त्या दिवशी आकाशात मळभ होतं. 78 वर्षांचा मी आणि 70 वर्षांची माझी पत्नी सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास ’आजीआजोबा उद्याना’त एका लाकड्याच्या बाकड्यावर बसलो होतो. लाकडाचा बाकडासुद्धा माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा होता. खूप करकरत होता. कदाचित माझ्या उतारवयाची हाडे त्याला बोचत असावीत. पण आज आजीआजोबा उद्यान मात्र अगदी खुशीत होतं. काय करेल ते तरी बिचारं!! रोज वेगवेगळ्या तरुणतरुणींच्या कलाक्रीडा बघण्याची सवय त्याला, आज बऱ्याच दिवसांनी त्याला अपेक्षित असणारी माणसे आली होती.
आम्हाला बघितल्यावर उद्यानाने निःश्वास सोडला. वाऱ्याची एक झुळूक आली आणि अंगावर शहारा आला. काय बोलावं काही कळत नव्हतं. माझ्या चेहेऱ्यावर गांभीर्य आणि गोंधळ यांचा संकर होता.
बायको म्हणाली, ‘अहो काय हे?..काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं नं? मग आता बोला ना!!’
मी पुन्हा मनाची तयारी केली. मनात विचार केला आज काही झालं तरी बोलायचंच. मी म्हटलं, ‘तुला एक गोष्ट सांगायचीय.’
बायको म्हणाली, ‘अहो नातवाला गोष्टी सांगण्याचं वय आपलं. तुम्ही मला काय गोष्टी सांगताय?’
पूर्ण ऐकून न घेता गळ्याचा व्हॉल्व उघडल्यासारखं बदबदा बोलायची तिची सवय या वयातही कायम असल्याचा मला रागही आला आणि कौतुकही वाटलं. मी म्हटलं, ‘जरा माझं ऐकून घेशील का? मला तुला फार महत्त्वाच सांगायचं.’
बायको म्हणाली, ‘काय ते लवकर सांगा… अथर्वची स्कूलबस येईलही इतक्यात, तो आला की ‘आज्जी भूक आजी भूक’ करत धिंगाणा घालतो. त्याला आज काय ती मियोनीज फ्रॅन्की द्यायचीय. आजच सकाळी ऑफिसला जायच्या आधी माधवी ते मला सांगून गेलीय.’
मी पुन्हा तिच्यावर चिडलो. हल्ली हे वारंवार होतंय. दुसरं आहे कोण म्हणा चिडावं असं. मी म्हणालो, ‘हे बघ मला खरंच तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचंय. मी एक गोष्ट अनेक वर्षांपासून तुझ्यापासून लपवून ठेवलीय. आणि ती तुला सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाही.’
वैजू थोडीशी गंभीर झाली, ‘काय सांगायचं तुम्हाला? सांगा.’
मी म्हणालो, ‘तोच प्रयत्न करतोय पण शब्द सापडत नाहीयत.’
तिने गर्रकन मानेला झटका देत माझ्याकडे मान वळवली. पूर्वी 180 अंश कोनात तिची मान वळायची आता 80 अंशापर्यंत जेमतेम पोहोचते. तिने विचारलं, ‘तुमचं पूर्वी प्रेमप्रकरण होतं की काय? छे.. मी सोडल्यास एवढी रिस्क घेईल कोण?’
पण तिला काय वाटलं कोणास ठाऊक, तिने पुन्हा विचारलं, ‘तुम्हाला दुसऱ्या कोणामुळे मूल वगैरे झालंय का?’
मी म्हणालो, ‘नाही, अगं काहीतरीच काय म्हणतेयस?’
बायको वैतागून म्हणाली, ‘अहो मग मला काय असं महत्त्वाचं सांगायचंय जे तुम्ही अनेक वर्षे मनात ठेवून आहात?’
मी तिचा हात हातात धरून कापऱ्या आवाजात म्हणालो…. ‘आय लव्ह यु..’
ती आश्चर्याने म्हणाली, ‘काय?’
मी म्हणालो, ‘अगं हो, मी अगदी मनापासून बोललो. 10 बाय 10 च्या चाळीतल्या खोलीत आपण आपला संसार थाटला, निसर्गाच्या नियमानुसार तो फुलला. मग बालपणी आपल्याला न मिळालेल्या सुखसुविधा आपल्या मुलाला मिळाव्यात म्हणून ढीगभर कष्ट उपसले आणि मुलाला मोठं केलं. मग त्याचा संसार फुलला. मग त्याचा संसार सांभाळण्याचं काम स्वखुशीने केलं. एवढ्या सगळ्या कालावाधीत आपल्याला एकमेकांसाठी ‘आय लव्ह यु’ म्हणण्या येवढाही वेळ काढता येऊ नये?’
‘वैजू तुला असं नाही का वाटत की आपण फक्त कागदावर रिटायर्ड झालो आहोत. कुठेही जायचं म्हटलं की आधी आपल्या मुलाची गैरसोय होणार नाही हा विचार आपल्या मनात येतो. ‘होऊ दे ना गैरसोय, आपण कसं आयुष्यात अॅडजस्ट केलं तसं तो ही करेल’ हा विचार आपण कधीच करत नाही.’
‘अनेक वर्षे तुला ‘आय लव्ह यु’ म्हणायचं होतं. शेवटी आज संधी मिळाली. मनात साचलेलं दूर झालं, पाणी वहातं झालं.’
हिने माझ्याकडे क्षणभर बघितलं आणि फोन लावला ‘माधवी कुठपर्यंत पोहोचलीयस? ..अच्छा आलीस ना घरी.. नाही माझं ऐक आधी..5 वाजता अथर्वची स्कूलबस येईल, त्याला घ्यायला जा. आणि ऐक, मी आणि हे आज दिनानाथला नाटक बघायला जाणार आहोत आणि रात्री बाहेर जेवूनच घरी येऊ. आणि ऐक, यापुढे प्रत्येक शनिवारी आम्ही हेच करणार आहोत. हं चल ठेवते फोन.’
मी आकाशाकडे बघितलं. मळभ दूर झालं होतं………
–समीर चौघुले
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply