नवीन लेखन...

‘गीत-रामायणा’चें हिंदी भाषांतर करतांना

आधुनिक-मराठीचे वाल्मीकी  ग.दि.माडगूळकर यांनी रचलेलें ‘गीत-रामायण’ वाचलें-ऐकलें नाहीं, आणि त्यानें लुब्ध झाला नाहीं असा सुशिक्षित माणूस  महाराष्ट्रात सापडणें कठीणच. गीत-रामायण ज्याकाळीं प्रथमत: रेडियोवर ऐकवलें जात असे, त्याकाळीं घराघरातील थोरामोठ्यांना आपापली कामें दूर सारून, रेडियोवरून प्रक्षेपित होणारे गीत-रामायणातील गीत मन लावून ऐकतांना ऐकतांना मी पाहिल्याचें स्मरतें. त्यावेळी मी लहान होतो ; मात्र गीत-रामायण हें कांहींतर खास आहे , एवढें मला निश्चितपणें त्या काळीं समजलें, व ती बाब स्मरणात राहिली.  पुढे कांहीं वर्षांनी मी गीत-रामायणाची मुद्रित-प्रत विकत घेऊन वाचली, तिची कांहीं ‘पारायणें’ही केली. बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांनी गाइलेलें गीत-रामायणही कार्यक्रमात मी ऐकलें. गीत रामायणानें इतर अनेकांप्रमाणें मलाही वेड लावलें. याचें हिंदी भाषांतर करावें असा मी संकल्प केला . ही १९७८ ची गोष्ट आहे.

गीत रामायणाचें बर्‍याच भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेलें आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आलेली होती. त्यामुळे, त्याचें हिंदी भाषांतर आधीच झालेलें असूं शकेल याची मला कल्पना होती (आणि, तशी परिस्थिती खरोखरच होती, हें नंतर मला समजलेंच).  मात्र, मी त्यावर मोहित झालेलो असल्यानें, आपण हें भाषांतर करायचेंच असें मी ठरवलें. यात ‘स्वान्त:सुखाय’ अशा आनंदाचाच भाग होता ; व्यावसायिक कांहींही नव्हतें (आजही नाहीं ).

माझें प्रायमरी शिक्षण मराठीत झालेलें आहे. हायस्कूलचें शिक्षण इन्दौरला इंग्लिश मीडियम पब्लिक-स्कूलमध्ये झालेलें आहे. मात्र, त्या वेळी मी HSC साठी हिंदी ही First language म्हणून घेतली होती, व मला तिचें बर्‍यापैकी ज्ञान होतें व आहे. मराठी तर मातृभाषाच. त्यातून मी एक झपाटून जाणारा व सपाटून वाचणारा, पण चिकित्सक वाचक आहे. त्यामुळे, मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमधील fiction & non-fiction, prose & verse, ASexसाहित्य मी खच्चून वाचलेलें आहे, व त्या भाषांची मला जाण आहे. ( मी त्या तिन्हीं भाषांमध्ये लेखन करतो, व त्यांतील कांहीं प्रकाशितही झालेलें होतें/आहे). या सर्वांचा उल्लेख करण्याचें कारण एकच, आणि तें म्हणजे, या माझ्या पार्श्वभूमीमुळे, मी हें भाषांतर करूं शकेन असा मला विश्वास वाटत होता. त्यातून, मी त्याआधी कविवर्य हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ चा मराठी अनुवाद केलेला होता, आणि तो, ‘सकाळ’  वृत्तपत्र-समूहातील तत्कालीन साप्ताहिक, ‘स्वराज्य’ यात प्रसिद्धही झाला होता. कवि बच्चन यांना भेटून मी भाषांतरासंबंधी चर्चाही केली होती. (कवि बच्चनजींशी पत्रव्यवहार व त्यांची भेट, हा एक आठवणीत रहाणारा सुखद अनुभव होता. पण, त्याबद्दल पुन्हां केव्हांतरी).

या सर्वांमुळेही मला गीत-रामायणाच्या भाषांतराबद्दल हुरूप होता.

 

हिंदीभाषांतरप्रक्रियेबद्दल थोडेसें  :  

कुठल्याही साहित्याचें भाषांतर ही सोपी गोष्ट नाहीं. शब्दश: भाषांतर केलें तर तें नीरस बनण्याची शक्यता असते. मूळ साहित्याकाराचे मूलभूत कथन, त्याचा ( / तिचा )  तें साहित्य लिहिण्यामागील हेतू , त्यानें प्रॉजेक्ट केलेला ‘मूड्’ , त्याच्या भाषेचें स्वरूप व त्याची शैली, सांस्कृतिक बाबी, मूळ साहित्याची ( original ) भाषा व ज्या भाषेत तें भाषांतर करायचें ती target भाषा ( म्हणजे, इथें, respectively मराठी व हिंदी ) यांच्या लकबी व ‘खासियती’ , तें साहित्य एखाद्या विशिष्ट कालखंडाबाबत असेल तर त्या काळाचा विचार; असें सर्व, भाषांतरकाराला ध्यानात घ्यावें लागतें. उदाहरणार्थ, रामायणाचा काळ विचारात घेतां, ग.दि.मां.नी बरेच संस्कृतमय तत्सम व तद्भव शब्द वापरलेले आहेत. तेथें, भाषांतरातही बहुतांशी तसेंच करावें लागतें ; तिथें उर्दू-फारसी शब्द चालणार नाहींत, ते अर्थानें व चालीत चपखल बसत असले तरी. ( अर्थात्, भाषेत पूर्णपणें मिसळून, विरघळून गेलेल्या , तशा एखाद्या शब्दाचा वापर, हा अपवाद).

लयबद्ध काव्याच्या बाबतीत तर भाषांतर अधिकच  कठीण आहे, जिकिरीचें आहे. ग.दि. मां.ची प्रासादिक भाषा ध्यानात घेतां, तें भाषांतर तर अनेक पटींनी कठीण ! ग.दि.मां.च्या काव्याला एक आंतरिक लय असतेच. त्यातून बाबूजी सुधीर फडके यांनी दिलेल्या चित्ताकर्षक आणि यथायोग्य (apt) अनुपम चाली सर्वांनाच माहीत आहेत. त्यामुळे, ती लय आणि चाल न बदलतां भाषांतर करणेंच आवश्यक आहे, तेंच योग्य ठरेल, असें माझ्या ध्यानात आलें ; आणि, तसें साधणें कठीण असलें तरी तसेंच करण्याचा निर्णय मी घेतला.

काव्याचा मूळ अर्थ व मूळ भाव तर कायम ठेवायचा, आणि त्याचबरोबर काव्याची लय व चालही न बदलतां भाषांतर करायचें म्हणजे तर आव्हानें कैक पटींनी वाढतात. भाषांतरकारासाठी त्याव्यतिरिक्त  अन्य आव्हानेंही असतात. कधीकधी मूळ काव्यातील कांहीं ठिकाणीं, हा अर्थ, वाच्यार्थाऐवजी लक्ष्यार्थ असूं शकतो. ( जसें की, अहमद फ़राज़ याच्या ‘रंजिश ही सही’ या ग़ज़लेचा सरळ-अर्थ सांगतो की ती प्रेयसीला उद्देशून आहे. पण दडलेला-वाच्यार्थ सांगतो की  ती ग़ज़ल पाकिस्तानातील लुप्त लोकशाहीला उदेशून आहे ). कधीकधी सांस्कृतिक-संदर्भही वेगळे असूं शकतात. हिंदी व मराठीची संस्कृती मूलत: एकच असली, तरीही कांहीं फरक आहेतच.  जसें की, मराठी संस्कृतीमधील तुकाराम-मंबाजी यांचा संदर्भ, ज्ञानेश्वर व रेडा, किंवा ज्ञानेश्वर आणि चांगदेव असे संदर्भ.  मराठी साहित्यात, शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतरचें मराठ्यांचे कार्य, बाजी प्रभू, वाघनखें, हिरकणी गवळण, संभाजीचें धीरोदात्त हौतात्म्य,  खंडो बल्लाळाची स्वामिभक्ती, पानिपतची तिसरी लढाई,  बाजीराव-मस्तानी असे उल्लेख येऊं शकतात ; पण शिवाजीव्यतिरिक्त इतर माहिती अ-मराठी जनांना नसते, आणि शिवाजीचीही फार जास्त नसते. त्यामुळे, मराठीतील तसे संदर्भ समजणें, किंवा त्यांचें महत्व समजणें त्यांना अनेकदा जड जातें. ( टीप  –  येथें शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, केवळ लेखनाच्या सोयीकरतांच आहे ) . त्याचप्रमाणें, दुसर्‍या बाजूनें पाहतां , हिंदी-भाषिकांना माहीत असलेली, ‘तुलसीदास पत्नीला भेटायला गेले तेव्हां दोर म्हणून सापाला धरून वर चढले’, ही आख्यायिका ; किंवा पृथ्वीराज व चंदबरदाई यांच्याशी संबंधित महंमद घोरीच्या दरबारातील घटनेची आख्यायिका ( ‘चार बाँस चालीस गज़.. ’ ) ; ‘सूरदास’ या शब्दाचा लक्ष्यार्थ ‘आंधळा’ असा होतो, ही माहिती ; अशा गोष्टी मराठीजनांना साधारणतया ठाऊक नसतात.  साहित्यासंबंधीच्या संदर्भांच्या  वापराबद्दलही तसेंच होतें. ‘महाराष्ट्री’ भाषेतील ‘गाहा-सत्तसई’ (गाथा-सप्तशती)  अ-मराठी जनांना माहीत नसते ; तर हिंदीतील ‘बिहारी सतसई’ बद्दल मराठी लोकांना सहसा माहिती नसते.

अर्थात् , रामायणाच्या बाबतीत अशी  संस्कृतिभिन्नतेची शक्यता कमीच. तरीही, पहा –  भरताची माता हिचें नांव मराठीत ‘कैकयी’ असें आहे, तर हिंदीत तें ‘कैकेयी’ असें आहे ; तसेंच, मराठीत, ( शिळा होऊन पडलेली ) ‘अहिल्या’ , तर हिंदीत ‘अहल्या’ असें आहे ; मराठीत ‘श्रावण’ (श्रावणबाळ) असें, तर हिंदीत ‘श्रवण’ असें आहे. वाल्मीकीचें पूर्वायुष्यातील नांव मराठीत ‘वाल्या कोळी’ असें आहे, तर हिंदीत तें ‘डाकू रत्नाकर’ असें आहे. हे फरक लक्षात ठेवणें आवश्यक ठरतें.

[[ जातां जातां  :  आपण या विषयावर आहोतच म्हणून, महाभारत, हरिवंश यांमधील कांहीं अशाच बाबींचा उल्लेख अस्थानीं ठरणार नाहीं. मराठीत ‘शंतनू’ तर हिंदीत ‘शांतनु’ हें त्या राजाचें नांव आहे. यमुनेचा उल्लेख हिंदीत ‘जमुना’ असा होईल व ‘यशोदे’चा ‘जसोदा’ असा. हरिश्चंद्राच्या पत्नीचें नांव मराठीत ‘तारामती’, तर हिंदीत ’शैव्या’ असतें. ‘पेंद्या’ हें मराठीमधील creation आहे, हिंदीजनांना त्या नांवाबद्दल पत्ता नसतो !  ( बाळकृष्णाचा मित्र ‘पेंद्या’ हा साहित्यात कसा आल, याची माहिती रंजल आहे, पण तें पुन्हां केव्हां तरी ). ]]

अशा व इतर कांहीं बाबींमुळे, भाषांतरकाराला कधीकधी मूळ काव्यातील कांहीं , (कमी महत्वाचे) शब्द बाजूला ठेवावे लागतात, आणि स्वत:च्या विचारातून कांहीं भिन्न शब्द वापरावे लागतात.

{{ म्हणजे, out of necessity, किंवा out of his creativity, अनुवादकानें स्वत: ‘बनवलेले’, निर्माण केलेले शब्द नव्हेत ;  [उदाहरणार्थ  –  ‘संत तुकाराम’ — (आगबोटीचें नांव) , या मराठी काव्यात —- हें भाषांतर नव्हे —- कवीनें ‘थेंब’ याऐवजी ‘द्रप्स’ हा शब्द स्वत: निर्माण केला आहे ; आणि तो इंग्लिशमधील  ‘Drops’ या शब्दावरून ‘बेतलेला’ आहे, हें उघड आहे. मात्र, जिथें तो शब्द काव्यात योजलेला आहे, तिथें तो अगदी ‘फिट्ट’ बसतो, अगदी apt आहे ] ;    तर  Target भाषेत ज्यांचे प्रतिशब्द वापरात आहेत, पण  मूळ कवीनें त्याच्या original भाषेतील काव्यात जे वापरलेले नाहींत, असे शब्द,  हें मुख्यत: आपल्याला इथें अभिप्रेत आहे }} .

एका उदाहरणानें ही गोष्ट स्पष्ट होईल. ‘पराधीन आहे जगतीं’ या गीतात, ‘यथा काष्ठं च काष्ठं च’ या मूळ संस्कृत वचनाचा उपयोग करतांना ग.दि.मां. नी ‘काष्ठ’ म्हणजे ‘लाकूड’ असा शब्द न वापरतां ‘ओंडका’ हा शब्द वापरला आहे (‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेटऽ’) , आणि तो अगदी चपखल (apt) वाटतो. ही त्यांची प्रतिभा आहे. ‘ओंडका’ याला हिंदीत प्रतिशब्द आहेत, ‘लट्ठा’, ‘कुंदा’,‘बल्ला’ वगैरे. पण गीताच्या हिंदी-भाषांतरात, लय-चाल, गोडवा वगैरे विचार करतां,  ‘लट्ठा’ वगैरे शब्द योग्य वाटत नाहींत ; त्याऐवजी ‘लकड़ी’ हा शब्द मला भाषांतरकार म्हणून यथायोग्य (apt) वाटला, गदिमांनी ‘लाकूड’ या शब्दाचा उपयोग केलेला नाहीं तरीही . मात्र, भाषांतरात असे शब्द-बदल करतांना, मूळ काव्यातील मुख्य-भावाला धक्का लागणार नाहीं, याची भाषांतरकाराला सर्वतोपरी काळजी घ्यावी लागते.

मराठीतून हिंदीत भाषांतर करतांना, कांहीं खास भाषावैशिष्ट्यें ध्यानात घ्यावी लागतात . संस्कृताधारित तत्सम-तद्भव शब्द जेव्हां मराठीत वापरले जातात, तेव्हां शब्दातील अंतिम-ह्रस्व- स्वराचें दीर्घत्व करून उच्चारण्याची आधुनिक मराठीची लकब आहे ( तो शब्द, ‘ओळीतला-अखेरचा-शब्द’  नसला, तरीही ). मात्र, असे शब्द हिंदीत ‘ज्यों के त्यों’, संस्कृतमधील शब्दात कांहींही बदल न करतां उपयोगात आणले जातात , म्हणजे अंतिम-ह्रस्व-स्वर हा ह्रस्वच रहातो. उदा. मराठीत – ‘शक्ती’, हिंदीत – ‘शक्ति’ ; मराठीत ‘आदिकवी वाल्मीकी’ , तर हिंदीत ‘आदिकवि वाल्मीकि’ .  (भाषिक इतिहासात डोकावलें तर त्याची कारणेंही समोर येतात, पण तूर्तास त्यात जाऊं या नको).

स्त्रीला संबोधतांना हिंदीत ‘री’ असा वापर केला जातो, तर मराठीत ‘ग’ ;  पण हा ‘ग’ म्हणजे (ओळीत कुठेही आला तरी)  ‘गऽ’ आहे, , याची माहिती भाषांतरकाराला असावी लागते.

ओळीतला-अंतिम-स्वर हा ह्रस्व असला तरी तो दीर्ध उच्चारायचा, अशी तर मराठीची लकबच आहे. जसें की, गीत-रामायणातील ‘आज मी शापमुक्त जाहले’ या अहिल्येच्या मुखातील गीतामधील एक ओळ अशी आहे –  ‘नीलाकाशीं जशी भरावी उष:प्रभा लाल’. इथें ‘लाल’ या शब्दाचा उच्चार, गातांना, ‘लालऽ’ असा होईल ; पण हिंदीत तेंच गातांना ‘लाल’चा उच्चार ‘लाल्’ किंव फारतर थोडेसें ओढून ‘लाल’ असा होईल. त्यामुळें भाषांतरात जर अंतिम शब्द ‘लाल’ असा ठेवला, तर नक्कीच  मूळ मराठी गीताच्या  चालीत ती भाषांतरित ओळ बसणार नाहीं.

कांहीं वेळा शब्दातील-अंतिम-नसलेल्या-अक्षरातही मराठी व हिंदीत ह्रस्व-दीर्घाचा फरक असतो, जसें की, मराठीत ‘मीलन’ तर हिंदीत ‘मिलन’. त्यामुळे, गीत रामायणातील ‘दैवजात दु:खें —’ या गीतामधील ‘वियोगार्थ मीलन होतें..’ या ओळीचें भाषांतर करतांना भाषांतरकाराला सावध रहावें लागतें.

त्यातून, हिंदीची एक basic tendency च अशी आहे की, हिंदीभाषी लोक जवळजवळ सर्वच शब्दांच्या अंतिम स्वराचा उच्चार ‘अपूर्ण’, (जसें की, ‘हलन्तयुक्त’, असा ) करतात.  उदा. ‘भूतपूर्व’ हा शब्द मराठी व हिंदीत एकाच प्रकारें जरी लिहिला जातो, तरी मराठी उच्चार ‘भूतपूर्वऽ‘ असा होतो , तर हिंदी उच्चार ‘भूतपूर्व्’ असा होतो. (तरीही, वर उल्लेखल्याप्रमाणें, कधीकधी हिंदी गायनात स्वर जराऽसा लांबवला जातोही) . तसेंच, विभक्ती-प्रत्यय लागतांना मराठीत मूळ शब्दाचें रूप बदलतें, तर हिंदीत तो शब्द तसाच रहातो. जसें की, मराठीत ‘रामायणाचें’ या शब्दाचें हिंदीत ‘रामायण का’ असें रूप होईल. अशा वेळी, तोच शब्द तसाच हिंदीत वापरला, तर ओळीचें ‘वजन’ कमी पडेल, ( अगदी ‘मात्रा’ मोजायची गरज नाहीं ) , आणि ती तशी ओळ मूळ चालीत बसणारच नाहीं. अशा वेळी शक्यतो ‘भरताड’ शब्दांचा वापर न करतां योग्य तें (apt) भाषांतर करणें हा एक challenge च असतो.

प्रत्येक भाषेत असे कांहीं ‘खास’ शब्द असतात, ज्यांना योग्य प्रतिशब्द दुसर्‍या भाषेत नसतो.

अँगड़ाइयाँ, अटखेलियाँ, नौटंकी,  या व अशा शब्दांचें मराठीत भाषांतर कठीण जातें ;  तर झुणका, ठेचा, लावणी, कुळथाचें पिठलें, (उपरोल्लिखित) वाघनखें, या व अशा शब्दंचें हिंदीत भाषांतर कठीण जातें .

आणखी एक फरक. मराठीत आपण सहज ‘तूं’ असें संबोधतो. हिंदीत सहसा तसें करत नाहींत. एकतर अगदी लहान मूल असेल ; किंवा  बोलणारी व्यक्ति ज्याला अगदी खालच्या दर्जाचा समजत असेल त्याला उद्देशून ;  किंवा त्या व्यक्तीबद्दल  तुच्छता दाखवायची असेल, त्याचा अपमान करायचा असेल ; तरच  बोलणारी व्यक्ती ‘तू’ चा वापर करते ; पण सर्वसाधारणपणें ‘तुम’ असाच वापर होतो. ( ‘आप’ या शब्दाचाही बरेचदा वापर होतो.  त्यामानानें, मराठीत ‘आपण’ हें आदरार्थी बहुवचन फारच कमी वापरलें जातें ). गीत-रामायणातील ‘पराधीन आहे जगतीं’ या गीतामध्ये राम भरताला म्हणतो – ‘अयोध्येत तूं हो राजा’. हिंदी भाषांतर करतांना येथें ‘तूं’ चा वापर अयोग्य ठरेल.

दोन्ही भाषांमद्ये जरी एकच  ( the same) , किंवा जवळजवळ एकच, संस्कृतोद्भव तत्सम किंवा तद्भव शब्द असला तरी , कधीकधी त्याचा अर्थ मराठीत व हिंदीत वेगवेगळा होतो, तर कांहीं वेळा कांहीं अन्य फरक असतो. कांहीं उदाहरणें पहा – ‘प्रयोग करणें’ या मराठी शब्दरचनेत ‘प्रयोग’ म्हणजे ‘experiment’ हा अर्थ ध्वनित होतो, तर हिंदीत ‘प्रयोग करना’ यामध्ये ‘प्रयोग’ म्हणजे ‘वापरणें’ असा अर्थ ध्वनित होतो. त्याचप्रमाणें, मराठीत आपण संस्कृतोद्भव ‘कविवर्य’ असा शब्द वापरतो, तर हिंदीत तें रूप  ‘कविवर’ असें असतें ; मराठीत आपण ‘उपरोक्त’ असा शब्द वापरतो, तर हिंदीत त्यासाठी ‘उपर्युक्त’ असा शब्द वापरला जातो. मराठीत ‘व्यक्ती’ हा शब्द स्त्रीलिंगी आहे, तर हिंदीत ‘व्यक्ति’ पुल्लिंगी आहे. मराठीत ‘मानस-सरोवर’ असा शब्द आहे तर हिंदीत ‘मानसरोवर’ असा आहे.

संस्कृतोद्भव शब्दातील ‘व’ हा मराठीत ‘व’ च रहातो, (जसें की, ‘निरोप कसला माझा घेतां ?’ या गीतातील ‘वनवासाची मला न भीती’  ही ओळ) . पण हिंदीत त्याचा ‘ब’ होतो, जसें की ‘वन’ऐवजी  ‘बन’. रामायणात, रामाच्या वनवासाबद्दलचे उल्लेख येणारच. हिंदीत तिथें ‘बनबास’, ‘बनवास’ किंवा ‘बनवासा’ असें होतें. अशा वेळी, भाषांतरकरानें खबरदारी घेणें गरजेचें असतें.

अशा कांहीं भाषिक लकबींमुळे, व सांस्कृतिक फरकांमळे, अगदी एकच ( the same ) शब्द जरी मराठी व हिंदीत वापरला, तरी, लय, व परिणामीं, चाल, बिघडूं शकते. या गोष्टीची फाऽर काळजी भाषांतर करतांना घ्यावी लागते. विशेषकरून ग.दि.मां. ची शब्दकळा पाहतां ;  व बाबूजी सुधीर फडके यांची अप्रतिम चाल, ती भाषांतरातही अपरिवर्तनीय ठेवण्याचें महत्व व  अपरिहार्यता जाणल्यामुळे, माझ्यासारख्या भाषांतरकाराची जबाबदारी अनेक पटींनी वाढली.

कांहीं आठवणी

भाषांतर पूर्ण झाल्यावर, चालीसकट-आपलें-भाषांतर कसें झालेलें आहे हें जाणून घेण्यासाठी बाबूजी सुधीर फडके यांना, मी त्यांच्या घरीं भेटलो. त्यांच्या भेटीचा अनुभव भारून टाकणारा होता.

त्यांच्या appointmement साठी मी त्यांच्या घरी फोन केला तेव्हां ते स्वत:च फोनवर आले . ( ही माझ्या अचंब्याची सुरुवात होती. काय !  एवढा मोठा संगीतकार , आणि फोनवर त्यांचा सेक्रेटरी वगैरे कुणी न येतां, स्वत:च फोन घेतो ! ).  मी स्वत:चें background व फोन करण्याचें कारण सांगून त्यांच्या भेटीसाठी वेळ मागितली, आणि त्यांनी भेटायचें मान्य केलें, अगदी सहजपणें, कसलाही बडेजाव न दाखवतां, कसलेही  आढेवेढे न घेतां. त्यानंतरचा बाबूजींचा मला प्रश्न : ‘तुम्हाला कधी मोकळा वेळ असतो ?’. मी चकित ! मी उत्तरलो, ‘आपण म्हणाल तेव्हां मी येईन’. ‘नाहीं, तुम्ही नोकरी करता, तर तुम्हाला सुट्टी असेल तेव्हां भेटतां येईल, म्हणजे तुम्हाला त्यासाठी रजा काढायला नको’, इति बाबूजी. मी अवाक् झालो  !  मोठे लोक इतके  simple असूं शकतात ?

फोनवर मी बाबूजींचा फक्त १५-२० मिनिटें वेळ मागितला होता, पण प्रत्यक्षात त्यांनी मला  तास-दीड_तास वेळ दिला. त्यांनी कांहीं भाषांतरित गीतें वाचली, त्यावर विचार केला, पेटी पुढे ओढली आणि दोनएक हिंदी गीतें गाऊनही बघितली. Wow ! मला तर अस्मान  ठेंगणें झालें. मराठीमधील हा आघाडीचा संगीतकार किती साधा, किती उदार मनाचा आहे, याचा मला प्रत्यय आला.

जिथें शब्दभिन्नता होती, तिथें बाबूजींनी लक्षपूर्वक  वाचून मगच ठरवलें की त्या ओळीचें किंवा कडव्याचें भाषांतर ठीक जमलें आहे किंवा नाहीं. जसें की, ‘कुश-लव रामायण गाती’ हें गीत. या ओळीचें भाषांतर मी ‘कुश-लव रामायण गाते’ असें केलें होतें (आहे) . त्यामुळें, दर कडव्याच्या अखेरीस ‘ते’ या अक्षराचे यमक येणें अपरिहार्य होतें. मूळ काव्यात पहिल्या कडव्याची अंतिम ओळ आहे, ‘ज्योतिनें तेजाची आरती’ . त्याचें रूपांतर मी दोन प्रकारें केलें होतें. पैकी एकात ‘आरती’ हा शब्द ठेवला होता. ती ओळ अशी बनली होती – ‘ आज आरती भास्कर की हैं दीपक उतारते’. पण, तिथें, भाषांतरित ओळीची लांबी  मूळ ओळीपेक्षा जास्त होती, व त्यामुळे, (अर्थाच्या दृष्टीनें नव्हे, तर) चाल अपरिवर्तनीय ठेवण्याच्या दृष्टीनें,  ती बरोबर बसत नाहीं, असें बाबूजींनी मला सांगितलें. त्याच मराठी पंक्तीचें दुसर्‍या प्रकारचें भाषांतर होतें, ‘दीप हैं भास्कर को पूजते. बाबूजींनी ती ओळ  दोनएकदा वाचली, गाऊनही बघितली ; एकदोनदा ‘ज्योतिनें तेजाची आरती’ आणि ‘दीप हैं भास्कर को पूजते’ हें दोन्ही एकापाठोपाठ म्हणून बघितलें ; आणि विचारपूर्वक, या ओळीचें हें भाषांतर योग्य असल्याचा अभिप्राय दिला, (कारण, मला वाटतें की, भाषांतरात  मूळ ओळीचा भाव व्यक्त झालेला होता).

तसेंच, ‘पराधीन आहे जगतीं’  या गीताच्या एका ओळीत, भाषांतर (अर्थामध्ये नव्हे, चालीतही नव्हे , तर)  ‘एकूण-परिणामकारिते’त कमी पडत होतें, व त्यामुळे संपूर्ण गीताचाच overall गोडवा व overall-effectiveness,  यांवर adverse परिणाम होतो, तेंही सांगितलें. ( इंग्रजी शब्द माझे. बाबूजींनी ते शब्द वापरले नसणार. पण, स्पष्टीकरण देतांना मात्र माझें शब्दभांडार अपुरें पडलें).      ती ओळ होती, ‘पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा’. ‘पुत्र मानवाचा’ याचें भाषांतर होईल, ‘पुत्र मानव का’ . पण तें लयीत, व पर्यायानें चालीत, बसत नाहीं. म्हणून मी ‘पराधीन है जग में हर पुत्र मानवों का’ असें भाषांतर केलें होतें. अर्थातच, बाबूजींनी सांगतांच, मी ती ओळ बदलली, हें सांगणें नकोच. तिथेंच tentative बदल करून मी त्यांना दाखवला, व त्यांनी ‘go ahead’ दिल्यानंतर, ती ओळ मी नंतर ‘पॉलिश’ करून ‘फेयर’ केली ; आणि ती आतां अशी आहे – ‘ पाश है बँधा हर नर को पराधीनता का’ .

बाबूजी यतिभंग न होण्याबाबत आग्रही असत. मलाही त्यांनी त्याबद्दल कांहीं  महत्वाच्या tips दिल्या.

बाबूजींच्या सार्‍या सूचना मी अमलात आणल्या, व योग्य त्या सुधारणा केल्या, हें सांगणें नकोच.  त्यांनी दिलेल्या  guidance चा मला आजही उपयोग होतो. आजही मी त्यांच्या भेटीची हृद्य आठवण मनाच्या गाभार्‍यात जपून ठेवली आहे.

( त्यानंतर पंधरासोळा वर्षांनी मला अन्य कांहीं कारणानें बाबूजींना भेटण्याचा पुनश्च योग आला होता. ती आठवणही हृद्य आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी ).

बाबूजींनी मला भाषांतराच्या दृष्टीनें इतकें अमूल्य मार्गदर्शन केलें ; तसेंच मला ‘वाल्मीकी’ ग.दि.मा. यांनाही भेटायचें भाग्य लाभलें असते, तर माझी समज नक्कीच आणखी-कैक-पटींनी वाढली असती. पण, तें नशिबात नव्हतें.

माषांतरासंबंधी मी विद्याताई माडगूळकर यांना पत्र लिहिलें. कांहीं दिवस वाट पाहिली, पण उत्तर आलें नाहीं. त्या काळीं मी ऑफिसच्या कामानिमित्त पुण्याला अधून मधून जात असे. अशा एका पुणें-भेटीत मी  ‘पंचवटी’वर जाऊन थडकलो. तेथें मौजीबंधन किंवा तसेंच अन्य काहींतरी फंक्शन सुरूं होतें. ( त्यावरून माझ्या लक्षात आलें की समारंभाच्या तयारीत त्या व त्यांचे कुटुंबीय व्यस्त असल्यामुळे, मला उत्तर पाठवायला त्यांना जमलें नसणार ). तें पाहून, ‘काय करावें’ अशा दोलायमान मन:स्थितीत मी पडलो. पण, माडगूळकर कुटुंबीयांच्या मनाचा मोठेपणा असा की, त्याही धामधुमीत, त्यांच्यातले एकजण मला भेटले. त्यांनी माझें काम समजून घेतलें, आणि, लौकरच उत्तर पाठवलें जाईल असें आश्वासन मला दिलें. त्याप्रमाणें लौकरच मला विद्याताई माडगूळकर यांचें पत्र आलें. त्यात, गीत-रामायण या काव्याचा कॉपीराइट सध्या आकाशवाणीकडे आहे, असें कळवून , मात्र माझ्या  भाषांतरित काव्याचे कार्यक्रम करण्याची अनुमति त्यांनी मला दिलेली होती.  ( त्या मौल्यवान ठेव्याचा, कांहीं वर्षांपूर्वी, माझ्या टेबलाच्या सुरक्षित, कलुलुपबंद  ड्रॉवरमध्ये प्रवेश करून, वाळवीनें ‘घास’ घेतला, याचें दुख: मला अजूनही सलतें).

एकतर मी गायक नव्हे ; आणि दुसरें म्हणजे, मी एक कॉर्पोरेट एक्झिक्यूटिव्ह होतो त्यामुळे , मला गायनाचे कार्यक्रम करणें जमलें नसतें. पण, विद्याताईंनी दिलेल्या परवानगीबद्दल मी आजही कृतज्ञ आहे. मी बरीच वर्षें महाराष्ट्राबाहेर होतो. तेथें मी खाजगी बैठकांमध्ये चार-सहा किंवा आठ-दहा परिचितांसमोर  माझ्या हिंदी भाषांतरातील दोनएक गीतें वाचून दाखवत असे , आणि अ-मराठीयांना देखील गीत-रामायणातली ती गीतें आवडत असत. (आवडणारच ! अखेरिस, तें ग.दि.मां. चें काव्य !).

आधी उल्लेख केल्याप्रमाणें, माझ्याकडील नोंदीनुसार, मी हें भाषांतर १९७८ च्या पूर्वार्धात केलेलें आहे. म्हणजे , आतां त्याला ४० वर्षें झाली. (या काळात, माझ्या, as a senior corporate execuitive म्हणून असलेल्या professional duties सांभाळून ; आणि professional  life पासून निवृत्ती घेतल्यानंतर माझा बराच मोकळा वेळ देऊन, मी थोडेंफार लेखन करत आलेलो आहे, आणि तिन्ही भाषांमध्ये माझी कांहीं पुस्तकेंही प्रसिद्ध झालेली आहेत).  आजही मी जेव्हां माझें हें गीत-रामायणाचें भाषांतर हातात घेतो, तेव्हां, अजून-कांहीं-बदल करून, कांहीं modifications  करून,  भाषांतर आणखी सुधारावें व मूळ काव्याच्या अधिकाधिक जवळ जावें, असें वाटतें, व तसा मी मधूनमधून प्रयत्नही करतो. भाषांतर व त्यात सुधारणा हा एक continuous process आहे, असें मला  वाटतें. आणि तशी सुधारणा करतांना आपला आनंद द्विगुणित होतो, शतगुणित होतो, हें मला जाणवलेलें आहे.

ग.दि.मां.च्या ‘गीत-रामायणा’चें हिदी भाषांतर करण्याचा विचार माझ्या मनात आला, तो माझ्यासाठी  सद्-भाग्याचा क्षण होता, हें नक्की.

०१-०१-२०१८.

— सुभाष स. नाईक
Subhash S.Naik

मुंबई / पुणें.
M- 9869002126
Landline – ( Mumbai)- 26105365
e-Mail : vistainfin@yahoo.co.in

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..