शेफाली वैद्य यांच्या फेसबुक वॉलवरुन – संकलन – अशोक साने…
फेसबुकवर एका मित्राने प्रश्न विचारला होता, असं फक्त एक पुस्तक सांगा ज्या पुस्तकामुळे तुमचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.
तो प्रश्न वाचला आणि माझं मन दहा वर्षं मागे धावलं.
मी गरोदर होते तेव्हाची गोष्ट. तिळी मुलं पोटात आहेत हे कळल्यामुळे आधीच धाकधूक होत होती.
पहिले तीन महिने तर इस्पितळाच्या वाऱ्या करण्यातच निघून गेले होते.
पाचव्या महिन्यात नुकतंच सगळं थोडं स्थिरस्थावर झालं होतं. सुटकेचा निःश्वास सोडतो न सोडतो तोच एका दुपारी अचानक पोटात खूप दुखायला लागलं.
डॉक्टरना फोन केला तर ते म्हणाले की लेबर पेन्स असू शकतात. ताबडतोब इस्पितळात भरती व्हा.
तसेच अंगावरच्या कपड्यानिशी इस्पितळात गेलो. तपासणी करून डॉक्टर गंभीर चेहेऱ्याने म्हणाले प्री-टर्म लेबर पेन्स आहेत. पुढच्या चोवीस तासात कधीही बाळंतपण होऊ शकतं!
लगोलग पोटातल्या बाळांच्या फुफ्फुसांची वाढ होण्याकरता Steroids ची इंजेक्शन्स देण्यात आली आणि वेदना कमी करण्यासाठी मला एक औषध ड्रीपवर लावलं.
ते औषध शिरेतून शरीरात जाताना तापता लाव्हा नसानसांत ओतल्यासारखं सर्वांग जळजळत होतं.
ते औषध एक Muscle Relaxant होतं. गर्भाशय हा एक मोठा स्नायू आहे, त्याच्या वेदना कमी करण्यासाठी दिलेलं. पण ते शरीरातले सगळेच स्नायू शिथिल पाडतं, अगदी हृदयाचे देखील. त्यामुळे सतत Heart Monitor वर राहावं लागायचं.
लघवीसाठी केथेटर. जेवण म्हणजे सलाईन आणि गळ्यापासून खाली जवळ जवळ Paralysis झाल्यासारखीच स्थिती. सगळ्या जाणीवा शाबूत पण काहीही करता यायचं नाही स्वतःहून.
अश्या परिस्थितीत असताना तिथल्या डॉक्टरनी तिथल्या कायद्याप्रमाणे दिलेली एकूण परिस्थितीची आकडेवारीसकट माहिती. ‘येत्या चोवीस तासात बाळं जन्माला आली तर त्यांची जिवंत राहण्याची शक्यता इतके टक्के, मतीमंद निपजण्याची इतके टक्के, रेटीनल आंधळेपणाची इतके टक्के, मेंदूला गंभीर इजा होण्याची इतके टक्के’.
हादरूनच गेलो होतो मी आणि नवरा दोघेही. आम्ही दोघंच इस्पितळात. मला तो आणि त्याला मी.
आई-बाबांना व्हिसा नाकारलेला. सासूबाई परत भारतात जाऊन आठवडा पण झाला नव्हता, त्यामुळे त्याही इतक्या लवकर परत येण्याची शक्यता नाही.
अश्या वेळी धीर देणारं, पाठीवरून हात फिरवणारं एखादं वडिलधारं आपलं माणूस जवळ नाहीये ही जाणीव किती भयानक असते ते सांगून समजणार नाही.
त्यात औषधामुळे सुरु झालेल्या जबरदस्त हेल्यूसीनेशन्स!
बाहेर जर काही खुट्ट आवाज झाला की छातीत धडधडायला लागायचं.
टीव्ही बघायला लागले तर टीव्हीवरची बातम्या सांगणारी बाई आता बाहेर येऊन माझा गळा दाबणार अशी अनावर भीती वाटायची.
नवरा दोन क्षण जरी खोलीबाहेर पडला तरी सैरभैर व्हायचे मी. दहा-दहा मिलीग्रामच्या झोपेच्या गोळ्या घेऊनही जेमतेम तास-दोन तास झोप लागायची. बाळं इतक्या लवकर जन्माला आली तर त्यांचं काय होणार ही जीवघेणी भीती प्रत्येक क्षण सतावणारी. विचार करून करून अक्षरशः वेडी झाले होते मी.
नवरा सतत बरोबर होता. आई-बाबा, मोठे दोघे भाऊ, इतर नातेवाईक, मैत्रिणी सगळे फोनवरून धीर द्यायचे, पण काही सुचत नव्हतं. जगण्याची उर्मीच संपलेली होती. एखाद्या विकल क्षणी वाटून जायचं, सगळं संपवून टाकावं एकदाचं खूप झोपेच्या गोळ्या एकदम घेऊन. मोठ्या निकराने तो विचार मागे ढकलायचे पण चांगले विचार यायचेच नाहीत मनात. सारखी मनाला ग्रासून बसलेली भीती. केसाळ, कुरूप, हिंस्त्र!
अशाच एका काळ्याकुट्ट क्षणी नवऱ्याने हातात पुस्तक ठेवलं. रणजीत देसाई यांचं श्रीमान योगी. घरून त्याने ते मुद्दाम आणलं होतं. ‘वाच’, तो म्हणाला.
मला तर पुस्तकाचं पानही उलटवता येत नव्हतं स्वतःहून. पण नवऱ्याने डॉक्टरला सांगून एका स्टेन्डवर ते पुस्तक ठेवलं आणि मी वाचायला लागले. आधी श्रीमान योगीची पारायणं केली होती पण त्या दिवसांत मला जिजाऊ जशी भेटली तशी ती आधी कधीच कळली नव्हती.
मी वाचत गेले, पानं नवरा उलटायचा किंवा नर्स.
त्या पुस्तकात एक प्रसंग असा आहे, शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंगच्या तंबूत पंचहजारी मनसबदारी स्वीकारायला जातात आणि अपमानाने विद्ध होऊन परत राजगडावर येतात. ते कुणाशीच बोलू इच्छित नाहीत.
शेवटी जिजाऊ स्वतः त्यांच्या महालात जातात, महाराजांना समजवायला. महाराज एकदम निराशपणे बोलत असतात. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकत नाहीत तेव्हा जिजाऊ एकदम संतापाने फुत्कारतात.
आता नेमके शब्द आठवत नाहीत पण त्यांच्या संवादाचा साधारण आशय असा होता ‘अपमानाच्या, कुणी वाली नसण्याच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका राजे. परमुलखात, परक्याघरी, नवऱ्याने टाकलेल्या अवस्थेत मी तुम्हाला जन्म दिला. सासर-माहेरचा कुठलाच आधार नसताना. तुमच्या चिमण्या बोटाला धरून पुण्यात आले. ओसाड गावची जहागीरदारीण मी, नवरा हातातून सुटला, मोठा मुलगा कायमचा गमावला तरी तुम्हाला कुठल्या बळावर मोठं केलं आम्ही?’
तो उतारा वाचला आणि अंगाला एकदम झिणझिण्याच आल्या! टेक्सास मधल्या इस्पितळातल्या त्या खिडकी नसलेल्या, तुरुंगासारख्या खोलीत, अंगात पाच-सहा नळ्या खुपसलेल्या अवस्थेत मी तो उतारा कमीत कमी पंचवीस वेळा तरी वाचून काढला असेल.
एकदम स्वतःची लाज वाटली. वाटलं, त्या माउलीने इतकं सगळं सोसून जगाला शिवाजी दिला आणि मी माझ्या पोटातल्या, माझ्या रक्तामांसाच्या गोजिरवाण्या बाळांसाठी एवढंही सहन करू शकत नव्हते?
पुस्तकातल्या जिजाउंचा एकेक करारी शब्द एखाद्या आसूडासारखा माझ्या देहा-मनावर फुटत होता, मला धिक्कारत होता, फटकारत होता आणि त्याच वेळी आईच्या डोळस मायेने मला परत उभं राहण्यासाठी गोंजारतही होता.
कडयाच्या टोकावर उभी होते मी तेव्हा. सभोवताली सगळा अंधारच होता. कुठूनही कसलाही आशेचा किरण दिसत नव्हता. तीन जीवांची जबाबदारी डोक्यावर होती. त्यांचं पुढे काय होईल ही जीवघेणी भीती प्रत्येक क्षणी मनाला ग्रासून होती. त्या विलक्षण नाजुक मनःस्थितीत असताना श्रीमान योगीमधल्या त्या एका उताऱ्याने मला परत जगण्याची जिद्द दिली.
परिस्थितीशी लढण्याची ताकद दिली. खऱ्या अर्थाने माझा स्वतःकडे, माझ्या परिस्थितीकडे, माझ्या देहांत वाढत असलेल्या त्या तीन जीवांकडे बघायचा दृष्टीकोन पार बदलून गेला.
डॉक्टरांचे सर्व निष्कर्ष धाब्यावर बसवत मी पुढे जवळ जवळ नऊ आठवडे त्या इस्पितळात काढले. त्याच शरपंजरी अवस्थेत. त्या दिवसांत मी श्रीमान योगी कमीतकमी पाचवेळा तरी वाचून काढलं असेल.
मुलं जन्माला आली ती सातवा महिना संपल्यावरच. त्या नऊ आठवड्यांमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने नवीन जीवन लाभलं होतं.
कदाचित गरोदर असताना श्रीमान योगी इतक्या वेळेला वाचल्यामुळे असेल, पण माझ्या मुलांना शिवाजी महाराजांच्या गोष्टींचं, त्यांच्या एकूणच चरित्राचं, त्यांचे किल्ले पाहण्याचं अनावर आकर्षण आहे!
योग्य वेळी हातात पडलेलं एखादं पुस्तक, एखाद्या प्रतिभावान लेखकाच्या लेखणीतून उतरलेले शब्द, एखाद्या डोंगराएवढ्या मोठ्या व्यक्तीचं चरित्र खरंच, आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं!
— शेफाली वैद्य यांच्या वाॅल वरुन साभार
— संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..
Leave a Reply