नवीन लेखन...

“सन डे” च्या सुटीची कहाणी…

The Story of Sunday Holiday in India

आपल्याकडे सर्वसाधारणपणे रविवार हा सुट्टीचा दिवस मानला जातो. या दिवशी शाळा, कॉलेजेस, बॅंका, सरकारी कार्यालये वगैरे बंद असतात. बरीच खाजगी कार्यालयेही बंद असतात. सुट्टीचा दिवस “सन डे” म्हणजे रविवारच का असा प्रश्न कधी पडलाय? या सुटीचा इतिहास काय? ही सुटी कोणामुळे मिळाली ? कधीपासून सुरु झाली असे प्रश्न आपल्याला पडत असतील पण ते आपल्या रोजच्या कामाच्या धबडग्यात मनातच विरुन जातात.

१८४४ मध्ये भारताचे तेव्हाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी भारतातील सरकारी कार्यालयांमध्ये रविवार हा सुटीचा दिवस म्हणून अधिकृतपणे जाहिर केला. मात्र सरकारी क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्रातही रविवारच्या सुटीचं नातं जोडलं गेलेय ते भारतातल्या कामगार चळवळीचे अध्वर्यू नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे, आणि तेही तब्बल सव्वाशे वर्षांपासून !! म्हणजे इथेही “मराठी पाऊल पडले पुढे”….

त्याकाळी कारखान्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांना आठवड्यात हक्काची एकही सुटी मिळत नसे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत बॉम्बे मिल हॅण्ड्‌स असोसिएशन स्थापन केली. ती भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते. त्याच काळच्या फॅक्‍टरी कमिशनला लोखंडे यांनी हजारो कामगारांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देऊन सार्वजनिक सुटी व इतर महत्त्वाच्या मागण्या केल्या. २३ सप्टेंबर १८८४ रोजी लोखंडे यांच्या नेतृत्वात कामगारांची पहिली बैठक घेण्यात आली. त्यात साप्ताहिक सुटी आणि रोजच्या कामात अर्ध्या तासाची सुटी या मागण्या निश्‍चित करण्यात आल्या. २४ एप्रिल १८९० रोजी लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो मिल कामगारांनी मोर्चा काढला. या मोर्चाची दखल मिल मालकांना घ्यावी लागली आणि अखेर १० जून १८९० रोजी मिलमालकांनी बैठक घेऊन रविवारच्या सार्वजनिक सुटीची मागणी मान्य केली.

सर्वसाधारणपणे ज्या देशांवर कधीकाळी ब्रिटिशांनी राज्य केले त्या देशांमध्ये रविवार हा सुटीचा दिवस असतो. याचे कारणही मजेशीर आहे. सहा दिवसात सृष्टी निर्माण केल्यावर देवाने सातव्या दिवशी विश्रांती घेतली असे बायबलमध्ये परमेश्वराने सृष्टी कशी निर्माण केली त्याचे वर्णन आहे. पाश्चिमात्यांचा आठवडा सोमवार ते शनिवार असाच असतो आणि त्यामुळे सहा दिवस काम केल्यावर ते सातव्या दिवशी सुटी घेतात. चर्चमध्ये रविवारी सकाळी सकाळी जाऊन प्रार्थना करतात. पाद्र्यासमोर (चर्चमधल्या फादरसमोर) उभे राहून कन्फेशन देतात म्हणजेच केलेल्या चुकांची माफी मागतात. (थोडक्यात, ज्यांना आपण पुरोगामी विचारांचे म्हणतो तेसुद्धा देवावर विश्वास ठेवतात पण आपल्याकडचे पुरोगामी नास्तिक असण्यात धन्यता मानतात ! )

तर मुद्दा असा की या सुटीचा उपयोग चर्चमधील प्रार्थनांसाठी होईल त्यामुळे ख्रिश्चन धर्मानुसार रविवारची सुटी असावी असे ब्रिटिश अधिकार्‍यांच्या एका वर्गाचे मत होते तर भारताचे बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक स्वरुप बघून त्याप्रमाणे सुटीचा दिवस ठरवावा असे दुसर्‍या वर्गाचे मत होते. सरसकट सुटी दिल्यास रोजंदारीवरचे कामगार (Daily Labours) चिडतील अशीही भीती होती. त्यामुळे मग रोजंदारीवरच्या कामगारांना सुटीच्या दिवशी अर्धा पगार द्यायला सुरुवात झाली.

खरंतर साप्ताहिक सुटीलाही कुठेतरी धार्मिक पार्श्वभूमी आहेच असे दिसते. मोगल काळात भारतात शुक्रवारी सुटी असायची. सत्तेत ज्या धर्माचे प्राबल्य त्या धर्माच्या पवित्र दिवशी सुटी हा जगभर रुढ झालेला प्रघात असावा. कारण मध्यपूर्वेतही शुक्रवारची सुटी असायची आणि पाकिस्तानात तर ती अजूनही असतेच. कदाचित या पवित्र दिवसाला “होली डे (Holy Day)” असे म्हणता म्हणता त्याचा “हॉलिडे (Holiday) झाला असावा.

आज कापड गिरण्या राहिलेल्या नाहीत. परळ-लालबागच्या गिरणगावाची “अपर वरळी” झालेय. नारायण मेघाजी लोखंडे यांची आठवण कोणाला होण्याचे कारणच दिसत नाही. ९ फेब्रुवारी १८९७ हा त्यांचा मृत्यूदिन. त्यांच्याबद्दल विकिपीडियावरील ही माहिती जाणून घ्याच.

— निनाद अरविंद प्रधान 

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

2 Comments on “सन डे” च्या सुटीची कहाणी…

  1. रविवारीच सुटी का त्याचे कारण समजले. धर्मावर आधारित गोष्टी ब्रिटिशांच्या काळात सुरु झाल्या आणि धर्मनिरपेक्षतावादी आता गळा काढतायत.

  2. श्री. प्रधान,
    #रविवार हा चर्चचा वार, म्हणून ख्रिश्चन धर्मीयांना महत्वाचा. येशूचे रीसरेक्शन रविवारी झाले होते, म्हणून तो दिवस रोमन कॅथोलिकांना महत्वाचा वाटतो. ( प्रॉटेस्टंट रीसरेक्शन मानत नाहींत, ते ईस्टर सण पाळत नाहींत. तरीही, त्यांनाही जगभर रविवारच्या सुट्टीची सवय झाली आहे).
    # माझ्या एक नातेवाईक बाई दुबाईला नोकरी करतात. त्या सांगतात की, तेथे अजूनही शुक्रवारी सुट्टी असते. त्याचे कारण, अर्थातच, हा वार मुस्लिम धर्मीयांसाठी पचित्र ( होली) दिवस आहे, हेंच.
    # ज्यू लोकांमध्ये (इस्राइलमध्ये) शाबाथ ( शनिवार) हा धार्मिक महत्वाचा दिवस आहे, म्हणून त्या दिवशी ते काम करत नाहींत.
    # असे विविध धर्मांमध्ये वेगवेगळे दिवस पवित्र मानले जातात. उदा. वीरवार ( गुरुवार) हा शिखांसाठी पवित्र दिवस आहे.
    स्नेहादरपूर्वक
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..