सरीसृपांच्या वर्गातील डायनोसॉर नामक प्राण्यांनी पृथ्वीवर कित्येक कोटी वर्षं राज्य केलं. सुमारे चोवीस कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेले हे प्राणी अखेर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी नष्ट झाले. या दीर्घकाळात डायनोसॉरच्या, लहान-मोठ्या, विविध आकारांच्या, वेगवेगळ्या रंगांच्या, अशा अनेक प्रजाती निर्माण झाल्या. अनेक संशोधक डायनोसॉरच्या या विविध प्रजातींचा शोध घेत आहेत. हा शोध घेताना या संशोधकांना कोणत्या प्रजातीचे किती डायनोसॉर होऊन गेले असावेत, याची उत्सुकता आहे. आज अस्तित्वात असलेल्या एखाद्या प्रजातीच्या प्राण्यांची संख्या शोधणं, हे काहीसं सोपं असतं. परंतु नामशेष झालेल्या – आणि तेही अतिप्राचीन काळातील – प्रजातीच्या प्राण्यांची संख्या काढणं हे महाकठीण काम. कारण अतिप्राचीन काळातील प्राण्यांचे अवशेषही फारसे उपलब्ध नसतात. परंतु, कोट्यवधी वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायनोसॉरच्या एका प्रजातीतील प्राण्यांची संख्या काढण्याचं काम अलीकडेच कॅलिफोर्निया विद्यापीठातील चार्ल्स मार्शल यांनी आपल्या सहकाऱ्यांसममवेत यशस्विरीत्या पार पाडलं आहे.
टायरॅनोसॉरस रेक्स अर्थात टी-रेक्स ही एक डायनोसॉरची प्रसिद्ध प्रजाती… आकारानं प्रचंड, शक्तिशाली आणि हिंस्र असणारी! मुख्यतः उत्तर अमेरिकेत वास्तव्याला असणारे हे मांसाहारी डायनोसॉर, डायनोसॉरच्या एकूण कारकिर्दीच्या शेवटच्या काळात होऊन गेले. त्यांचं एकूण अस्तित्व हे सुमारे अडीच कोटी वर्षं होतं. चार्ल्स मार्शल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याच टी-रेक्सच्या संख्येचा अंदाज वर्तवला आहे. मार्शल यांच्या गणिताचा एक महत्त्वाचा आधार आहे तो, प्राण्याचं वजन आणि त्याची एखाद्या ठिकाणची संख्या, यांच्यातील गणिती संबंध. प्राणी जितका मोठा, तितका त्याचा आहार जास्त, इतका आहार मिळवण्यासाठी लागणारी जागाही जास्त… त्यामुळे मोठ्या आकाराच्या प्राण्यांची संख्या नेहमीच कमी असते. या गणिती संबंधाला या संशोधकांनी जोड दिली ती, आता उपलब्ध असलेल्या टी-रेक्सबद्दलच्या जीवशास्त्रीय माहितीची. पूर्ण वाढ झालेल्या टी-रेक्सची उंची सुमारे चार मीटर आणि लांबी बारा मीटर असल्याचं, तसंच त्याचं वजन सुमारे सात टन असल्याचं, टी-रेक्सच्या अवशेषांवरून माहीत झालं होतं. त्याचबरोबर हाडांतील वर्तुळांवरून टी-रेक्सचं सरासरी वय सुमारे अठ्ठावीस वर्षं असल्याचं दिसून आलं होतं. याशिवाय टी-रेक्सच्या वाढीच्या वेगावरून त्याच्या शरीरातील अन्नाच्या चयापचयाचा वेगही पूर्वीच काढला गेला होता. हा वेगही महत्त्वाचा. कारण, प्राण्याला लागणाऱ्या अन्नाची गरज या चयापचयाच्या वेगानुसार कमी-जास्त असू शकते.
अशा संशोधनाला उपयुक्त ठरतील असे टी-रेक्सचे अवशेष खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. एकूण फक्त बत्तीस टी-रेक्सच्या अवशेषांवरून मार्शल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संगणकीय प्रारूप तयार केलं. या प्रारूपावरूनच टी-रेक्सच्या संख्येचं गणित मांडणं, या संशोधकांना शक्य झालं. मार्शल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गणितानुसार एकाच वेळी सरासरी सुमारे वीस हजार टी-रेक्स अस्तित्वात असत. टी-रेक्सच्या अस्तित्वाच्या एकूण सुमारे अडीच कोटी वर्षांच्या काळात, टी-रेक्सच्या सुमारे सव्वा लाख पिढ्या होऊन गेल्याचं हे प्रारूप सांगतं. या हिशेबानं उत्तर अमेरिकेत एकूण अडीच अब्ज टी-रेक्स होऊन गेले असावेत. प्रत्येक टी-रेक्स हा सरासरी सुमारे शंभर चौरस किलोमीटर (म्हणजे दहा किलोमीटर लांबी आणि रुंदी असणारा चौरस) वापरत होता. टी-रेक्सच्या अवाढव्य शरीराला पुरेसा आहार मिळण्यासाठी इतक्या परिसराची गरज होतीच.
मार्शल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, या सर्व निष्कर्षांमागच्या अनिश्चित घटकांची पूर्ण जाणीव आहे. तरीही त्यांचं हे प्रारूप अतिशय महत्त्वाचं ठरतं. कारण कोट्यवधी वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या प्राण्यांची, अल्पशा पुराव्यावर आधारलेली मोजदाद करण्यासाठी या संशोधकांनी नवा मार्ग दाखवला आहे. आतापर्यंत डायनोसॉरच्या सुमारे सातशे प्रजातींचे अवशेष सापडले आहेत. पंरतु डायनोसॉरच्या अठरा कोटी वर्षांच्या अतिप्रदीर्घ कालावधीत, डायनोसॉरच्या कित्येक लाख प्रजाती निर्माण होऊन नष्ट झाल्या असतील. यांपैकी अनेक प्रजातींच्या डायनोसॉरचे अवशेष मिळण्याची शक्यताही नाही. परंतु ज्या प्रजातींचे अवशेष उपलब्ध आहेत, त्यावरून त्या-त्या प्रजातींची मोजदाद करण्याचा या शास्त्रज्ञांच्या चमूचा मानस आहे. या मोजदादीवरूनच प्राणिजगताचं, डायनोसॉरांच्या काळातलं चित्रं उभं करणं, काही प्रमाणात तरी शक्य होणार आहे.
चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/g-XO0bUG4DM?rel=0
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: Field Museum of Natural History, Chicago – John Gurche & Field Museum of Natural History, Chicago
Leave a Reply