती गंभीर झाल्यास लहान आतड्यांच्या कर्करोगाचीदेखील शक्यता असते असे सांगितले जाते.
आधुनिक शास्त्रात यावर इलाज म्हणून जन्माला आलेली संकल्पना म्हणजे ग्लूटेन फ्री डायट. अर्थात ज्या पदार्थांत ग्लूटेन आहे ते टाळणे आणि त्याचे पर्याय शोधणे. थोड्क्यात; आहारातून गहू, जव इत्यादि गोष्टी हद्दपार करणे. आता या ग्लूटेन फ्री डायटबाबत आयुर्वेदाचा दृष्टिकोन जाणून घेऊ.
१. एखादा पदार्थ पचत नसल्यास तो टाळणे हा मार्ग नसून तो कसा पचेल यावर विचार करणे हे अधिक योग्य ठरते. थोड्क्यात आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेला ‘अग्निविचार’ हा याठिकाणी महत्वाचा आहे.
२. ग्लूटेन फ्री डायटच्या दुष्परिणामांतील सर्वात प्रमुख म्हणजे पोषणमूल्यांची कमतरता आहे असे आधुनिक आहारशास्त्रच सांगते. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.
३. ग्लूटेनची समस्या प्रामुख्याने ब्रेडसारख्या बेकरी उत्पादनांत मोठी असून त्यामागे किण्वीकरण प्रक्रियेचा मोठा हात आहे हे लक्षात घेणे महत्वाचे. भारतासारख्या देशातील पोळी/चपाती, दलिया यांसारख्या गव्हाच्या पदार्थांना तोच न्याय लावणे योग्य होणार नाही. याकरताच मी शीर्षकात ‘गवगवा’ हा शब्द वापरला. ग्लूटेन फ्री डायट ही संकल्पना सध्या आपल्या देशात जोमाने रुजू पाहत आहे. हे चित्र समाधानकारक नक्कीच नाही.
४. ज्यांना पोळी/चपाती पचायला जड जाते त्यांनी ग्लूटेन फ्री डायटच्या मागे न लागता भाकरी वा थेट निखारे अथवा गॅस बर्नरवर भाजलेले फुलके यांचा आहारात समावेश करावा. तसेच जेवताना पिण्यासाठी गरम पाणी वापरावे.
५. आयुर्वेदीय उपचार आणि आहारातील नाममात्र पथ्ये यांच्या सहाय्याने ‘ग्लूटेन फ्री डायट’ पासून ‘फ्री’ राहण्यास मदत होते. त्यामुळे चपाती पचत नाही म्हणून लगेच आपल्याला ग्लूटेन फ्री डायटच हवे असा गैरसमज करून घेऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आयुर्वेदाने गहू हे धान्य ‘संधानकर’ म्हणजे शरीराला जोडणारे/ बळकटी देणारे सांगितले आहे. पंजाबसारख्या प्रचुर मात्रेत गहू पिकवणाऱ्या राज्यातील नागरिकांची शरीरयष्टी याची साक्षच नाही का? त्यामुळे एखाद्या संकल्पनेमागे वाहवत जाऊन उत्तम पोषक अन्न खाण्याच्या आनंदाला मुकू नका!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply