या कथेच्या पहिल्या भागात बघितलेला ‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे. आता भाईंदरच्या या किल्ल्याचे नाव देवीवरून पडले की देवीवरून किल्ल्याचे नाव पाडले हे समजणे कठीण आहे.
‘काळा किल्ल्या’चे कागदोपत्री नाव ‘रीवाचा किल्ला’ असे आहे. जनरली किल्ल्याच्या नावावरून गावाचे नाव किंवा किल्ल्याच्या गावाच्या नावावरून किल्ल्याचे नाव पडण कॉमन आहे. ‘रीवाचा किल्ला’ आणि ‘धारावी’ या दोघांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे हे निश्चितच..या संबंधाने मी काही तर्क केले आहेत, ते इथे देतोय..
किल्ल्याच्या नावाबाबत तर्क–
हा किल्ला ब्रिटीशांनी बांधला व त्याला नाव दिले ‘फोर्ट रीवा’ असा अनेक ग्रंथात उल्लेख आहे.. मिठी नदीच्या किनारी, मोक्याच्या जागेवर हा किल्ला आहे..नदी म्हणजे इंग्रजीत ‘The River’..या ‘The River’च बोलीभाषेत ‘द रीवा’ झाले असणे शक्य आहे व पुढे काळाच्या ओघात ‘द’ गळून केवळ ‘रीवा’ शिल्लक राहिला असणे सहज शक्य आहे…अश्या तऱ्हेने या किल्ल्याचे नाव ‘फोर्ट रीवा’ झाले असावे..!
‘धारावी’च्या नावाबाबत तर्क –
मुंबई परिसरातील ‘धारावी’ हे नाव ‘धारा देवी’ या देवीच्या नावावरून आले असावे अशी शक्यता इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी त्यांच्या ‘महिकावतीच्या बखरी’त मांडला आहे. परंतु या परिसरात ‘धारा देवी’ नावाची देवी होती असल्याचे शोधूनही सापडले नाही..हां, नाही म्हणायला ‘धारेश्वर’ नावाचे शंकराचे देऊळ असल्याचा उल्लेख सापडतो..राजवाडे यांनी मांडलेली शक्यता भाईंदर येथे सिद्ध झाली आहे..तिथे ‘धारावी किल्ला’ही आहे आणि ‘धारावी देवीही’, परंतु मुंबईत तसा धागा सापडला नाही..
इतिहासाचार्यांच्याच बखरीचा आधार घेऊन असे म्हणता येते की सन १३००च्या आसपास मध्ये बिम्ब नावाचा राजा प्रसिद्ध झाला व त्याने महिकावती (मुंबई माहीम) शहर वसवले..हा राजा साष्टी(ठाणे) इलाख्यातून येथे आला होता..या राजा बिम्बाने मुंबईत नव्याने राजधानी वसवताना आपल्या साष्टी इलाख्यातील स्थानाचीच नावे इथल्या स्थानांना दिली असे दिसते..उदा. ‘माहीम’ मुंबईतील व केळवे-पालघरमधील, ‘नायगाव’ हे ठाण्यातही आहे आणि मुंबईतही, शितलादेवी पालघर व मुंबईतील माहीमच्या शिवेवरही सापडते..तद्वत राजा बिम्बाने भाईंदर येथील ‘धारावी’चे नाव, माहीमपासून जवळच असलेल्या परिसराला देऊन त्याचे नाव ‘धारावी’ ठेवले असावे का?
की ‘ब्रिटीशांच्या ‘द रीवा’ या किल्ल्याच्या नावाचा अपभ्रंश पुढे ‘धारावी’ होऊन या किल्ल्याच्या परिसराला ‘धारावी’ हे नाव मिळालं असावं का? मला तरी दोन्ही तर्क पटतात..बघा आपल्यालाही पटतात का..
— गणेश साळुंखे
9321811091
Leave a Reply