भोजराजा कलेचा भोक्ता असल्यामुळे त्याच्या पदरी अनेक विद्वान होते. कालिदासासारखे ‘नवरत्न’ही दरबारात होते. त्यामुळे दूरदूरहून आलेले अनेक कलावंत आपली कला सादर करायचे व राजाकडून बिदागी घेऊन जायचे.
एकदा एक सुवर्णकार सोन्याच्या तीन मूर्ती घेऊन भोजराजाच्या दरबारी आला. त्या तिन्ही मूर्तीची किंमत वेगवेगळी होती. एका मूर्तीची किंमत होती दहा सुवर्णमुद्रा, दुसरीची होती शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसरीची होती हजार सुवर्णमुद्रा. तिन्ही मूर्ती शुद्ध सोन्याच्या, समान वजनाच्या मात्र त्यांच्या किमती वेगवेगळ्या का, याचे कोडे भोजराजासह सर्व दरबारी लोकांना पडले. मात्र नेमके रहस्य सुवर्णकाराखेरीज कोणालाच माहिती नव्हते व ते ओळखावे म्हणून सुवर्णकार दरबारात आला होता. मात्र कोणालाच त्या मूर्तीच्या किमतीचे रहस्य सांगता येईना. शेवटी भोजराजाने कालिदासाला पाचारण केले.
कालिदासाने तिन्ही मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केले. तिन्ही मूर्ती शुद्ध सोन्याच्या, समान वजनाच्या व दिसायला सारख्याच होत्या. बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्या मूर्तीमधील रहस्याची गोम कालिदासाच्या लक्षात आली.
त्याने एक मोठी काडी घेतली व पहिल्या मूर्तीच्या डाव्या कानात घातली व सरळ पुढे नेली तर ती उजव्या कानातून बाहेर पडली. तीच काडी त्याने दुसऱ्या मूर्तीच्या डाव्या कानात घातली तर ती त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. नंतर त्याने ती काडी तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, तर ती पोटातच राहिली.
कालिदासाने पहिल्या मूर्तीची (म्हणजे एका कानाने ऐकणे व दुसऱ्याने सोडून देणे) किंमत दहा सुवर्णमुद्रा, दुसऱ्या मूर्तीची (म्हणजे कानाने ऐकलेले लगेच दुसऱ्याला सांगणे) किंमत शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसऱ्या मूर्तीची (म्हणजे कानाने ऐकलेले आपल्या पोटातच ठेवणे) किंमत हजार सुवर्णमुद्रा असल्याचे सांगितले.
त्या तिन्ही मूर्तीची किंमत कालिदासाने बरोबर ओळखल्यामुळे त्या सुवर्णकाराने खूष होऊन कालिदासाची प्रशंसा केली. नंतर भोजराजानेही माणसातील स्वभाव वैशिष्ठ्ये सांगणाऱ्या मूर्ती तयार केल्याबद्दल त्या सुवर्णकाराचा यथोचित सत्कार करून त्याला परत पाठविले.
Leave a Reply