ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पां. के. दातार यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
८४ व्या अ भा मराठी संमेलनाचे आयोजक: मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचा गौरवशाली इतिहास
मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या संस्थेची स्थापना १ जून १८९३ रोजी झाली त्याला पुढील पार्श्वभूमी होती. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन च्या (सन १७७९ ते १८५९) काळात म्हणजे बिटिश आमदनीत वाचनालयांची आणि ग्रंथालयांची काही प्रमाणात स्थापना झाली पण ब्रिटिश राजवटीतला एक दोष असा होता, की त्या काळातल्या ग्रंथालयांत व वाचनालयांत प्रामुख्याने इंग्रजी ग्रंथाचाच भरणा अधिक असे. वृत्तपत्रे वा मासिकेही इंग्रजीच असायची. त्यामानाने मराठी ग्रंथांना त्यात दुय्यम स्थान असे. किंबहुना ते अगदी अत्यल्पच होते आणि नेमकी हीच उणीव; या ग्रंथालयाचे संस्थापक कै. विनायक लक्ष्मण भावे यांनी व कै. विष्णु भास्कर पटवर्धन यांनी पुढाकार घेऊन व अन्य व्यक्तींच्या साहाय्याने, मराठी ग्रंथांना अग्रस्थान असलेले महाराष्ट्रातील पहिलेवहिले ग्रंथालय १८९३ मध्ये स्थापन केले. ठाण्यापाठोपाठ काही वर्षांतच मुंबई-पुणे येथेही अशीच ग्रंथालये स्थापन झाली आणि म्हणूनच या ग्रंथालयाला महाराष्ट्रातील पहिले मराठी ग्रंथालय म्हणून मान मिळाला आहे.
महाराष्ट्र सारस्वतकार कै. वि.ल. भावे यांनी मुंबई मराठी ग्रंथालयाच्या रौप्यसमारंभात असे म्हटले आहे, की ‘मी ठाणे येथे मराठी ग्रंथालयाची स्थापना केली व त्यावेळी मला कै. विष्णू भास्कर पटवर्धन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.’ आज या ग्रंथालयाला ११७ वर्षे पूर्ण झाली आहेत. असे हे ग्रंथालय ठाणे जिल्ह्याचे भूषण आहे. अशा संस्थेचा थोडक्यात परिचय, मराठी विश्वाला या स्मरणिकेच्या निमित्ताने देणे आवश्यक वाटते.
आजतागायत ही संस्था अखंडपणे मराठी साहित्य, संस्कृती व संस्कार या त्रिवेणीची ठाणेकरांची भूक भागवित आहे. संस्थेला ठाणे जिल्हा ‘अ’ वर्ग मुक्तद्वार सार्वजनिक वाचनालय म्हणून शासनाकडून मान्यता मिळाली असून सर्वोत्कृष्ट जिल्हा वाचनालय म्हणून शासनाकडून रु.२५,०००/- चे विशेष अर्थसाहाय्याच्या रूपात बक्षीसही मिळाले आहे. संस्थेच्या पुढाकाराने कोकण प्रांतीय साहित्य संमेलन (१९३२), मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलन (१९३६), ठाणे जिल्हा साहित्य संमेलन (१९५३), ४२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (१९६०), स्थानिक साहित्यिकांचा मेळावा (१९६३), जिल्हा ग्रंथालयीन कार्यकर्त्यांचे शिबिर (१९६३) इत्यादी उपक्रम राबवण्यात आले असून ही परंपरा आजतागायत चालू आहे व राहील.
जगाच्या पाठीवर कुठेही प्रसिद्ध झालेल्या मराठी पुस्तकाची एकतरी प्रत विकत घेऊन तिचा संग्रह करण्यास, संस्था स्थापना झाल्याच्या पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहे. त्यामुळे आज संस्थेकडे १,४६० पेक्षा अधिक दुर्मिळ पुस्तकांचा अमूल्य ठेवा आहे. तसेच प्रेस अॅक्ट (सन १८६७) येण्यापूर्वीची सुमारे ४५ पुस्तके आहेत व त्यांना लॅमिनेशनही केले आहे. त्याशिवाय अनेक जुन्या नियतकालिकांचाही संस्थेकडे संग्रह आहे. आजमितीस संस्थेकडे १,२५,००० चे जवळपास पुस्तकांचा संग्रह असून संस्थेच्या मुख्य व शाखा वाचनालयातून त्याचा लाभ अनेक वाचक, संशोधक व अभ्यासक सातत्याने घेत असतात. त्यांच्या सोईसाठी संस्थेने एक संपूर्ण मजला ‘संदर्भ वाचनालय’ म्हणून राखून ठेवला आहे. तसेच बालवाङ्मयाचा स्वतंत्र संग्रह असून संस्था,१२५च्या वर दैनिके व नियतकालिके वाचकांना आत्मीयतेने उपलब्ध करून देत असते.
संस्थेला गेल्या ११७ वर्षांत लाभलेल्या वार्षिक समारंभाच्या अध्यक्षांच्या नामावळीवर एक नजर टाकली तरी, किती थोर व्यक्तींच्या पदस्पर्शाने ही संस्था पावन झाली ते सहज लक्षात येईल. (यातील अनेक-म्हणजे ४३ जण पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले.) यातील काही नावे कान्होबा कीर्तिकर, लो. टिळक, शि.म.परांजपे, वि.का.राजवाडे, ह.ना.आपटे, वासुदेव बळवंत पटवर्धन, भारताचार्य वैद्य, श्री. कृ. कोल्हटकर, कृष्णाजी खाडिलकर, न.चिं.केळकर, गो.स.सरदेसाई, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, ज्ञानकोशकार केतकर, वा.गो.चाफेकर, वामन मल्हार जोशी, पंडित सातवळेकर, स्वा. सावरकर, वि.स. खांडेकर, म.म. दत्तो वामन पोतदार, आचार्य अत्रे, मामा वरेरकर, चिं.वि.जोशी, न.र.फाटक, डॉ. वाटवे, ना.ह.आपटे, मुकुंदराव जयकर, य.दि. पेंढरकर, तर्कतीर्थ जोशी, प्रा. काणेकर, चिं.द्वा. देशमुख, ना.सी. फडके, न.वि. गाडगीळ, वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), ग.त्र्यं.माडखोलकर, वि.द.घाटे, पु.भा.भावे, गंगाधर गाडगीळ, वसंत कानेटकर, दुर्गा भागवत, सेतुमाधवराव पगडी, स.गं.मालशे, नरहर कुरुंदकर, महादेवशास्त्री जोशी, गो.नी. दांडेकर, विद्याधर गोखले, माधव मनोहर, राम शेवाळकर, मधु मंगेश कर्णिक, रमेश मंत्री, डॉ. य.दि. फडके, वसंत बापट, माधव गडकरी, गिरिजा कीर, सरोजिनी वैद्य, दाजी पणशीकर, जयंत साळगावकर, आनंद यादव, शं.ना.नवरे, अरुणा ढेरे, अरुण साधू, श्री.श्याम मनोहर, इत्यादी.
संस्थेच्या दोन्ही वास्तू स्वमालकीच्या असून नुकतीच दोन्ही वास्तूंची पुनर्बाधणी करण्यात आली आहे. पूर्वीच्या दोन जुन्या एकमजली इमारतींचे, बहुमजली भव्य इमारतींत रूपांतरण करण्यात आले आहे व त्यातील ४०% भाग भाड्याने देऊन संस्थेच्या उत्पन्नात भरघोस भर घालण्यात आली आहे. याचा उपयोग मराठी साहित्यप्रेमींची अधिक चांगली, आधुनिक व बहुआयामी सेवा करण्यास होत आहे. यासाठी सर्व वाचन साहित्याचे संगणकीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले, आहे.
संस्था केवळ वाचनालय चालवते असे नाही. जवळजवळ १५ ते २० सांस्कृतिक स्वरूपाचे कार्यक्रम ठाणेकर रसिकांसाठी संस्था दरवर्षी स्वतःच्या भव्य सभागृहात विनामूल्य आयोजित करीत असते. तसेच अनेक संस्थांच्या व प्रकाशकांच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम व पुस्तकप्रकाशन करण्यात येते. ग्रंथालयाने पुस्तक प्रकाशनेही केली आहेत. वाचनालय चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संस्था ठाणे जिल्ह्यात अग्रेसर असून, ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यालय संस्थेच्या वास्तूतच थाटण्यात आले आहे.
संस्था अत्यल्प (महिना ३० रुपये फक्त) वर्गणीत वाचकांना या साहित्यखजिन्याचा उपभोग घेऊ देते. संस्थेत बसून वाचण्यास संस्था कुठलेही शुल्क आकारत नाही. संस्था तीधर्मनिरपेक्ष असून येथे सर्व रसिकांना मुक्त प्रवेश आहे. बालवाचकांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे. संस्थेचा सर्व कारभार संस्थेचे विश्वस्त व व्यवस्थापक मंडळ पदरमोड करून अत्यंत पारदर्शी पद्धतीने चालवत असतात. तसेच सर्व सेवकवर्गही सभासदांशी सौजन्यपूर्ण वागून उत्तम सेवा देतात. वा.प्र ओक, द. दा. काळे, दा. बा. देवल इ. यांची नावे घेतल्याशिवाय हा अहवाल पूर्ण होऊ शकत नाही.
विशेष बाब म्हणजे दि.७,८ मे १९६० रोजी कै. प्रा.रा. श्री. जोग यांचे अध्यक्षतेखाली व वामनराव प्र. ओक यांचे स्वागताध्यक्षतेखाली ४२ वे मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे संस्थेने भरवले होते. नंतर १९८८ साली प्रवरानगर येथे होणारे साहित्य संमेलन; निवडणुकीत श्री. डॉ.आनंद यादव पडले व प्रा.श्री. वसंतराव कानिटकर निवडून आले म्हणून प्रवरानगरने नाकारलेले साहित्य संमेलन, १९८८ मध्ये ठाणे येथे झाले. गौरवशाली परंपरा लाभलेल्या अशा या संस्थेला, आता ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे सौभाग्य लाभले ही सर्व ठाणेकरांना अभिमानास्पद गोष्ट आहे.
-पां. के. दातार
ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पां. के. दातार यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
Leave a Reply