नवीन लेखन...

माथेरानच्या राणीच्या निमित्ताने

The Toy Train of Matheran and its Fate

Toy Train of Matheranमुंबई-पुण्याहून माथेरानला पर्यटनासाठी जाणार्‍यांना माथेरानच्या राणीने नेहमीच खुणावले आहे. गेली तब्बल १०९ वर्षे ही राणी दररोज अनेक प्रवाशांना आपल्या कुशीत घेउन माथेरानचा डोंगर चढत-उतरत आहे. दोन-सव्वादोन तासांच्या, २० किलोमीटरच्या प्रवासात गेल्या दोन वर्षात या राणीने जवळपास आठ लाख प्रवासांना माथेरानच्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवले आहे.

माथेरान हे ठिकाण पर्यावरणीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या गावात प्रदूषण करणार्‍या वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळेच येथे जाणार्‍या पर्यटकांना गावाच्या वेशीबाहेर आपली वाहने उभी करावी लागतात. गावात थेट पोहोचण्यासाठी या माथेरानच्या राणीचाच आधार आबालवृद्धांना असतो.

गेल्या काही आठवड्यात ही माथेरानची राणी एक-दोनदा रुळावरुन घसरली काय आणि तिला कायमची बंद करण्याची चर्चा सुरु झाली काय. खरेतर नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेउन या गाडीला नवीन ताकद देणे गरजेचे आहे. मात्र तशी इच्छाशक्तीच रेल्वेच्या अधिकार्‍यांमध्ये नाही त्याला कोण काय करणार?

सतत महाराष्ट्राला दुजाभाव देणार्‍या रेल्वे प्रशासनाला आता या गाडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोर आलेला दिसतोय. या गाडीच्या निमित्ताने एका उच्च(?)स्तरीय अभ्यास(?)गटाची स्थापना करण्यात आली. ही गाडी यापुढे चालवू नये असा सल्ला या अभ्यासगटाने आपल्या अहवालात देऊनही टाकला. त्यापुढे जाऊन या गाडीची रचना नव्याने करण्यासाठी आणि त्यानुसार नवा रेल्वेमार्ग बांधण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे लागेल असा सल्ला या दिडशहाण्या अभ्यासगटाने दिला.

संवेदनाशुन्य अधिकारी, स्वत:च्या स्वार्थात मश्गुल असलेले प्रशासन आणि उठसुठ परदेशी सल्लागारांवर अवलंबून रहाण्याची प्रवृत्ती यामुळे आपले किती नुकसान होते आहे हे बघणार कोण?

गंमत बघा.. याच महाराष्ट्राच्या मातीत, कोकणासारख्या दुर्गम भागात, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कोकण रेल्वेचा मार्ग ऊभारणार्‍या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडे जम्मू-काश्मीरमधील जास्त खडतर परिस्थितीत रेल्वेमार्ग उभारण्याचे काम अतिशय विश्वासाने केंद्र सरकारने दिले आहे. माथेरानच्या रेल्वेमार्गासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे असे सांगणार्‍या या दिडशहाण्यांना कोकण रेल्वेचे नाव तरी माहित आहे का हा प्रश्न पडावा.

अर्थात एक गोष्ट सरळपणे दिसतेय ती म्हणजे आता रेल्वेला या मार्गाचे लोढणे आपल्या गळ्यात नकोय. त्यामुळे आता ते पर्यटन विकास महामंडळाच्या गळ्यात टाकण्याचे सूतोवाच काहीजणांकडून सुरुही झाले.

माथेरानच्या राणीला कायमचे बंद करण्याच्या सूचनेत एक मोठी खेळी असण्याचाही संशय घ्यायला जागा आहे. सध्यातरी माथेरानच्या डोंगरावर कॉंक्रिट बांधकामे आली नाहीत. पायथ्याशी नेरळ गावात आणि आसपास बंगले आणि सेकंड होमचा सुळसुळाट झालाय. आता तर दररोज मुंबईला ये-जा करण्यासाठीही नेरळ सोयिस्कर असल्याच्या जाहिराती केल्या जात आहेत.

मुंबई-पुण्यातल्या मंडळींना आता “सेकंड होम” साठी वेगवेगळ्या ठिकाणांचा पर्याय उपलब्ध झालाय. यातही नेरळ, कर्जत वगैरे परिसरात घरे किंवा बंगले बांधू इच्छिणार्‍यांची संख्या मोठी आहे. एरवी बाजारात मंदी आल्याची बोंब मारणारे लोक अशी सेकंड होम घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. बिल्डर्सही त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिराती करतात.

मुंबईत हिरवाई राहिली नाही म्हणून मुंबईबाहेरच्या ठिकाणी ती शोधण्याच्या हव्यासात हा सगळा पसारा मुंबइबाहेर हलतोय. लवकरच तो नेरळ पार करुन वरवर चढायला सुरुवात करेल. या सिमेंटच्या जंगलांनी माथेरानचा श्वास गुदमरायला लागेल. माथेरानच्या या हिरवाईत नवी कॉक्रिट जंगले उभी रहातील.

आत्ताच काही दूरदृष्टीच्या पॉवरबाज नेतेमंडळींनी या डोंगरावरच्या जागा विकत घेऊन ठेवल्या असतील. कुणाला इथे नव्या “लवासा”चा साक्षात्कार होईल. माथेरानच्या डोंगराच्या कुशीत नव्या गृहप्रकल्पांचे प्लॅन बनतील आणि ते पासही होतील. पर्यावरणाचे नियम धुडकावले जातील. कॉक्रिटची जंगले उभी रहातील… त्यात धनिक गुजराती-मारवाडी रहायला येतील… माथेरानचे मूळ रहिवासी त्यांच्याकडे कामाला लागतील….

माथेरानची राणी बंद झाल्यावर रस्ते मोठे करावे लागतील. त्यासाठी नवी कंत्राटे निघतील. त्या रस्त्यावरील वाहतूक वाढेल. नवा रस्ता बनला की टोलची दुकाने सुरु होईल. वाहतूकीची साधने वाढवावी लागतील त्यामुळे टोलची आवक वाढेल.

एक हिलस्टेशन बरबाद झालं तर काय झालं? आमच्या सात पिढ्यांची कमाई तर होईल?

याच विषयावरील “लोकसत्ता”मधील एक लेख वाचा …

एका ‘राणी’ची विराणी..

— निनाद अरविंद प्रधान

 

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..