एल्डर्ट अॅडव्होकाट आणि डाऊव हिंसबर्गेन यांनी आपल्या संशोधनात ज्या घटकांचा वापर केला, त्यात मुख्यतः भूप्रदेशाचं चुंबकत्व, भूप्रदेशाचं वय, त्या भूपृष्ठाची जडणघडण, तिथल्या भूपट्टांची हालचाल, या घटकांचा समावेश होता. एखाद्या भूप्रदेशाचं सर्वसाधारण चुंबकत्व हे आजूबाजूच्या भूप्रदेशाच्या चुंबकत्वापेक्षा वेगळं असल्याचं आढळलं, तर त्या भूप्रदेशाचं उगमस्थान तिथल्या आजूबाजूच्या भूप्रदेशापेक्षा वेगळं असल्याचा निष्कर्ष काढता येतो. या सर्व घटकांची एकमेकांशी सांगड घालून, एखाद्या भूप्रदेशाच्या इतिहासाचा मागोवा घेणं शक्य होतं. एल्डर्ट अॅडव्होकाट आणि डाऊव हिंसबर्गेन यांनी प्राचीन गोंडवना महाखंड, तसंच आज अस्तित्वात असलेले भूप्रदेश यांच्या संदर्भातली, या सर्व घटकांविषयी जी काही माहिती उपलब्ध आहे, त्या माहितीचा अत्यंत काटेकोरपणे आढावा घेतला. याचबरोबर त्यांनी या परिसरातल्या सुमात्रा, अंदमान, बॉर्निओ, टिमोर अशा विविध बेटांवर जाऊन तिथल्या भूरचनेचा, तिथल्या खडकांचा प्रत्यक्ष अभ्यासही केला. सुमारे सात वर्षांच्या खडतर परिश्रमांनंतर, एल्डर्ट अॅडव्होकाट आणि डाऊव हिंसबर्गेन यांनी आर्गोलँड खंडाचा इतिहास आणि त्याचं आजचं ठिकाण शोधून काढलं.
सुमारे अठरा कोटी वर्षांपूर्वी जेव्हा गोंडवना या महाखंडातले विविध भूप्रदेश वेगळे झाले, तेव्हा त्यांतील दक्षिण अमेरिका किंवा आफ्रिकेसारख्या भूभागांचे नंतरच्या काळात पुनः फारसे तुकडे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं. आर्गोलँडच्या बाबतीत मात्र त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाचा पुरावा कुठेही सापडत नसल्यानं, त्याचा शोध लागणं कठीण ठरलं होतं. तत्कालिन पुराव्यांनुसार हा प्रदेश उत्तरेकडे सरकला असण्याची शक्यता होती. हीच शक्यता लक्षात घेऊन, या संशोधकांनी ऑस्ट्रेलिआच्या उत्तरेकडील समुद्रात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलिआच्या उत्तरेला समुद्रात पाण्याखाली, आर्गो अबिसल प्लेन हा प्रदेश वसला आहे. हा प्रदेश म्हणजे काहीसा खोल घळीत वसलेला सपाट प्रदेश आहे. (या प्रदेशाचा शोध पूर्वीच लागला आहे.) किंबहुना, इथल्या समुद्रात अशी मोकळी जागा आढळणं, हीच एक आश्चर्याची बाब होती. इथल्या खडकांचं चुंबकत्व व इतर माहितीद्वारे या प्रदेशाचा कसून अभ्यास केल्यानंतरही, एल्डर्ट अॅडव्होकाट आणि डाऊव हिंसबर्गेन यांना इथे कोणताच दडलेला भूखंड आढळला नाही. मात्र या सर्व परिसरात त्यांना काही जुन्या काळातले भूखंडांचे छोटे तुकडे मात्र आढळले. या भूखंडांच्या तुकड्यांच्या आणि आर्गो अबिसल प्लेनच्या अभ्यासातून, या सपाटीवर प्राचीन काळी एखादा भूप्रदेश अस्तित्वात असण्याची व तो कालांतरानं वायव्येकडे सरकला असल्याची शक्यता दिसून येत होती. या ‘अनुपस्थित’ भूप्रदेशाचा आर्गोलँडशी संबंध दिसून येत होता.
या सर्व परिसरात आढळणाऱ्या भूखंडांच्या तुकड्यांच्या अभ्यासाद्वारे, काळानुरूप मागे जात या संशोधकांनी, आर्गोलँडचा हा प्रवास कसा झाला असावा, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. हा शोध घेण्यासाठी, एल्डर्ट अॅडव्होकाट आणि डाऊव हिंसबर्गेन यांनी, इथल्या भूभागात गेल्या कोट्यवधी वर्षांत झालेले बदल अभ्यासले, इतल्या घळी, खाचा तपासल्या. त्यावरून या संशोधकांच्या लक्षात आलं की, आर्गोलँड हा मुळातच पूर्णपणे एकसंध प्रदेश नव्हता. हा अनेक बेटांचा समूह होता. या संशोधकांना इथल्या सागरतळावर, प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या समुद्रांचाही शोध लागला. या प्राचीन समुद्रांनीच या सर्व भूभागावर भूशास्त्रीय ताण निर्माण केला होता. त्यातूनच इथल्या भूपृष्ठात, पाच हजार किलोमीटर लांबीची एक प्रचंड खाच निर्माण झाली. सुमारे वीस-एकवीस कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेली ही सर्व क्रिया, त्यानंतर काही कोटी वर्षं चालू राहिली. या खाचेमुळेच हा आर्गोलँड ऑस्ट्रेलिआपासून वेगळा झाला असावा. आर्गोलँडचं हे ऑस्ट्रेलिआपासून वेगळं होणं, सुमारे पंधरा कोटी वर्षांपूर्वी घडून आलं असल्याचं, तिथल्या खडकांच्या वयावरून दिसून येतं. त्यानंतर या दोन्ही भूभागांच्यामध्ये निर्माण झालेल्या समुद्रानं, या सुमारे पाच हजार किलोमीटर लांबीच्या भूभागाला, ऑस्ट्रेलिआपासून पूर्ण वेगळं करून वायव्येकडे ढकललं असावं. त्यामुळे हा भूभाग सरकत-सरकत, अखेर इंडोनेशिआ आणि म्यानमारवर जाऊन थडकला असावा. आर्गोलँडचा हा भाग आज इंडिनेशिआ आणि म्यानमारच्या हिरव्यागार जंगलांखाली लपला आहे.
गोंडवनाच्या अवशेषांतील ग्रेटर अँड्रिआ किंवा झिलँडिआसारखे भूभाग हे एकतर पाण्याखाली पूर्णपणे बुडाले आहेत, तर काही पाण्याखाली अर्धवट बुडाले आहेत. मात्र हे भूभाग आपलं अस्तित्व टिकवून असल्यानं, त्यांचा शोध लागू शकला. आर्गोलँडच्या बाबतीत मात्र हा खंड पूर्णपणे दिसेनासा झाला. परिणामी, आर्गोलँड हा भूभाग जमिनीखाली ‘हरवला’ असल्याची शक्यता पूर्वी व्यक्त केली गेली होती. एल्डर्ट अॅडव्होकाट आणि डाऊव हिंसबर्गेन यांनी मात्र आपल्या संशोधनाद्वारे, आर्गोलँड हा मुळातच तुकड्यांच्या स्वरूपात असलेला खंड, आजही विखुरलेल्या तुकड्यांच्या स्वरूपात अस्तित्वात असल्याचं दाखवून दिलं आहे. या तुकड्यांपैकी काही भाग हा इंडोनेशिआ आणि म्यानमारपर्यंत जाऊन पोचला असल्याचंही या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. यांतील दुसऱ्या निष्कर्षामुळे एका वेगळ्याच गोष्टीवर प्रकाश पडला आहे. ही गोष्ट म्हणजे इंडोनेशिआच्या जैवविविधतेतील फरकामागचं कारण. इंडोनेशिआच्या एका बाजूची जैवविविधता ही तिथल्या इतर ठिकाणच्या जैवविविधतेपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी आहे. इथं थडकलेला आर्गोलँड हा खंडच इंडोनेशिआतील जैवविविधतेतील या फरकाला कारणीभूत ठरला असावा.
(छायाचित्र सौजन्य – Utrecht University)
Leave a Reply