नवीन लेखन...

पाकिस्तान, चीन, भारत आणि अफगाणिस्तानातला वाढता दहशतवाद

इसिसची अफगाणिस्तानपर्यंत मजल
तालिबान आणि इसिसमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे नगरहार प्रांतातील हजारो नागरिकांनी आपले घरदार सोडून पळ काढला आहे. इसिस अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत. या प्रांतात पाय ठेवताच इसिस बरोबरच्या काही मिनिटांच्या लढाईनंतर तालिबान्यांनी पळ काढला. आतापर्यंत इराक आणि सीरिया यासारख्या देशातच ताबा घेण्यासाठी लढा देत असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया अर्थात इसिस या जगातील सर्वाधिक धोकादायक दहशतवादी संघटनेने आता अफगाणिस्तानपर्यंत मजल मारली आहे. अफगाणवर राज्य करणार्‍या तालिबान्यांचा पराभव करून इसिसने नगरहार प्रांत ३० जुनला ताब्यात घेतला आहे.

अफगाणी लष्करी जवानांचे मनोधैर्य खचले
पश्चिम अफगाणिस्तानात एका लष्करी पथकावर तालिबानी गनिमांनी २९ जुनला हल्ला चढवला, त्यात अकरा अफगाणी जवान मारले गेले. अनेक जवान जखमी झाले. अफगाणिस्तानचे लष्कर प्रथमच स्वबळावर तालिबानी गनिमांच्या विरोधात लढत आहे. तालिबानी गनिमांच्या या कारवायांना तोंड देण्यास अफगाणचे नवशिके लष्कर कमी पडत असून त्यामुळे लष्करी जवानांचे मनोधैर्य खचले आहे.

पाकिस्ताने उत्तर वझिरीस्तानमध्ये मोठ्या संख्येत अतिरेकी घुसविले, ते अफगाणिस्तानच्या फौजांसोबत लढण्यासाठीच. हे नापाक अतिरेकी तालिबान्यांना येऊन मिळाले. त्यामुळेच तालिबान्यांची हिंमत वाढली. आज अफगाणिस्तानमधील २५ जिल्ह्यांवर तालिबान्यांनी कब्जा केला आहे.

अफगाणिस्तानजवळ या अतिरेक्यांशी सामना करण्यासाठी आवश्यक एवढे सैनिक नाहीत. तालिबान्यांजवळ पाकिस्तानने पुरविलेली अत्याधुनिक शस्त्रे आहेत. यावरून अफगाणिस्तानमध्ये अस्थिर स्थिती निर्माण करण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध होते.

अफगाण संसदेवरील 22 जून २०१५ हल्ला
अफगाणिस्तानच्या संसदेवर २२ जूनला तालिबानी अतिरेक्यांनी केलेला आत्मघाती हल्ला हा, येत्या वर्षाअखेर अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो फौजा काढून घेतल्यानंतर उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीची एक झलक आहे. १ जानेवारी ते ७ मे २०१५ या छोट्या कालावधीत तालिबानी आणि सुरक्षा फौजांमध्ये झालेल्या लढाईत अफगाण लष्कराच्या २३२२ जवानांना प्राण गमवावे लागले.

अफगाणी सैन्य अफगाणिस्तानचे रक्षण करु शकेल का?
सध्या अफगाणी सैन्याची संख्या एक लाख ७० हजार आहे. मारल्या जाणार्‍या अफगाणी सैनिकांची संख्या ही प्रत्येक वर्षी २५०० ते ३००० च्या मध्ये आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अफगाणी सैनिक शहिद असतील तर त्यांची इतर दहशतवाद्यांशी लढण्याकरिता जे प्रोत्साहन लागते ते किती वेळ टिकेल.? काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस तालिबाननी अफगाणिस्तानमध्ये पूर्ण सत्ता मिळवली होती त्यावेळेला लाखो अफगाण सैनिक न लढताच पळून गेले होते.

अपयश राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांच्या परराष्ट्र धोरणाचे
अमेरिकन फौजा गेल्यास तालिबानी शांत होतील, हा अफगाणचा होरा पूर्णपणे चुकला. गेल्या पाच वर्षांत म्हणजे 2009 पासून 2014 पर्यंत तालिबानी हल्ल्यांत जखमी झालेल्यांची आणि मृत्यु झालेल्यांच्या संख्या वाढत आहे. 2009 साली जखमी झालेले 2412 होते आणि मृत्यु झालेले 3556 होते. हा आकडा 2014 साली 3699 आणि 6849 एवढा झाला.

या अपयशापेक्षासुद्धा जास्त महागडे अपयश आहे, राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांच्या परराष्ट्र धोरणाचे. त्यांनी निवडून आल्यावर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र धोरणात भारताला अनुकुल असलेले अंग जाणीवपूर्वक दूर करण्यास सुरूवात केली. त्यांच्या मांडणीनुसार अफगाणिस्तानातील शांततेसाठी पाकिस्तान आणि चीनशी खास मैत्री करणे गरजेचे आहे. या हेतूने त्यांनी निवडून आल्यावर पाकिस्तान व चीनचा दौरा केला. त्यांना असे वाटत होते की जर अफगाणिस्तानने पाकिस्तानशी खास मैत्री केली तर पाकिस्तान लष्कर आणि सरकार तालिबान्यांना आवर घालू शकेल. अलीकडच्या घटना बघितल्या म्हणजे त्यांचा अंदाज साफ चुकला असेच म्हणावे लागते.

पाकिस्तान – अफगाणिस्तान – चीन
तालिबान आणि पाकिस्तानी लष्कर यांची खास मैत्री आहे. आज तालिबानला पैशाची कमकरता नाही. याचे कारण त्यांना अफूच्या व्यापारात अब्जावधी डॉलर्स सहज कमावता येतात. अमेरिकेचा आता अफगाणिस्तानातील रस संपला आहे. चीनने तर अफगाणिस्तानात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. शिवाय चीन त्या देशात मोठमोठे प्रकल्प उभारत आहे.

अफगाणिस्तानातील राजकीय अस्थैर्य चीनला परवडणारे नाही. अफगाणिस्तानातील ही परिस्थिती, तेथील पोकळी आणि अस्थिरता ही आपल्यासाठी एक संधी आहे, असे चीनला वाटू लागलेले दिसते. त्या देशाच्या मध्यस्थीने अलीकडेच चीनच्या शिनशियांग प्रांतात अफगाणिस्तानचे सरकार आणि ‘तालिबान’ यांच्यात गुप्त वाटाघाटी घडविण्यात आल्याचे वृत्त आहे. याच भागात जिहादी दहशतवाद सुरु आहे. पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत महासंघाने शीतयुद्धाच्या काळात आणि गेली तेरा वर्षे अमेरिकेने ज्या देशात आपले हात पोळून घेतले आणि त्या बदल्यात फारसे काहीही साधले नाही, त्या अफगाणिस्तानच्या समस्येत लक्ष घालण्यास चीन का उद्युक्त झाला असावा, हा एक प्रश्नच आहे; त्यामागे व्यापारवाढ आणि खनिजसंपदा मिळवणे हाच उद्देश आहे.

दहशतवादाचा भस्मासुर चीनवर ऊलटणार?
आजचा अमेरिका आणि याआधी ब्रिटनला अफ़गाणिस्तानमध्ये एकही मोठे युद्ध जिंकता आलेले नाही. अफ़गाणिस्तानला पराभूत करण्यात दुसर्‍या महायुद्धातील विजेते चर्चिलही अपयशी ठरले होते. १९८०-९० च्या दशकात महाशक्ती रशियाचा येथेच पराभव झाला होता. जगातील सर्वात शक्तिमान देश म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेने १३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपली हार पत्करून अफ़गाणिस्तानमधून माघार घेतली आहे. अफगाणिस्तानने पुन्हा एकदा हे दाखवून दिले की, आमच्या येथे येऊन कोणी विदेशी शक्ती राज्य करू शकत नाही. गेल्या अनेक शतकांमध्ये कितीही महाशक्तींनी, हल्लेखोरांनी अफगाणिस्तानला आपला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच्या सर्व अपयशी ठरले. आणि याच विचारात चीनने आता ऊडी मारुन मोठा धोका घेतला आहे.

परंपरागतपणे पश्तुन लोक स्वत:वर कोणाचीही हुकमत चालवून घेत नाहीत. पाकिस्तान आणि चीन तालिबानबाबत नेमकी हीच गोष्ट विसरत आहेत. तालिबानला प्रभावित करणे दिसते तेवढे सोपे नाही. तालिबानचे डय़ुरांड सीमारेषेबाबत पाकिस्तानशी तीव्र मतभेद आहेत. चीनकडे अफगाणिस्तानातील संस्कृती आणि भाषा समजणारे तज्ज्ञ नाहीत. त्यांना पाकिस्तानवर विसंबून राहावे लागेल. शिवाय काही कालावधीनंतर चीनला हे लक्षात येईल की, सर्व प्रश्न केवळ आर्थिक मदतीने संपणार नाहीत आणि समस्येचे भांडार असलेल्या अफगाणिस्तान-पाकिस्तान देशात जास्तीत जास्त स्वत:ला गुंतवून घेतल्याने स्वत:चे हात पोळण्याची शक्यता जास्त आहे. पाकिस्तान दहशतवादाचा एक भस्मासुर बाळगून आहे, तो त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे आणि त्याचा फटका चीनलादेखील बसू शकतो.

भारतावर काय परिणाम होणार?
अफगाणमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. यात तंत्रज्ञ, अभियंते, कुशल कारागीर यांचा समावेश आहे. हे भारतीय अफगाणमधील विविध प्रकल्पांमध्ये सेवा देत आहेत.

इसिसची कार्यशैली पाहता, अफगाणमधील भारतीयांचे अपहरण होण्याची शक्यता आहे. भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे. तालिबानी अतिरेक्यांनी जागोजागी मांडलेल्या उच्छादामुळे भारतीयांना पुरेसे संरक्षण पुरविण्यासाठी त्या देशाकडे पुरेसे लष्कर नाही. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून पूर्ण बाहेर पडलं तर इस्लामिक स्टेट, तालिबान, हक्कानी, अल कायदा या संघटनांच्या कारवाया वाढणार आहे. ज्यावेळेस अफगाण तालिबान सत्तेमध्ये येईल, त्यावेळेस अफगाणिस्तानमधला मोठा भाग पाकिस्तानच्या दबावाखाली येईल. यामुळे अफगाणी तालिबानचे, अलकायद्याचे हजारो दहशतवादी जे सध्या अफगाणिस्तानच्या सैन्याविरुद्ध लढत आहेत, त्यांना काही काम उरणार नाही. अशा दहशतवाद्यांना पाकिस्तान भारताच्या काश्मिरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तिथे दहशतवाद, येणार्‍या काळामध्ये वाढू शकतो. भारतानं अंतर्गत सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं गरजेचं आहे. गुप्तहेर संघटनांनी सतर्क राहणे गरजेचं आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..