विडे अनेक प्रकारे आवडीनुसार बनवले जातात, खाल्ले जातात आणि खिलवलेही जातात. पण लक्षात राहातं, ते विड्यामुळं लाल झालेलं तोंड.
फक्त नागवेलीचं पान खाल्लं तर लाल रंग येत नाही. सुपारी, चुना, तंबाखू यांमुळेही तो येत नाही. मग विड्याला लाल रंग येतो, तो कशामुळे? लाल रंग येण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो तो कात. काताशिवाय विडा रंगत नाही. विड्यामध्ये अनेक प्रकार असले तरी त्यामध्ये चुना-सुपारीबरोबरच काताचे स्थान अबाधित आहे. खैराच्या झाडापासून कात तयार करतात. खैराचे लाकूड (जिवंत झाडाचेच) पाण्यात उकळवून त्यावर अनेक प्रक्रिया करून कात एल घनरूपात मिळवतात. त्याची जाडसर पेस्ट विड्यात वापरतात. खैराच्या झाडामध्ये ॲपिकॅटेचिन, रॅसेमिक ॲतककॅटेचिन व कॅटेच्युटनिक आम्ल ही संयुगे असतात. झाडात प्रामुख्याने एल अॅपिकॅटेचिन हे युग असलेले ‘खीरसळ’ हे स्फटिकी चूर्ण आढळते.
कात, चुना, सुपारी इ. घातलेला विडा चांगला कुटला, एकजिनसी केला तर त्याचा विटकरी, हिरवट रस दिसतो. तरीही डोळ्यात भरणारा लालभडक रंग येत नाही. परंतु हेच मिश्रण तोंडात चावले की विड्याचा रंग खुलतो. म्हणजेच खुलवणारा लाल रंग येण्यासाठी आपल्या तोंडातील लाळेचाही महत्त्वाचा सहभाग आहे. खरं तर कातातील कॅटेच्युटनिक आम्ल (C13H120g) निष्क्रिय असतं, पण कॅटेच्युटनिक आम्ल गरम पाण्याबरोबर तसंच लाळेबरोबर क्रियाशील होतं. सुपारीमुळे लाळ सुटते. चुन्यामुळे किंचित उष्णता तयार होते. कातातील टॅनिनवर लाळेतील विकरांचा परिणाम होऊन फ्लोबॅफिन हे भडक लाल रंगद्रव्य तयार होतं. ज्यामुळे तोंड लाल दिसतं. फ्लोबॅफिन हा फिनॉलिक पदार्थ पाण्यात विरघळत नाही पण अल्कोहोलमध्ये विरघळतो.
विडा तोंडाची दुर्गंधी घालवतो. पानातील गंधयुक्त बाष्पनशील तेलामुळे तोंडाची दुर्गंधी जाते. परंतु खाणाऱ्या व्यक्तींच्या तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी येते. ती पान खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ न केल्यामुळे. शिवाय विड्याचे प्रमाणाबाहेर सेवन हे आरोग्यास घातकच ठरते. पान खाल्ल्यावर इथे तिथे थुंकून त्याचा इतरांच्या आरोग्यावर हानीकारक परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेतलीच पाहिजे.
-चारुशीला जुईकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply