ज्या एका हातात मावण्यासारख्या यंत्राच्या मदतीने आपण कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण लांबूनच नियंत्रित करू शकतो, त्याला रिमोट कंट्रोल म्हणतात. थोडक्यात त्याला दूरनियंत्रक असे म्हणता येईल.
टी.व्ही., मोबाईल फोन, मोटार, व्हिडिओ कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन अशा असंख्य साधनांचे नियंत्रण या पद्धतीने करता येते. त्यामुळे आता प्रत्यक्ष या यंत्रांची बटणे दाबावी लागत नाहीत. टीव्हीचा रिमोट कुणाच्या हातात असावा यावरून तर भांडणेही होतात. थोडक्यात, हे साधन छोटे असले तरी त्याच्या अंगी नाना कळा आहेत.
निकोला टेस्लाने १८९८ मध्ये सर्वात प्रथम अशा प्रकारचा रिमोट कंट्रोल तयार करून त्याचा वापर बोट चालवण्यासाठी केला होता. त्यानंतरच्या काळात लष्करात रिमोट कंट्रोलचा वापर होत असे. त्यानंतर १९०३ मध्ये टेलेकिनो हा रेडिओ लहरींनी नियंत्रित रिमोट कंट्रोल तयार करण्यात आला. १९३२ मध्ये रिमोटचा वापर करून विमान उडवण्यात आले.
टीव्हीचा पहिला रिमोट कंट्रोल हा झेनिथ रेडिओ कॉर्पोरेशनने १९५० मध्ये तयार केला, त्याचे नाव लेझी बोन्स असे होते. त्यात एक फोटोइलेक्ट्रिक सेल वापरलेला होता. १९५६ मध्ये रॉबर्ट अॅडलर यांनी झेनिथ स्पेस कमांड हा बिनतारी रिमोट तयार केला. अल्ट्रासाऊंडचा वापर त्यात केला होता. १९८०मध्ये इन्फ्रारेड (अवरक्त) रिमोट कंट्रोल पॉल रिवनाक यांनी तयार केला.
बहुतेक रिमोट कंट्रोलमध्ये एक इन्फ्रारेड डायोड वापरलेला असतो. त्यातून अवरक्त प्रकाशलहरी बाहेर पडून त्या संबंधित उपकरणापर्यंत पोहोचतात व त्यामुळे तेथील सेन्सर कार्यान्वित होऊन हवी ती क्रिया घडते. ९४० नॅनोमीटर तरंगलांबीचा प्रकाश देणारा लाईट एमिटिंग डायोड (एलईडी) यात वापरला जातो. जास्त कामे करून घ्यायची असतील तर त्या रिमोट कंट्रोलमध्ये वेगवेगळ्या कंप्रतेचे संदेश तयार करावे लागतात.
रिमोट कंट्रोलमध्ये सिलिकॉनची चिप असते. बटन दाबताच त्यावरील ऑसिलेटर अवरक्त शलाका तयार करतो ती एलईडी मार्फत प्रक्षेपित केली जाते. हा कोडेड सिग्नल संवेदकाकडे ग्रहण केला गेल्यानंतर टीव्हीमधील एका सिलिकॉन चिपकडे जातो व नंतर सांकेतिक संदेशाचा अर्थ लावून तो इलेक्ट्रॉनिक स्वीचकडे पाठवला जातो. आता डिजिटल स्वरूपात संदेश पाठवले जातात.
तैवानमधील संशोधकांनी आता केवळ हातांच्या इशाऱ्यांच्या आधारे टीव्हीचे नियंत्रण करणारा हँड जेस्चर रिमोट तयार केला आहे.
Leave a Reply