त्यानं डोक्यावरची टोपी काढली . जमिनीवर आपटली . त्या टोपीवर तो थयथया नाचला . टोपीवर जोरात थुंकला आणि पायानं ती टोपी उडवली . टोपी नेमकी कंपाउंड जवळच्या कचराकुंडीत जाऊन पडली . मग त्यानं घाम पुसला . हात स्वच्छ पुसले आणि वरच्या खिशात ठेवलेली पानं हळुवारपणे माझ्या हाती दिली …
मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहिलं .
आणि धक्काच बसला .
आता मला तो व्यासपीठावर बसलेला दिसला .
खाकी कपडे , डोक्यावर पांढरी टोपी , समोरच्या टेबलावर ठेवलेली शाल , श्रीफळ , फुलांचा गुच्छ आणि भेटवस्तू . या सगळ्या गोष्टींकडे आणि हॉलमधल्या सगळ्यांकडे तो निर्विकारपणे पहात होता .
नियत वयोमानानुसार निवृत्त होत असल्याने शिपाई असूनही ऑफिसमार्फत त्याला समारंभपूर्वक निरोप दिला जात होता . त्याच्यावर ,त्याच्या कारकीर्दीवर गौरवाचा वर्षाव होत होता . स्तुतीसुमने उधळली जात होती .
आणि तो निर्विकारपणे सगळं बघत होता .
एकदाच त्याने माझ्याकडे बघितले .
मला पुन्हा धक्का बसला .
त्याच्या निरोप समारंभाकडे बघताना माझ्या हातातली गायब झालेली पानं , पुन्हा माझ्या हाती आली होती .
मी ती पानं वाचू लागलो …
— मला रेस्ट हाऊस ची ड्युटी नको होती . एक तर रात्र रात्र जागत बसावं लागतं . शिवाय नको नको ते बघावं लागतं . ग्लास भरून भरून कंटाळा येतो . शिवाय वर अर्वाच्य भाषेतल्या शिव्या खायच्या . संताप येतो . सांगताही येत नाही , सहनही होत नाही . कधी कधी मध्यरात्रीनंतर कुठल्या कुठल्या तरुणींना घेऊन दलाल ….
मग सह्या झालेल्या फाईल्स रात्रीच कुणाकडे तरी पोचवून , पुन्हा रेस्ट हाऊस गाठायचं …
— आज भाजी आणून दिली साहेबाच्या घरी तर त्याच्या बायकोनं , सगळी लादीपण पुसायला लावली आणि कुत्रा पण …
— शिपाई झालो म्हणून स्वाभिमान गहाण टाकायला लागला . आज सुनावलं साहेबाला , मी त्याच्या वतीनं लाच घेणार नाही म्हणून .
तर कामात कुचराई म्हणून लगेच मेमो …
मी म्हटलं तुझा मेमो सुरळी करून घालतो *त .
तर भर ऑफिसात थोबाडीत मारली . युनियन कडे तक्रार केली तर त्या हराम्यानी साहेबाचीच बाजू घेतली .
नोकरीच सोडली असती , पण आईचं आणि बायकोचं आजारपण , दोन मुलाचं शिक्षण .
गप गुमान माफी मागून मोकळा झालो . कसला स्वाभिमान आणि कसलं काय , परिस्थितीनं रेटवलं की जगणं फाटून जातं .
— शिपाई व्हायचंच नव्हतं . पण पदवी नंतर नोकरी मिळेना , मग काय मिळाली नोकरी ती स्वीकारली . पन्नास हजार खाल्ले भ**नी .
— बायको समंजस मिळाली . कसली तक्रार केली नाही , पण तिला कधी फिरायलासुद्धा घेऊन जाता आलं नाही . तिच्या आवडीचं आईस्क्रीम पण तिला दिलं नाही . तुटपुंज्या पगारात कशी भागवत होती कुणास ठाऊक .
— साहेब सांगायचे , प्रत्येक फायलीत तुला हजार देतो , फक्त फायलीबरोबर येणारा बॉक्स नीट सांभाळ , दिवसभर .
मोह होत होता .
सगळी परिस्थिती बदलून गेली असती . बाकीचे शिपाई गाड्या , जमिनी मिळवत होते . सावकारी पण करीत होते . दारू हॉटेल अशा मजा करीत होते . मी विचार केला , मुलांवर काय परिणाम झाला असता ?
मी सगळ्याला नकार दिला .
आणि बदलून येणाऱ्या प्रत्येक साहेबाच्या नजरेत माझ्याबद्दल तिरस्कार दिसायला लागला …
हातातली पानं अजून फडफडत होती .
अजून बरंच काहीतरी त्यात होतं .
मी सुन्न मनानं पानांकडे पाहिलं.
त्याचक्षणी हातातली पानं गायब झाली होती .
मी समोर पाहिलं .
त्या शिपायाला अजून सगळे गौरवत होते .
तो त्या सागळ्यांकडे पूर्वीसारखा निर्विकार मनानं पहात होता .
आत्मा उडून गेलेल्या कलेवरासारखा तो मला जाणवला .
त्याच्या मनातल्या आत्मचरित्राची पानं , आतल्या आत फडफडत होती , तडफडत होती …!
( पूर्णतः काल्पनिक )
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
दि . ११ जुलै २०२०
Leave a Reply