१२ नोव्हेंबर २०१५ रोजी कट्यार काळजात घुसली चित्रपट प्रदर्शित झाला.
मराठी संगीत रंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. जितेंद्र अभिषेकी ह्यांचे संगीत व वसंतराव देशपांडे ह्यांचा अभिनय असलेले हे नाटक मराठी नाट्यसंगीताच्या सर्वोत्तम नमुन्यांपैकी एक मानले जाते. पंडित भानुशंकर शास्त्री आणि खाँसाहेब आफताब हुसेन ह्यांच्या दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची कथा अतिशय प्रभावी पणे मांडली आहे. आपल्या श्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे नाटक तितकेच प्रभावी पणे सुबोध भावे यांनी चित्रपटाद्वारे रसिकां पर्यंत पोहचले.
पुरूषोत्तम दारव्हेकर यांच्या शब्दांनी सजलेली ‘घेई छंद मकरंद, ‘तेजोनिधी लोह गोल, ‘सुरत पिया की छिन बिसरायी’ ही आणि अशीच इतर लोकप्रिय गाणी. विविध राग, हरकती आणि आवाजातील नजाकतीने सजलेल्या या गाण्यांना पंडितजींनी स्वर्गीय सुरावटींनी संगीतबद्ध केलं होतं. ही गाणी त्याच चालीवर पण नव्या आवाजात या चित्रपटामधून ऐकायला मिळाली. याशिवाय यात ‘दिल की तपीश’, ‘सूर निरागस हो’, ‘मन मंदिरा’, ‘सूर से सजी संगिनी’, ‘भोला भंडारी’ ही नवीन गाणीही श्रवणीय होती. यातील मूळ गाण्यांचं पुनर्ध्वनिमुद्रण आणि ही नवीन गाणी संगीतबद्ध केली आहेत शंकर-एहसान-लॉय या लोकप्रिय संगीतकार त्रयींनी.
‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजला आहे. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन यांच्यासह चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सुबोध भावे दिग्दर्शित ह्या चित्रपटाद्वारे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय कट्यार काळजात घुसली ह्या नाटकाचे मोठ्या पडद्यावर रूपांतर करण्यात आले. ह्या चित्रपटामधून गायक व संगीतकार शंकर महादेवन ह्याने प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
गेल्या वर्षी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची ४६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या “इंडियन पॅनोरमा” विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply