जन्म.१६ नोव्हेंबर १८८९ रोजी पेनसिल्व्हानिया येथे.
दोन महायुद्धांच्या काळातल्या ब्रॉडवेवरच्या सर्वांत लोकप्रिय आणि हिट नाटकांचा लेखक-दिग्दर्शक असलेला आणि सहकाऱ्यांच्या साथीने लिहिलेल्या तब्बल ४५ नाटकांपैकी बहुतेक सर्वच कमालीची यशस्वी ठरण्याचे भाग्य लाभलेला अमेरिकेचा जॉर्ज कॉफ्मन हा गेल्या शतकातला अमेरिकेचा महत्त्वाचा नाटककार, पत्रकार आणि समीक्षक. त्याने राजकीय प्रहसनं लिहिली, विनोदी नाटकं लिहिली आणि काही संगीतिकाही लिहिल्या. नील सायमन वगळता इतर कोणत्याही विनोदी अमेरिकन नाटककाराला त्याच्याइतकी लोकप्रियता लाभली नव्हती. दोन महायुद्धांच्या काळातल्या ब्रॉडवेवरच्या सर्वांत लोकप्रिय आणि हिट नाटकांचा तो लेखक-दिग्दर्शक होता. त्याने बहुतेक वेळा सहकाऱ्यांच्या साथीने तब्बल ४५ नाटकं लिहिली आणि बहुतेक सर्वच कमालीची यशस्वी ठरली. त्याच्या नाटकांमधल्या योगदानाबद्दल त्याला दोन वेळा पुलित्झर पारितोषिक मिळालं होतं. दी मॅन हू केम टू डिनर, यू कान्ट टेक इट विथ यू, मेरीली वुई रोल अलाँग, दी बटर अँड एग मॅन, डल्सी, स्टेज डोअर, ऑफ दी आय सिंग, दी कोकोनट्स, डिनर ॲट एट, असं त्याचं लेखन तुफान लोकप्रिय झालं होतं.
त्याची अनेक चमकदार वाक्यं प्रसिद्ध आहेत जसं – ‘वकील म्हणजे अजब जमात असते. दिवसभर एकत्र जमून खलबतं करत असतात, की आता काय बरे पोस्टपोन करता येईल? एकच गोष्ट ते पुढे ढकलत नाहीत, ते म्हणजे त्यांची बिलं! एका माणसाला म्हणे असं बिल आलं होतं, – रस्ता क्रॉस करून तुमच्याशी बोलायला आल्याबद्दल (आणि ते तुम्ही नव्हतात हे नंतर कळल्याबद्दल) – १२ डॉलर्स! किंवा ‘ऑफिसची वेळ १२ ते एक अशी असून एक तास जेवणाची सुट्टी असेल’ किंवा ‘मला असा डॉक्टर हवाय, की जेव्हा तो मला तपासत नसेल तेव्हा घरी बसून मेडिकलचा अभ्यास करत असेल.’
त्याने मार्क्स ब्रदर्ससाठी अनेक नाटकं लिहिली; पण ते त्याने लिहिलेल्या डायलॉग्जपेक्षा स्वतःच्या अॅडीशन्स जास्त घ्यायचे म्हणून त्याने म्हणे एकदा त्यांचा शो चालू असताना थेट स्टेजवर एंट्री घेतली आणि म्हणाला, ‘मध्येच आल्याबद्दल माफ करा; पण मला आता चक्क मी लिहिलेली एक ओळ ऐकल्यासारखं वाटलं……म्हणून!’
तो प्रचंड हजरजबाबी होता. एकदा एका नटीने स्वतःच एक नाटक लिहिलं आणि ती त्याला सांगत आली, ‘माझ्या नाटकात काही नेपथ्यच नाहीये. पहिल्या सीनमध्ये मी डाव्या विंगेजवळ असते तेव्हा लोकांनी इमॅजिन करायचं की मी एका गर्दीच्या हॉटेलमध्ये आहे. दुसऱ्या सीनमध्ये मी उजव्या विंगेजवळ असते तेव्हा लोकांनी इमॅजिन करायचं, की मी माझ्या घरी बेडवर आहे…’ त्यावर कॉफ्मन तिला पटकन तोडत म्हणाला… ‘मग पुढच्या शोला तुला इमॅजिन करावं लागेल, की समोर प्रेक्षक आहेत…’
जॉर्ज कॉफ्मन यांचे २ जून १९६१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply