नवीन लेखन...

उगवत्या सूर्याचा नि भव्य मंदिरांचा देश – जपान

दि व्यत्वाचा वास जिथे जाणवतो, मन:शांतीची अनुभूती येते त्या वास्तूला प्रत्येक भाविकाच्या हृदयात एक अढळ स्थान असतं. मग भले तिथलं आराध्य दैव वेगळ्या धर्माचं, वेगळ्या पंथाचं असेल. ती कदाचित युरोपातील भव्य चर्च, सिनेगॉग असतील किंवा पूर्व आशियातील बौद्ध आणि हिंदूंची प्राचीन मंदिरं. जपानमधील पर्यटनात या मंदिरांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचं वास्तुशिल्प अतिशय कलात्मक असतं आणि परिसर तितकाच मनमोहक.

टोकियोतील असाकुसा भागातील ‘सेन्सोजी’ हे भव्य आणि प्राचीन मंदिर पाहताना त्याच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या भल्या मोठ्या कागदी कंदिलाने आमचं लक्ष दुरूनच वेधून घेतलं होतं. येथील सगळ्याच मंदिरांची प्रवेशद्वारं भव्य आणि आपापलं वेगळेपण जपलेली. सेन्सोजी मंदिराच्या या प्रवेशद्वाराला म्हणतात ‘मेघगर्जना द्वार’ ! म्हणूनच या कागदी कंदिलावरील मोठ्या अक्षरांना काळ्या आणि लाल रंगात रंगवलंय.

काळा पावसाळी मेघांचा; तर लाल चमकणाऱ्या विजेचा रंग. मंदिराच्या गाभाऱ्यापाशी पोचायला २०० मीटर अंतर पार करावं लागतं आणि आपल्या तमाम मंदिरांसमोर असते तशी ही वाट हरतऱ्हेच्या दुकानांनी भरलेली आहे. तिथे विठोबाच्या आधी पोटोबाची सोय आहे. लहान मुलांनी हट्ट करावा आणि पर्यटकांनी मोहात पडावं अशा कितीतरी गोष्टींनी ही गल्ली फुलली आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेलो की आपलं मन क्षणार्धात आधुनिक जपानमधून प्राचीन जपानमध्ये जाऊन पोहोचतं. पंचमहाभूतांचं प्रतीक समजला जाणारा, सगळ्या बुद्ध मंदिरांच्या परिसरात असलेला पाच मजली पॅगोडा इथेही विराजमान असतो. चटकदार रंगातील मंदिराची वास्तू, टोकाला वळलेल्या त्याच्या छपराखालच्या कडा आणि उदबत्तीच्या धुरांची वलयं वातावरण भारावून टाकतात.

या प्राचीन बौद्ध मंदिराची एक आख्यायिका आहे. दोन कोळी बंधूंना मासेमारी करत असताना ही क्षमाशील बुद्धाची मूर्ती सुमीदा नदीच्या प्रवाहात सापडली. नदीला अर्पण केली तरी ती पुन्हा त्यांच्या जाळ्यात येत असे. त्यांनी मग ६४५ साली या मूर्तीची प्रतिष्ठापना करून हे सेन्सोजी मंदिर बांधून पूर्ण केलं. दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बवर्षावात ते उध्वस्त झालं असलं तरी त्याला पुनरुज्जित केलं गेलं आणि तेव्हापासून हे मंदिर पुनर्जन्माचं आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं. सुख, शांती, समाधान आणि सौहार्द अशा मनोकामना इथे पूर्ण होतात. या मंदिरात भक्तगण अतिशय भक्तिभावाने उदबत्त्यांचा धूर आपल्या अंगावर घेत असतात. आरोग्यदायी असा हा धूर आजार बरे करतो अशी जपानी श्रद्धा! मात्र ज्या अवयवाचा आजार त्या अवयवाशी या धुराचा संपर्क यायला हवा. बहुतेक सारेजण आपलं डोकं त्या धुरात लपेटून घेत होते. सर सलामत तो पगडी पचास !

या मंदिराच्या आवारात भविष्य सांगणारे काही स्टॉल्स आहेत. मात्र इथे पोपटाचं काम लांब काड्या करतात. धातूच्या नळकांड्यात असलेल्या काड्या हलवून त्यातली एक काडी आपण एक काडी आपण उचलायची आणि त्यावरील नंबर जुळणाऱ्या पेटीतील कागदावरचं भविष्य वाचायचं. गम्मत अशी की न रुचणारं भविष्य वर्तवलं गेलं की ती चिट्ठी तिथल्या झाडावर बांधून ठेवायची. बुद्धाची कृपानजर अशा कमनशिबी लोकांवर पडते आणि त्यांचं नशीब फळफळतं.

टोकीयो शहराच्या योयोगी या उपनगरात असलेल्या शिन्तो पंथाच्या मेजी मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला ४० फूट उंच अशा प्रवेशद्वारातून जावं लागतं. शिन्तो पंथाच्या मंदिरांमध्ये या ‘टोरी’ म्हणजे प्रवेशद्वारांना अनन्यसाधारण महत्व आहे. बाहेरचं ऐहिक जीवन सोडून पवित्र जागेत पवित्र मनाने प्रवेश करण्याची आठवण ही प्रवेशद्वारं करून देतात. जणू दोन जगांमधील वेस. दुतर्फा वृक्षराजी असलेल्या रस्त्यावरून चालत असताना पानांची सळसळ आणि विविध पक्ष्यांच्या लकेरी ऐकू येत होत्या. मंदिरात शिरण्यापूर्वी डावीकडे लाकडी ओघराळी आणि वाहत्या पाण्याचे हौद असलेली एक मुखप्रक्षालनाची जागा सुनिश्चित केलेली होती. जपानी प्रथेप्रमाणे मुखप्रक्षालन करून स्वच्छ झालेल्या तनामनाने आम्ही आत प्रवेश केला. या मंदिरात जपानचा धर्मपरायण लोकप्रिय सम्राट मेजी यांचे अवशेष ठेवले आहेत. शिन्तो पंथाच्या प्रथेनुसार नवसपूर्तीसाठी किंवा काही विशेष प्राप्तीसाठी अगदी अंतःकरणापासून केलेल्या खाजगी प्रार्थना लिहिण्यासाठी तिथे लाकडाच्या छोट्या पाट्या आहेत. (जपानी भाषेत एमा) तसेच कोरे कागद व पाकिटंही ठेवलेली आहेत. दुसऱ्या दिवशीच्या पूजेत ही खाजगी प्रार्थना पुजाऱ्यामार्फत भगवंताला सुपूर्द केली जाते. या देवळातच आम्ही शिन्तो नमस्काराची पद्धत शिकलो. पेटीत पैसे टाकायचे, कमरेत लवून दोनदा नमस्कार करायचा, दोनदा टाळी वाजवायची. मनात प्रार्थना म्हणायची आणि परत दोनदा कमरेत वाकून नमस्कार करायचा. हे मंदिर लग्नकार्याकरता सुद्धा प्रसिद्ध आहे.

पारंपरिक वेशातील वधुवर, वऱ्हाडी मंडळी आणि लग्न लावणारे पुजारी यांच्या वरातीचं दर्शन हा एक अनोखा अनुभव होता.

क्योटो शहर

हे तर मंदिरांकरता प्रसिद्ध. त्यातील सर्वात मनोवेधक आहे चाळीस फूट उंचीचं त्यांचं सुवर्णमंदिर. ‘किंकाकूजी’ नावाने प्रसिद्ध अशा या मंदिराचे वरील दोन मजले सोन्याचा मुलामा दिलेल्या पत्र्यांनी मढलेले आहेत. सोन्याचं प्रयोजन हे मृत्यूसंबंधी नकारात्मक विचारांचा अवरोध करण्यासाठी. सभोवताली बांधलेल्या शांत सरोवरात पडणारं या मंदिराचं प्रतिबिंब प्रत्येक ऋतूत अप्रतिम दिसतं. वसंतात डवरलेल्या फुलांनी वाकलेल्या चेरीच्या झाडांची शोभा, ग्रीष्मात हिरवाई तर शिशिरात हिमचादरीची पार्श्वभूमी. मंदिराच्या कळसावर फिनिक्स पक्षी मोठ्या डौलात उभा आहे. १४व्या शतकातलं हे झेन मंदिर बऱ्याच युद्धांना सामोरं गेलं आणि त्यातून तगलं. मात्र १९५० साली तिथल्याच एका बावीस वर्षीय वेडसर संन्याशाने ते पेटवून दिलं. पाच वर्षांनी त्याची डागडुजी करून ते मंदिर त्याच्या पूर्वावस्थेत उभं राहिलं.

क्योटोमधील लक्षात राहिलेलं आणखी एक मंदिर म्हणजे फुशिमी इनारी शिन्तो पंथाच्या इनारी देवाचं हे मंदिर एका टेकडीच्या पायथ्याशी वसलेलं आहे. या मंदिराचं वैशिष्ठय म्हणजे एकमेकांस लागून उभे असलेले, गडद केशरी रंगाचे हजारो टोरी ( प्रवेशद्वार ) आणि त्यांनी तयार झालेला बोगदा इनारी हा शेतकऱ्यांना संरक्षण देणारा धान्यदेव. मुख्यत्वेकरून भाताचं पीक आणि त्यापासून तयार होणारी साके नावाची वाईन यांचा तो देव. परंतु जसजसं शेतीचं पिकणं कमी होऊ लागलं तसं व्यापारी आणि उद्योजक इनारीला ‘आपला’ म्हणू लागले. मंदिराच्या या टोरी म्हणजे नवसपूर्तीचं प्रतीक. देव पावल्याची पावती. ही भली थोरली टोरी आज अर्पण करायची झाली तर अदमासे पंधरा हजार डॉलर्स लागतात. खरंच, हा धनिकांचा देव. उत्तराखंडातील गोलू देवतेच्या मंदिरात मी अशा लहान-मोठ्या घंटा हजारोंच्या संख्येत लटकवलेल्या पाहिल्या होत्या. मंदिराच्या आवारात आपल्याला कोल्ह्यांच्या दगडी मूर्ती पाहायला मिळतात. हे आहेत इनारी देवतेचे दूत. कुणाच्या तोंडात मोठी चावी असते; तर कुणाच्या तोंडात भाताची लोंबी. ही चावी आहे भाताच्या गोदामाची. एकाच्या गळ्यात तर मवाली गुंडाने बांधावा तसा लाल स्कार्फ दिसला. देवदूताच्या गळ्यातील हे लाल फडकं मात्र दुष्ट प्रवृत्तीच्या मवाल्यांना पळवून लावण्यासाठी बांधलेलं असतं हे ऐकल्यावर तर या विरोधाभासाची गम्मत वाटली.

क्योटोपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या नारा या गावी बुद्धाचं प्रचंड मोठं असं लाकडी मंदिर आहे. या ‘तोडायजी’ मंदिरातील बुद्धाची मूर्ती १५ मीटर उंच आहे. म्हणूनच त्याला म्हणतात ‘जायंट बुद्धा ! प्रवेशद्वारावर डावी उजवीकडे रक्षकांच्या भल्या मोठ्या राक्षसी मूर्ती कोरल्या आहेत. त्याचा आवाका पाहूनच आपण हबकून जातो. त्या मूर्ती पाहून आतला जायंट बुद्ध पाहायची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. आत प्रवेश करून मान वर करून पाहिलं आणि बुद्धाच्या त्या महाकाय मूर्तीचं दर्शन झालं. असं वाटलं जणू भगवंताचं विराटरूप पाहायला मिळालं. हात आपोआप जोडले गेले आणि मी नतमस्तक झाले. डावीकडून प्रदक्षिणा घालायला सुरवात केली आणि ती संपत आली असता एका लाकडी खांबापाशी बरीच गर्दी पाहून थबकले. खांबाच्या तळाशी असलेल्या छिद्रातून अंगाचं मुटकुळं करून लोक आरपार जात होते. चौकशीअंती कळलं की खांबाच्या छिद्राचा आकार त्या महाकाय बुद्धाच्या नाकपुडी एवढा आहे. जो त्याच्यातून पार झाला तो पुढच्या जन्मात ज्ञानी.

अस्सल भारतीय असलेली आणि कान, डोळे आणि तोंड आपल्या तळव्यांनी झाकून घेणारी गांधीजींची तीन सदाचारी माकडं आम्हाला जपानमधील निक्को शहरी असलेल्या ‘तोषूगु’ या चारशे वर्ष पुरातन बुद्धमंदिरातील शिल्पात पाहायला मिळाली तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. गांधीजींना ही कल्पना बहुदा बुद्धाच्या शिकवणीतून मिळाली असावी. हे तोषूगु मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा त्याकाळी उपलब्ध असलेलं उच्च कोटीचं बांधकामतंत्र उपयोगात आणलं होतं. याच्या प्रवेशद्वाराला नाव आहे ‘संधीप्रकाश द्वार’. ५०० शिल्प असलेलं त्याचं सौंदर्य निरखताना कधी संध्याकाळ होईल याचा पत्ता लागणार नाही म्हणून हे संधिप्रकाश द्वार इथल्या काही लक्षात राहिलेल्या शिल्पांपैकी एक शिल्प आहे हत्तीचं. या शिल्पकारानी त्याच्या उभ्या आयुष्यात हत्ती कधी पाहिलेलाच नव्हता. त्यामुळे त्याच्या कल्पनेतल्या हत्तीला सोंड होती तशीच वाघनखं सुद्धा. गर्दी खेचणारं अजून एक शिल्प म्हणजे ‘निद्राधीन मनीमाऊ’. इडो राजाच्या थडग्याकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर ही मनीमाऊ पहुडली आहे आणि त्याच्या मागच्या बाजूस असलेल्या शिल्पात आनंदात उडणारे पक्षी दिसतात. मांजराचं भक्ष्य असलेल्या या पक्षांवर भीतीचं किंचितही सावट नाही याचा अर्थ इडो राजा असताना जपानमध्ये रामराज्य होतं. या मांजराचं शिल्प हुबेहूब घडावं म्हणून या महान शिल्पकाराने आठ महिने घरी एक मांजर पाळलं होतं.

मंदिरं हा जपानच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही भाविक प्रजा एक जानेवारीला नवीन वर्षाचं स्वागत करताना रात्र न जागवता सकाळी लवकर उठून मंदिरासमोर देवदर्शनाकरता रांगा लावते. उगवत्या सूर्याचा देश हे त्यांचं नाव किती सार्थक आहे ना!

–मेधा अलकरी

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..