वाढत जाणाऱ्या लोकसंख्येबरोबर मूलभूत गरजा देखील वाढत जातात. त्याचा ताण शासकीय व्यवस्थेवर येतो. पाण्याचा वापर जसा वाढत असतो तसाच त्याच्या वापरामुळे सांडपाणी आणि मैला-पाणी वाहून नेण्याची व्यवस्था देखील वाढवावी लागते. पाणी पुरवठ्यासाठी बोअर वेल, टाकी आणि पंपाची व्यवस्था करता येते; मात्र तयार होणारे सांडपाणी शहराच्या मैला-पाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्थेत सोडावे लागते. कचरा संकलनाचीही वेगळी व्यवस्था करावी लागते. हल्ली नव्यानं बांधल्या जात असलेल्या निवासी संकुलात कचरा संकलन करून त्याद्वारे खत निर्मिती आणि निर्मूलन करणे अनिवार्य झालं आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी, अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी, उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करून पर्यावरण पूरक नगररचना आणि बांधकाम होणं ही काळाची गरज झाली आहे.
महानगरांचा चौफेर होत जाणारा विकास, औद्योगिकीकरण, मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, वाढत जाणारी लोकसंख्या, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल राखणं सर्वच ठिकाणी शक्य होत नसल्याचं दिसून येत आहे. यामुळे वीज, पाणी पुरवठा, रस्ते, निवासव्यवस्था, शुद्ध हवा या सर्वांवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होत असताना आपण पाहत आहोत. महानगरांमध्ये अनेक ठिकाणी उभ्या होत असलेल्या टोलेजंग इमारती, मोकळ्या जागांचा, बागांचा, क्रीडांगणांचा अभाव यामुळे वीज, पाणी, निवासव्यवस्था, शुद्ध हवा अशा अनेक मूलभूत गरजांवर मर्यादा येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पर्यावरण पूरक घर बांधणी आणि बांधकाम ही संकल्पना सद्य:स्थितीत नगर रचनेचा अविभाज्य घटक बनत आहे. ईको-फ्रेंडली या नावाने सर्वश्रूत असणाऱ्या या संकल्पनेला प्राधान्य देण्यामागे अनेक महत्वाच्या बाबी आहेत. नगररचना आणि बांधकामासाठी लागणारे घटक अथवा लागणारा माल निवडताना पर्यावरणाचा अभ्यासपूर्वक विचार होणं आवश्यक असतं.
पर्यावरणपूरक नगररचना आणि बांधकाम करण्यासाठी पुनर्निर्मित स्त्रोतांचा वापर केला जाणे गरजेचं असतं. सौर ऊर्जा, पाणी, नैसर्गिक साधनं, घर बांधणी आणि बांधकाम करण्यासाठी लागणारा कच्चा माल, पर्यावरणाला अनुसरून असला पाहिजे. अशा कामात सभोवतालचं वातावरण, नैसर्गिक हवा, अंतर्मन आनंदी राहू शकेल. मनाचं आरोग्य अबाधित कसं राहील हे पाहणं जरुरीचं असतं. यासाठी घरात हवा खेळती राहणं आवश्यक असतं. बांधकामात नैसर्गिक घटकांवर परिणाम करणाऱ्या ऊर्जेचा वापर कमी केला गेला पाहिजे. ऊर्जा आणि पाणी यांचा वापर केवळ गरजेपुरताच केला गेला पाहिजे. यामुळे इमारतींमध्ये सुमारे ३० ते ४० टक्के ऊर्जेची आणि पाण्याची बचत होते. अशा ठिकाणचे वास्तव्य अधिक आरामदायक असतं. नैसर्गिक स्त्रोत वापरल्यामुळे मानसिक आरोग्य टिकून राहतं. घराची अथवा कोणत्याही इमारतींची रचना करताना दारे, खिडक्या यांचा प्राधान्यक्रमानं नैसर्गिक हवा आणि उजेड योग्य तऱ्हेने उपलब्ध होण्यासाठी विचार करावा लागतो॰ यामुळे घरातील तापमान काही अंशी स्थिर ठेवता येतं. सूर्य प्रकाशाचं तापमान आणि नैसर्गिक थंड हवा याचाही समतोल पर्यावरण पूरक रचना केल्यावर साधता येतो. पर्यावरण पूरक घरं ही निसर्गाशी आपली जवळीकता वाढवत असतात. सद्य:स्थितीत प्रदूषण कमी करून चांगलं पर्यावरण सांभाळण्यासाठी अशा घरांची निर्मिती करणं गरजेचं आहे.
विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply