हृदय मंदिरी शांत राहुनि, प्रियतयांना मार्ग चालणे,
मनां-मनांच्या संयोगांतुनि, सुरेल जमले, हे जीवन गाणे ।
तयांना सुरेल जमले, हे जीवन गाणे ।।धृ।।
न्यारी ऐसी काल गतीही, सर सर सरणे आपुल्या वेगे,
नाना रंगी सुख-दु:खाच्या, स्मृती-शलाका, ठेवुनि मागे ।
संसार सागरीं अनुताप साहुनि, लाभले लेणे चिरशांतीचे,
जीवन मार्गी दिनकर संगे, छाया बहरली अति अनुरागे ।।
मनां-मनांच्या संयोगांतुनि, सुरेल जमले, हे जीवन गाणे ।
तयांना सुरेल जमले, हे जीवन गाणे ।।१।।
दुखणे-खुपणे कधी कुणाचे, “दादा” स्पर्शे दूर व्हायचे,
आपुलकीच्या रसाळ वाणी मधुनि, बंध घातले मना-मनाचे ।
कृती-कृतीतुनि विलसत होते, कर्णापरी अदार्य तयांचे,
सर्वार्थाने अमुचे “दादा” ठरले, स्थान हृदयीं अढळ तयांचे ।।
मनां-मनांच्या संयोगांतुनि, सुरेल जमले, हे जीवन गाणे ।
तयांना सुरेल जमले, हे जीवन गाणे ।।२।।
छाया होती दिनकर मागे, म्हणूनि गेले विणले, जीवन धागे,
धरुनि तन्मयतेने विचारधारा, काढिले नवनीतयोगायोगे ।
जपण्यासाठी लोकसंग्रह, झिजवले तयांनी चंदन देहाचे,
मनां-मनांच्या संयोगांतुनि, सुरेल जमले, हे जीवन गाणे ।
तयांना सुरेल जमले, हे जीवन गाणे ।।३।।
होती छाया रूपी, झूल रुपेरी, नित पाठिवरती मायेची,
संसारास दिनूच्या, म्हणूनि लाभली ही झालर सोन्याची ।
अपत्य-त्रयींनी अलगद हलके, टिपली घटिका मोलाची,
दासगुरु धरितो सदा, कास या पावन चरणांची ।।
मनां-मनांच्या संयोगांतुनि, सुरेल जमले, हे जीवन गाणे ।
तयांना सुरेल जमले, हे जीवन गाणे ।।४।।
-गुरुदास / सुरेश नाईक
११ डिसेंबर २००५
“शिव-सागर”, ठाणे
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply