एका कॉन्फरन्ससाठी मी दिल्लीला गेलो होतो. दुपारचा वेळ मोकळा होता. मी निवांत बसलो होतो. हातात फाइल्स घेतलेला एक तरुण मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला,“सर ओळखलं?” अर्थातच मी ओळखलं नाही. म्हणाला,”चला चहा घेऊ. ”परप्रांतात मराठी माणूस भेटला की बरं वाटतं.
“इथे हॉटेलच्या लिस्टवर मराठी माणसांची नावं शोधली. त्यात नेमकं तुमचंच नाव दिसलं. म्हणून म्हंटलं तुम्हाला भेटूया. मी लहान असताना तुमच्या गोष्टी वाचल्याचं आठवतं.”
मी त्याला नाव विचारलं. पण तो विषय बदलत इतर गोष्टीच बोलत होता. त्याची दिल्लीतली नोकरी. त्याचं घर. इथली मराठी माणसं आणि महाराष्ट्र मंडळ वगैरे.
मला पुन्हा मिटींगला हजर राहणं भागंच होतं. संध्याकाळी थोडा वेळ ठेवा असं म्हणत, तो निघाला.
त्या दिवशी संध्याकाळी त्याला भेटणं मला शक्य झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो माझ्या रुमवर आला. ”चला एकत्र ब्रेकफास्ट घेऊ.”
आम्ही ब्रेकफास्ट घ्यायला बसलो, तेव्हा तो म्हणाला, “मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.” मी खाता-खाता मानेनेच खूण करता तो बोलू लागला.
“तुम्ही मला ओळखणार नाही याची मला खात्री होती. पण न जाणो ओळखलंत तर? म्हणून मी माझं नाव काल तुम्हाला सांगितलं नाही. खूप वर्षापासून तुम्हाला एक गोष्ट सांगायची किंवा सूचवायचं मनात होतं. लहान असताना धीर झाला नाही. आताही सांगताना असं वाटतंय की, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय..” तो बोलायचं थांबला.
मला त्याच्या बोलण्यातून काहीच कळेना. काही टोटलच लागेना. मी प्रेमाने त्याला थोपटत म्हणालो,”बोल ना बिनधास बोल. जे तुला सांगावंसं वाटतंय ना, ते अगदी मोकळेपणाने सांग. खरं सांगतो मला नाही राग येत. बोल. कमॉन..”
त्याने माझ्याकडे पाहात, माझा अंदाज घेतला. त्याची बेचैनी वाढली होती. त्याचं खाण्याकडे अजिबात लक्षं नव्हतं. खूर्चीवर बसल्या बसल्या त्याचे पायसुध्दा एका लयीत हलत होते. “आपण आता बोलून तर बसलोय पण हे समोरचे गृहस्थ रागावले तर..?” असा काहीसा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.
”सर, मी लहान असताना तुम्ही माझ्या शाळेत आला होतात. आम्हा मुलांशी गप्पा मारायला. त्यावेळी मी इयत्ता चवथीत होतो. मुलांनी खूप आग्रह केल्यावर तुम्ही एक कविता म्हणाला होतात..आईची कविता..आठवतं? त्यावेळी आमच्या वर्गातल्या सर्व मुलांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता.. आणि मी एक प्रश्न विचारला होता.
अजूनही ‘तो प्रश्न’ आणि त्या प्रश्नाच्या गाभ्यातून निर्माण झालेले अनेक प्रश्न माझ्या डोक्यात ठाण मांडून बसले आहेत.. ..”
त्याला थांबवत मी म्हणालो,’मला आठवतोय तो प्रसंग. आणि तुझा तो प्रश्न सुध्दा. खरंच. पण आपली आज अशी भेट होईल असं मात्र वाटलं नव्हतं.अं.. तुझं नाव मंदार? बरोबर..?”
माझ्याकडे किंचित अविश्वासाने पाहात त्याने मान हलवली.
इतक्यावर्षापूर्वी घडून गेलेला तो प्रसंग मला स्पष्ट दिसू लागला.
‘काही वर्षापूर्वी एका शाळेने मला मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं होतं. ‘मी मुलांना मार्गदर्शन करत नाही आणि मुलांसमोर भाषण ही करत नाही’ असं त्यांना सांगताच ते म्हणाले, ‘मग आमच्या शाळेतल्या मुलांशी गप्पा तरी मारायला या.’
प्राथमिक शाळेतल्या मुलांशी गप्पा मारायला मी गेलो. आवडती पुस्तकं, आवडती माणसं, माणसांच्या सवयी, आपल्या नाठाळ सवयी अशा कुठल्याही विषयांवर मुलांशी बोलत होतो. काही मुलांनी आग्रह केला म्हणून मी एक कविता म्हंटली. त्या कवितेच्या शेवटच्या ओळी होत्या, ‘गोड गोड खाऊ आणते, माझी आई मला. गोड गोड खाऊ नको, आईच हवी मला.’
कविता ऐकल्यावर सर्व मुलांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. पण माझ्या समोरच बसलेला एक मुलगा एकदम शांत होता. कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात तो रमला होता. मी जवळ जाऊन त्याला थोपटलं. त्याने खांदे उडवून माझा स्पर्श नाकारला. त्याचं नाव मंदार.
आता शाळ सुटायची वेळ झाली होती. त्यामुळे त्याला घराची आठवण येत असेल किंवा त्याला भूक लागली असेल असा मी विचार केला.
इतक्यात एका मुलाने हात वर करुन मला विचारलं,’सर लहानपणी तुम्हाला काय आवडायचं.. म्हणजे कोणता खाऊ आवडायचा?”
आत्तापर्यंत मी मुलांच्याच आवडिनिवडि ऐकत होतो. त्याबाबत बोलत होतो. पण मला काय आवडतं, हे मात्र मी सांगितलंच नव्हतं. हे त्या मुलान बरोबर ओळखलं.
मी माझ्या आवडी सांगणारच होतो तोच मला जाणवलं कि मंदारला काहीतरी विचारायचं आहे. मी मंदारकडे सहेतुक पाहिलं आणि भुवया उंचावतच त्याला खूण केली,’विचार..’
माझ्याकडे न पाहताच मंदारने विचारलं,’सर, तुम्हाला तुमच्या आवडीचा खाऊ कोण आणून द्यायचं?”
मी काही उत्तर देण्याआधीच सर्व मुले ओरडली, “आईऽऽऽ आईऽऽऽ”
मुलांनी आईच्या नावने एकच कल्ला केला. त्याचवेळी शाळा सुटली. मग तर आईच्या नावाचा गजर करत मुले उधळली.
त्या कार्यक्रमानंतर मंदारचा चेहरा माझ्या लक्षात राहिला. त्याचा प्रश्नाचा रोख काहीसा वेगळा होता. त्याने माझा स्पर्श नाकारुन नकळत आमच्यात असणारं अंतर, त्याने मला दाखवून दिलं होतं. तो काहीसा वेगळा आहे. किंवा मुलांशी गप्पा मारताना एखादवेळेस तो माझ्याकडून नकळत दुखावला गेला आहे. असं मला सारखं त्यावेळी वाटत होतं. एखाददिवशी वेळ काढून त्या शाळेत जावं. आपण सहजच आलोय असं भासवावं पण मंदारला भेटावं असं मला खूपदा वाटे. आणि असं करणं मला सहजी शक्यं ही होतं. पण मी तसं काहीच केलं नाही.
आणि आज इतक्या वर्षानी, हाच मंदार माझ्यासमोर बसला होता.
त्यावेळी मी त्याला शोधत होतो. पण आज यानेच मला शोधून काढलं होतं.
किंचित बॅकफूटवर जात मंदारने मला विचारलं, “तुमच्या इतकं सारं कसं काय लक्षात?”
“कारण त्यानंतर मी खूप दिवस तुझ्याबद्दल विचार करत होतो.”
‘म्हणजे..?’
मंदार, आता माझं ऐक. आधी हा ब्रेकफास्ट संपव. तुला काही सांगायचं होतं, ते मोकळेपणाने सांग. आणि मग भरपूर गप्पा. मी आणखी दोन दिवस आहे दिल्लीत.”
शांतपणे मनातल्या मनात वाक्यं जुळवत, मंदारने खाणं संपवलं. आम्ही चहा पीत बाल्कनीत बसलो.
‘सर, मी तुम्हालाच उद्देशून बोलतोय असं कृपया समजू नका. माझं काही चुकत असेल तर मला सांगा.” माझ्याकडे एक क्षण पाहून मंदारचा बोलण्याचा धबधबा सुरू झाला,’लहानपणी पुस्तकातून, शेजाऱ्यांच्या बोलण्यातून,’आई म्हणजेच ग्रेट. मुलांवर माया करावी, प्रेम करावं ते फक्त आईनेच. घरी येणाऱ्या मुलाची वाट पाहावी, आईनेच. गोड गोड खाऊ आणावा तो ही फक्त आईनेच’ असंच वाचायला किंवा ऐकायला मिळायचं तेव्हा मी खूप बेचैन व्हायचो. म्हणजे ज्या मुलांना आई नाही, त्या मुलांना असं प्रेम कधी मिळणारच नाही? ती मुलं का आयुष्यभर प्रेमाची भुकेलीच राहतील? आई नाही तर प्रेमच नाही? आई आपल्या मुलावर करते तेच खरं प्रेम? पण असं कसं होईल?
सर, मी माझी आई पाहिली ही नाहि. मी आठ दिवसांचा असताना ती गेली असं मला नंतर कळलं. माझे बाबा, माझी आत्या आणि माझी आजी या माझ्या ‘आई’च होत्या. माझ्यावर निरातिशय प्रेम होतं त्यांचं. पण हे मला तेव्हा समजलंच नाही. कारण ‘खरं प्रेम म्हणजे आई. आईच फक्त ग्रेट’ हे समीकरण तेव्हा माझ्या डोक्यात घट्टं होतं.
‘किंवा त्या समीकरणामुळेच माझ्या बाबांचं, आत्याचं माझ्यावर असणारं प्रेम मला शुल्लक वाटत होतं. आणि कधीच न मिळू शकणाऱ्या आईच्या त्या ‘ग्रेट प्रेमाची’ मला ओढ लागली होती. वर्गातली मुलं आईबाबत बोलत तेव्हा मला कसंनुसं व्हायचं. ‘मला आई नाही’ म्हणून जर कुणी मला सहानुभुती दाखवलि तर मला रग यायचा.
‘सर तुमच्या त्या कवितेतली शेवटची ओळ आहे,’आईच हवी मला.’ ही ओळ तुम्ही तेव्हा वेगवेगळ्याप्रकारे म्हंटलीत. बोलक्या चेहऱ्याने आवाजात चढउतार करत म्हंटलीत. त्यावेळी मुलांची मनं आईच्या प्रेमाने ओसंडून वाहू लागली. सर्व मुलांना आईच्या ‘त्या ग्रेट प्रेमाची’ आठवण येऊन त्यांनी टाळ्या वाजवल्या. पण मी मात्र सुन्न होऊन बसलो होतो कारण आईच्या प्रेमाचं समीकरण मला टोचत होतं.
‘आईच्या प्रेमाची किंवा आईची पण महती जरुर सांगावी. पण ‘ज्या मुलांना आई नाही, जी मुलं पोरकी आहेत, अनाथ आहेत त्या मुलांना ही इतर कुणाकडून आई इतकंच प्रेम मिळू शकतं’ असं एखादं वाक्यं का नाही कधी ऐकायला मिळत, वाचायला मिळत? कारण तुम्हा सगळ्यांना आई आहे म्हणून? की आईच्या प्रेमाने तुम्ही इतके आंधळे झाले आहात की तुमच्या आजुबाजूची अनाथ, पोरकी मुलं तुम्हाला दिसतंच नाहित?
‘सर, रागावू नका. आयुष्यात खूप उशीरा हे समीकरण सुटलं, तेव्हा प्रथम तुम्हालाच भेटायचं मी ठरवलं होतं.” अचानक हुंदके देत मंदार बोलायचं थांबला.
आपल्या हातून नकळतच पण किती मोठी चूक झाली हे कळल्याने तर मला शरमल्यासारखं झालं होतं. मी सुन्नं झालो होतो. मला बोलताच येत नव्हतं.
चटकन स्वत:ला सावरत मंदार पुढे म्हणाला,’आपल्याला ‘आईचं प्रेम मिळालं नाही’ ही बोच कित्येक वर्ष माझ्या मनात होती. आपल्याच नशीबात असं का, आपणच का दुर्भागी? असं ही कधी वाटायचं. मित्रांच्या घरी गेलो आणि त्याची आई माझ्याशी प्रेमाने वागू लागली की माझ्या ह्रुदयात कालवाकालव व्हायची. वेगवेगळ्या प्रकारे अनेक वर्ष ते ‘आईच्या प्रेमाचं समीकरण’ मला छळत होतं. शाळा संपल्यावर मी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली आणि इथे आलो.
‘माझी बायको पंजाबी आहे. माझ्या मुलीचं नाव सिमरन. सिमरनला मी माझ्या लहानपणीच्या गोष्टी सांगायचो. एक दिवस ती अचानक मला म्हणाली,’आप कितने लकी है. तुम्हाला तीन-तीन माँ. तुमचे बाबा,आत्या आणि आजी! हो ना?”
‘खरं सांगतो सर, त्याक्षणी मला खूप हलकं वाटलं. इतकी वर्ष न सुटलेलं ते ‘ग्रेट प्रेमाचं समीकरण’ सिमरनने चुटकीसरशी सोडवलं होतं.” मंदारला पुढे बोलता येईना. त्याला खूप भरुन आलं होतं.
मी प्रेमाने त्याचा हात हातात घेतला. त्याला थोपटलं. यावेळी त्याने माझा स्पर्श नाकारला नाही.
मंदारसारख्या मुलांची आपण आता आई व्हायला पाहिजे, असं माझ्या मनात आलं. आणि जणू काही माझ्या मनातलं कळल्याप्रमाणे मंदार माझ्याकडे पाहून हसला.. ओल्या डोळ्याने!
– राजीव तांबे.
Leave a Reply