— आज नुसता आत्मा तडफडत नव्हता. तो आत्मा ,ज्या शरीरात होता , ते शरीर तडफडत होतं . लाथा बुक्यांनी तुडवलं जात होतं. बेल्टच्या प्रत्येक फटक्याबरोबर शिव्यांचा जाळ बरसत होता. शरीर बोंबलत होतं. किंचाळत होतं. कारणही तसंच होतं. त्या पोरानं आमदारसाहेबांची बुलेट चोरली होती आणि साहेबांच्याच कामासाठी अनेक दिवस वापरली होती. अर्थात बुलेट साहेबांच्याच नावावर होती. गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्या बुलेटच्या फायरिंगची चर्चा होती . त्यावरून फिरणारा ‘ तो ‘ साहेबांचा खास माणूस मानला जायचा .
तोंडात मावा , डोळ्यावर गॉगल , चेहऱ्यावर गुर्मी , समोर येणाऱ्या प्रत्येकाला फाट्यावर मारण्याची भाषा , पायातलं पायताण कारकार वाजणारं आणि एकूण देहबोली , साहेबाच्या मर्जीनुसार , वृत्तीनुसार समोरच्याला अपमानित करणारी .
पण हे घराबाहेर !
घरात मात्र चिडचिड . म्हाताऱ्या आईबापाला दमात घेणं , अर्ध्या एकराच्या शेतीत काम करणाऱ्या आईबापाला मदत न करणं , वेळप्रसंगी त्यांच्यावर हात उचलणं , साहेबांचं काम नसेल तेव्हा गावभर उंडारत रिकामपणी उकिरडे फुंकणं , कानाला मोबाईल चिकटवून सगळ्यांना मोबाईलची ऐट दाखवणं, साहेबांच्या फोटोबरोबर छापलेल्या दोनचार डझन पोरांबरोबरचा , लांब कोपऱ्यात असलेल्या स्वतःच्या फोटोच्या फ्लेक्सचा फोटो काढून तो सगळीकडे शेअर करणं , मारामाऱ्या , दमदाटी करणं , पानाच्या गादीवर , टपरीवर , टुकार हॉटेलात उधारी करणं , ती फेडण्यासाठी आईबापाला मजबूर करणं ही काही किरकोळ कारकीर्द होती त्या पोराची. पँटच्या पाठच्या खिशात चपटी आणि शेवेचं पाकीट घेऊन फिरणारा डेरिंगबाज होता तो .
अर्थात नोकरी करून चांगलं आयुष्य जगणं आणि आईवडिलांचा आधार होणं म्हणजे साहेबांबरोबर बेईमानी करण्यासारखं होतं . ते शक्यच नव्हतं . साहेबांचा शब्द आणि साहेबांची सेवा म्हणजे लोकशाही , हे समीकरण पक्कं होतं . ते आईवडिलांना कळत नव्हतं. आईवडिलांना त्यानं सांगून ठेवलं होतं , ‘ एकवेळ उपाशी मरेन पण नोकरी करणार नाही ‘ हा स्वाभिमान खिशात ठेवलेलाच होता , माव्याच्या पुडीबरोबर.
अशा त्या विख्यात पोराला पोलिसांनी उचलला होता .खुद्द साहेबांची तक्रार म्हटल्यावर जसा , जिथे सापडला तिथून त्याला उचलला होता. पोलीस वाटच बघत होते. हा केव्हातरी तावडीत सापडावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. कारण पोलिसांच्या वर्दीच्या आत माणूस दडलेला होता. ‘ त्या ‘ ला कस्टडीत टाकून पोलीस स्टेशनच्या बाहेच्या बाजूला असणाऱ्या चहाच्या टपरीवर सगळे पोलीस आले. आणि सगळी पानं अगदी मोकळेपणानं फडफडू लागली …
‘ माज आला होता साल्याला . साहेबांच्या जीवावर उडत होता.’ ‘ अरे पण ती बुलेट साहेबांनीच त्याला दिली होती ना ?’
‘ त्याला गंडवलं . बँकेतून कर्ज उचललं , हप्ते त्या पोराला भरायला लावले , त्यासाठी त्याला कर्ज काढायला लावलं , इन्श्युरन्स साठी आईचं मंगळसूत्र विकलं त्यानं . गाडी त्याच्या नावावर करतो म्हणून सांगितलं .आणि हप्ते थकवल्यावर त्यानं गाडी चोरली अशी तक्रार केली .’
‘ नाय रे बाबा , आमदार साहेब पक्षांतर करतायत , त्या गोष्टीला यानं विरोध केला . त्याला वाटलं आपल्यामुळं साहेब निवडून येतायत . म्हणून मिटिंगमध्ये हा नको नको ते बोलला . अंडीपिल्ली बाहेर काढीन म्हणाला . उंटाच्या **चा मुका घ्यायला गेला आणि कर्मात मेला आता हा ‘
‘ ह्याला कुजवणार साहेब आता ‘
‘ त्या म्हातारा म्हातारीचं वाईट वाटतंय बघ ‘
‘ अरे त्या रागानं मी बुकलला त्याला.’ ‘ चांगली शेती होती , ती पण आता दोन दिवसांपूर्वी गहाण टाकलीय , आणि त्याच्या म्हाताऱ्याला , म्हातारीला माहीतच नाहीय .’
‘ या राजकारण्यांच्या नादाला का लागतात ही पोरं ? आयुष्य फुकट का घालवतात ? साहेब आपलं करिअर बनवतायत आणि यांचं करिअर बिघडत चाललंय. ‘ ‘ मी ऐकलंय , की हा पोर अपोझिशनचं काम करणार म्हणत होता .’
‘ म्हणजे मालक बदलणार , गुलामगिरी तशीच. ‘ सगळे हसायला लागले .
‘ चला , त्याला आणखी दोन लाथा घालू. लोकशाही जिवंत ठेवणार आहे ना तो.’ आता मात्र टपरीवाला पण हसू लागला .
सगळे कस्टडीकडे वळले.
आत्म्यानं न लिहिलेल्या सगळ्या पानांची सुरळी झाली होती. चोरीला गेलेली बुलेट त्या पोराच्या घरात सापडल्यानं पुराव्यासह गुन्हा दाखल झाला होता. बुलेट साहेबांकडे गेली होती आणि त्याची किल्ली साहेबांनी लोकशाहीच्या नव्या तरुण शिलेदाराकडे दिली होती. अर्थात उरलेले हप्ते त्या नव्या शिलेदारानं फेडायचे आहेत , हे ते सांगायला विसरले नव्हते …
( पूर्णतः काल्पनिक ! )
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
१७ जुलै २०२०
Leave a Reply