….शेवटी त्याने पुन्हा एकदा आत्महत्या केली.
आज करू , उद्या करू , असं करता करता त्यानं एकदाचं फायनल ठरवून टाकलं आणि आत्महत्या केलीच.
आत्महत्या करण्यापूर्वी अर्थातच त्यानं स्टेटस टाकलं फेबुवर. सिलिंग फॅन. त्यावर बसलेला कावळा आणि फॅनच्या खाली लादीवर डेड बॉडी. खूप प्रयत्नानंतर त्याला हे चित्र मिळालं होतं. कॅप्शन तयार होतीच.
कावळ्यांच्या चोचीला येईल धार ।
आत्महत्या कर चल हो तैयार ।।
पोस्ट केल्यावर क्षणार्धात लाईक्स आणि आरआयपी च्या कमेंट्सचा धगफुटीसारखा धोधो पाऊस पडू लागला …
मग त्यानं सुखेनैव आत्महत्या केली. पहिली आत्महत्या केली होती, तेव्हा कुणी दखल घेतली नव्हती. अर्थात त्या आत्महत्येकडे फारसं कुणी गांभीर्यानं घेतलं नव्हतं .
रोज मरे त्याला कोण रडे? असं म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं.
तसा तो रोज थोडा थोडा कणाकणानं मरत होता , पण स्वतः एकदम मेल्यानंतर समाजाला येणारं फिलिंग त्याला अनुभवता येत नव्हतं .
रोजचंच मरण. खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये न शिरता आल्यानं आणि त्यामुळं कामावर जायला उशीर झाल्यानं मिळणारा लेटमार्क आणि सगळ्यांच्या भयंकर कुत्सित नजरांमुळं येणारं मरण. गुणवत्तेपेक्षा लांडीलबाडीला मिळणारं मानाचं स्थान बघून येणारं नैराश्याचं मरण. आत्मविश्वास खच्ची करणारं मरण. कलेचा बाजार मांडणारं मरण. स्वतःचे शब्द विकायला लावणारं आणि त्यासाठी लाचार करणारं मरण. पोट नावाचा खड्डा भरण्यासाठी देहाचं प्रदर्शन करायला लावणारं मरण.
सामाजिक स्तर विसरून भीक मागायला लावणारं आणि समानत्वाच्या पातळीवर आणणारं मरण. स्वतःच्या अस्तित्वासाठी धर्म जात लिंग प्रदेश विसरायला लावणारं मरण.
असंख्य मरणं रोज मरताना आत्महत्येचं फिलिंग काही येत नव्हतं. मग त्यानं आत्महत्या केली .
अर्थात तरुणाईच्या नव्या फंडानुसार स्टेटस टाकून वगैरे …
नंतर त्याचा व्हिडीओ बनवला. अर्थात गळ्यात फास वगैरे अडकवून. तो व्हिडीओ व्हायरल होईल याची त्याला खात्री होतीच. मग त्याने न्यूज चॅनल ऑन केलं. अपेक्षेप्रमाणे त्याच्या आत्महत्येची न्यूज सुरू झाली होती. मग नेहमीचे यशस्वी कलाकार मेकअप करून बाईट्स द्यायला सज्ज झाले. त्याच्या आत्महत्येचं राजकारण सुरू झालं.
त्याचं घर , त्याचा गाव , त्याची शाळा , महाविद्यालय , त्याची माणसं , त्याचं फ्रेंडसर्कल , त्याचं ऑफिस , ट्रेन मधले सहकारी , त्याचा नेहमीचा चहावाला , वडासांभारवाला , बूट पॉलिशवाला , त्याचा लिफ्टमन …या सर्वांचे बाईट्स …
असं सगळं खणून खणून चॅनलवाले दळण दळू लागले. सगळ्यांना भरल्या गळ्यानं बोलायला लावून…
असलेल्या , नसलेल्या गुणांचं प्रदर्शन करायला लावून… त्यानं बनवलेल्या फासाचं वर्णन , शेवटच्या घटका मोजण्या अगोदरच्या मनःस्थितीचं वर्णन , त्यासाठी मनोविकार तज्ज्ञांचं पॅनल , त्यांच्या चर्चा… समकालिनांवर होणाऱ्या परिणामांच्या चर्चा , त्यासाठी समाजशास्त्रज्ञ मंडळींचं पॅनल… असे सगळे धोबीघाट सुरू झाले .
आणि त्यानं खरीखुरी आत्महत्या केली. मग त्याचा आत्मा , आत्महत्येचं खरंखुरं फिलिंग घेऊन अनंतात विलीन झाला .
हरि ओम।
Rip .
( पूर्णतः काल्पनिक !)
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
३१ जुलै २०२०
Leave a Reply