छ.शिवाजी महाराजांच्याही पत्रातून समर्थ रामदास स्वामींचे स्थान स्पष्ट
सिवतर तालुका,मौजे पारमाची,कोंड नलवडा,
‘नलावडे कोंड’बाबतचे दूर्लक्ष वादाचे कारण
समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत 1 जानेवारीपासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या खऱ्या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर आता संशोधनादरम्यान समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी नलावडे कोंड याठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असल्याच्या स्पष्ट उल्लेखाकडे केलेले दूर्लक्षच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. छ.शिवाजी महाराज यांच्याच एका पत्राचा संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक 13 मध्ये पान क्र.22 वर आला असून त्यामध्ये नलावडे कोंड येथे श्री येऊन राहिल्यामुळे पेठ वसविण्याची आज्ञा केल्याचा इतिहास उघड करीत आहे.
इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुसऱ्या प्रकरणात पान क्रमांक 11 पासून ‘कल्याणस्वामींचे पत्र’ या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक 87 नुसार उल्लेख केला आहे. यामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. 1675 ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक 87) ”श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन … आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते…श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, ‘तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही….” या लेखांकामधील नवलवाडीयाचा कोंड म्हणजे नलावडे कोंड याकडे समर्थ अभ्यासकांचे दूर्लक्ष झाल्यानेच शिवथर घळीबाबतचे संशोधन चुकीचे ठरत आहे.
सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची, नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथर तालुक्यातील आहे. कल्याण स्वामींच्या पत्रानंतर आता छ.शिवाजी महाराजांचे पत्रदेखील उपलब्ध झाले असून समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याबाबत यामध्ये कोंड नलवडा, मौजे पारमाची,ताा. सिवतर असा उल्लेख दिसून येत आहे. या पत्रातील बराचसा मजकूर फारशी भाषेत परंतु मूळ पत्र मोडीमध्ये असल्याची माहिती उपलब्ध असून शके1597 भाद्रपद वद्य 8 रोजी हे पत्र लिहिण्यात आले आहे. यातील आज्ञेचा तपशील ‘कोड मजकुरी म्हणजे (नलवडा कोड येथे) श्री येउनु राहीलियाउपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणी 12 वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून देवीला….बारा वर्षाउपरी दिवाण हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजूर मोर्तब सुद’ असा आहे. या आज्ञापत्रावर शिवमुद्रा आणि त्र्यंबकसुत मोरेश्वर यांची मोहोर आणि ‘मर्यादेय विराजते’ अशी मोहोर असून संपूर्ण पत्र एका कारकुनाच्या हातचे ‘परवानगी हुजूर’ ही अक्षरे दुसऱ्या कारकूनाच्या हातचे तर ‘मोर्तब सुद’ ही अक्षरे तिसऱ्या कारभाऱ्याच्या हातची आहेत.
या पत्रावरून आजतागायत समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य कोठे होते,याबाबतच्या वादावर पडदा पडला असून समर्थांच्या नलवडा कोंड येथील वास्तव्याच्या कालावधीचाही अंदाजही लावण्यास छ.शिवाजी महाराजांनी सुमारे 12 वर्षापर्यंत रामनगर पेठेचा दिवाण हासील माफ करण्याची आज्ञा दिल्यावरून स्पष्ट होत आहे.
आतापर्यंतच्या संशोधनादरम्यान सुंदरमठ, रामवेधीघळ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच खरी शिवथरघळ,रामगंगा, गुप्तगंगा, खनाळ, देवतार्चनाची जागा, पहिला गणेशोत्सव,जांभळीचा माळ, भटाचा माळ, मठाचा माळ, देवगिरी, घोडउडान, गोविंदमाची, मंडपाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ तसेच मार्ग सोपान करून जावे, समर्थांचे सिंहासन अशा अनेक संकल्पना पुराव्यानिशी सिध्द झाल्या असून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी अनेकवेळा खऱ्या शिवथरघळीच्या संशोधनाबाबत वाद न घालता सर्व समर्थभक्तांनी सामंजस्याने वस्तुस्थितीची शहानिशा करून घेण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply