(ख़लिल जिब्रानची क्षमा मागून)
जळतं आहे प्रजासत्ताक आणि मी जिवंत आहे त्या आगीच्या झळया खात.
मेले आहेत माझे मित्र आणि माझं आयुष्य बनलंय एक आफत. माझ्या मातेचा पदर भिजलाय रक्तानं आणि अश्रूंनी. माझी प्रियतमा आणि माझे लोक वाहून गेलेत, जळून गेलेत. मी कसा वेड्यासारखा म्हणतोय, अजूनही ते दिवस येतील, डोंगराला वेढणारा प्रकाश आगीचा नसेल, सूर्याचा असेल…
भुकेने गिळले काही जणांना आणि भूक नसलेल्यांना चाकूसुर्यांनी कापलं.
मी कसल्या प्रदेशात राहतोय, गवताच्या कुशीवर लोक झोपतात आणि हसतात फुलांसारखे फुलांकडे पाहून…
यातनामय मृत्यू लाभतोय माझ्या बांधवांना आणि मी जगतोय समृद्धी आणि शांतीत.
छाटलेत का कुणी प्रजासत्ताकाचे पंख ? उरलेच नाहीएत का कुठे सत्याचे शंख ? उदात्त करून घ्यावी काय ही घुसमट ? की जळावं त्यांच्यासोबतच –
भार तरी हलका होईल मनावरचा. कापून टाकावेत काय आपलेच फुटू पाहणारे पंख? त्यांच्यासोबतच त्यांच्यासारखाच मेलो असं समाधान तरी लाभेल…
अध्यात्म देणगीच ना आपली ! राहील कैवल्याच्या चांदण्यात भौतिकतेच्या पलीकडच्या आत्मिक चैतन्याच्या उजेडात
अभिमान ठेवू शकणार नाही मी मग माझ्या अश्रूंचा सुद्धा…
एक दाणा पेरीन मी शेतात, एखादा चिमुकला हात खुडेन कणीस… आणि हटवेल मृत्यूचा अधाशी हात त्याच्या काळजावरचा
असतो जर एखादे पिकलेले फळ तर… एखाद्या भुकेलीनं भागवली असती एखादी वेळ….
पक्षीच असतो तर आनंदानं झालो असतो कुणाची तरी शिकार
पण दुर्दैव ! मी कांदा नाही शेतातला
मी फळ नाही वाळवंटामधलं
हीच तर आहे माझी आफत
हेच वास्तव झुकवतं माझ्या आत्म्याची मान खाली
हेच वास्तव पुतळा बनवितं माझा
वळलेल्या मुठींचा आणि तडतडणार्या शिरांचा.
हाच आहे माझ्या कपाळावर सटवीनं कोरलेला शाप.
मरावं म्हणता सत्यासाठी ? आयुष्य आहे मृत्यूपेक्षा कमजोर आणि मृत्यू सत्यापेक्षा. एक सत्यवचन हाती ठेवून मेल्यानं उजळून निघेल सत्य ? भूकंपातही मरतातच माणसं, पुरात मरतात, वादळात मरतात,मग…
असं सुख माझ्या सगळ्याच बांधवांच्या वाट्याला येत नाही…. माझ्या तर वाट्याला अजून आलेलं नाही !
लोक मरताहेत, बुडताहेत, जळताहेत… दुधादह्यानं भरलेल्या माझ्या प्रजासत्ताकात…अश्रूनं विझणार आहे ही आग ? शोकानं विझणार आहे ही भूक ?
माँ की कोख़ से क़ब्र का रास्ता दूर तो नहीं
लेकिन चलते-चलते एक उम्र लग जाती है !
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply