सोने आणि लोह म्हणजे लोखंड हे दोन वेगवेगळे धातू. वास्तविक दोघेही अग्नीमधून (भट्टीतून) तावून सुलाखून निघतात. मात्र दोन्हींची किंमत मात्र वेगवेगळी. किंमत जास्त असूनही सोने सर्वांना हवेहवेसे वाटणारे, तर लोखंडाची किंमतकमी असूनही ते गरजेइतकेच वापरायला मिळाले तरी खूप अशी त्याबद्दलची भावना.
आपल्यापेक्षा केव्हाही सोन्याला भाव जास्त याची लोखंडाला सतत सल असतेच. मात्र त्याचे खरे दुःख वेगळेच असते.
एका गावात योगायोगाने एका सोनाराचे व लोहाराचे दुकान जवळजवळच होते. एकदा वाऱ्याने सोन्याचा अतिशय पातळ कण उडून शेजारच्या लोहाराच्या दुकानात जाऊन पडला. तेथे जमिनीवर लोखंडाचे कण बरेच पसरले होते.
त्यामध्ये सोन्याचा कण जाऊन पडताच तो लोहकणांना म्हणाला, माझे व तुमचे दुःख आहे. दोघांनाही बराच वेळ आगीत राहावे लागते तसेच आपल्या दोघांनाही हातोड्याचे घाव सोसावे लागतात. अर्थात मी हे घाव अतिशय शांतपणे सहन करतो. तुम्ही मात्र हातोड्याचे घाव झेलताना प्रचंड आरडाओरडा करता.
त्यावर लोहकण त्याला म्हणाले, तू म्हणतोस ते बरोबर आहे. तुझी व आमची कथा व व्यथा एकच आहे. तुझ्यावर हातोड्याचे घाव घालणारा तुझा धातू-बांधव नसतो, मात्र आमच्यावर घाव घालणारा हातोडा आमचाच धातू-बांधव असतो. त्यामुळेच तो आमच्यावर घाव घालायला लागला की, आमचे दुःख जास्तच वाढते व खरे दुःख दाखविण्यासाठी आमचा अधिक आरडाओरडा ( आवाज) चालू असतो.
इतरांपेक्षा स्व-बांधवांनी दिलेले दुःख जास्त तापदायक असते हे त्या दिवशी त्या सोन्याच्या कणालाही कळले.
Leave a Reply