अमिताभचा १९७७ सालचा अमर अकबर अँथोनी हा अतिशय गाजलेला चित्रपट कोणाला माहित नाही असे होणे नाही. आजही या चित्रपटातील गाणी आणि संवाद लोकांच्या आठवणीत आहेत. या चित्रपटात अमिताभने साकारलेले अँथोनी नावाचे पात्र फारच गाजले.
लोकांच्या मनावर या पात्राने त्या काळी अधिराज्य गाजवले असे म्हटले तर वावगे ठरू नये. चित्रपटातील अमिताभच्या पात्राचे वर्ण करणारे ‘माय नेम इज़ अँथोनी गोन्सालवीस , मैं दुनिया में अकेला हूं.’ हे गाणं तर आजही गुणगुणण्यासारखे आहे.
आता तुम्हाला आम्ही याच पात्राच्या नावाबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट सांगणार आहोत.
तुम्हाला वाटत असेल की अँथोनी गोन्सालवीस हे नाव लेखकाच्या लेखणीतून काल्पनिकरित्या उतरले असेल, पण हे खरं नाही आहे. अँथोनी गोन्सालवीस या नावाचा एक व्यक्ती आपल्या बॉलीवूड मध्ये कार्यरत होता, त्याच्याच नावावरून अमिताभच्या रांगड्या पात्राचे नाव अँथोनी गोन्सालवीस ठेवण्यात आले होते.
आपल्यापैकी बहुतेक जणांना ही गोष्ट देखील ठावूक नसेल की मूळ कथेमध्ये अमिताभच्या पात्राचे नाव अँथोनी फर्नांडीस ठेवण्यात आले होते.
या चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलं होतं, तर गाणी लिहिली होती आनंद बक्षी यांनी. एकदा हे तिघं मिळून गाण्यांबद्दल चर्चा करत असताना त्यांच्या लक्षात आलं की ‘माय नेम इज़ अँथोनी फर्नांडीस’ या बोलासह गाण जास्त आकर्षक वाटत नाहीये. त्यामुळे त्यांनी गाण्यात बदल करायचे ठरवले, त्यानुसार पात्राचे नाव देखील बदलून अँथोनी गोन्सालवीस करण्यात आले. मुख्य गोष्ट म्हणजे हे नाव प्यारेलाल यांनी सुचवले होते.
प्यारेलाल यांनी हे नाव सुचवलं कारण त्यांना ज्या व्यक्तीने व्हायोलीन शिकवले त्यांचे नाव अँथोनी गोन्सालवीस होते.
एकप्रकारे या गाण्यामध्ये आणि संपूर्ण चित्रपटामध्ये आपल्या गुरुचे नाव वापरून त्यांना गुरुदक्षिणा अर्पण करण्याचा प्यारेलाल यांचा हेतू असावा. त्यांच्या या मागणीला चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी देखील दुजोरा दिला. त्यामुळे अँथोनी गोन्सालवीस हे नाव वापरण्यात आले.
प्यारेलाल यांचे गुरु म्हणजे अँथोनी गोन्सालवीस हे बॉलीवूडमधले पहिले म्युजिक अरेंजर होत. त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना ठावूक आहे. संगीतकार मदन मोहन पासून ते आर.डी. बर्मन सारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले आहे.
गाण्याच्या दोन अंतरामध्ये म्युजिक देण्याचा ट्रेंड देखील अँथोनी गोन्सालवीस यांनीच बॉलीवूड मध्ये आणला.
संगीतकारांसाठी सर्वात प्रथम स्टाफ नोटेशन्स बनवण्याचं श्रेय देखील त्यांनाच जातं. १९६० साली त्यांनी संगीत क्षेत्रातून संन्यास घेतला होता. २०१२ साली त्यांचे निधन झाले.
भारतीय संगीत क्षेत्रामध्ये असे अमुलाग्र बदल घडवून आणणारा हा व्यक्ती मात्र कधीही रसिकांपर्यंत पोचू शकला नाही, परंतु त्यांचे शिष्य प्यारेलाल यांनी मात्र त्यांना एक अनोखी गुरु दक्षिणा देत अँथोनी गोन्सालवीस हे नाव अजरामर केले.
Leave a Reply