दादां कोंडके यांचे ‘विच्छा माझी पुरी’करा हे नाटक प्रचंड गाजले. नाटकात काम करता करता त्यांनी ‘तांबडी माती’ह्या चित्रपटांतून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटांत काम करत असतानाच त्यांनी स्वतः चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
ते सत्तरचे दशक होते. त्याकाळी हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपट खूपच कमी चित्रपटगृहात लागायचे. ‘सोंगाड्या’ हा दादा कोंडके यांनी निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट होय. “सोंगाड्या” चित्रपटाने दादांचे आयुष्य बदलून टाकले. सोंगाड्या हा चित्रपट कृष्ण धवल चित्रपट होता. “सोंगाड्या ” या चित्रपटात दादा कोंडके, उषा चव्हाण, रत्नमाला,निळू फुले, गणपत पाटील, गुलाब मोकाशी, भालचंद्र कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट २४ फेब्रुवारी १९७१ रोजी सेन्सॉर संमत झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचे आहे. कथा पटकथा संवाद वसंत सबनीस यांचे आहेत तर गीते वसंत सबनीस, जगदीश खेबुडकर आणि दादा कोंडके यांची असून संगीत राम कदम यांचे आहे. या चित्रपटातील मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, काय ग सखू बोला दाजिबा, बिब घ्या बिब शिककाई, राया मला पावसात नेऊ नका ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण अरविंद लाड यांचे आहे तर संकलन एन. एस. वैद्य यांचे आहे. हा चित्रपट सर्वप्रथम पुणे शहरात भानुविलास थिएटरमध्ये रिलीज झाला आणि पहिल्याच शोपासून सुपर हिट ठरला. तेव्हा पुणे, पिंपरी चिंचवड या परिसरात एकूण पाच प्रिन्टने हा चित्रपट रिलीज झाला होता.
बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या या चित्रपटा नंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वत:च्या “कामाक्षी प्रॉडक्शन” ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट निर्माण करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट काढला.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply