आज साठीच्या जवळपासच्या मुंबईकरांना ट्रामचा प्रवास नक्कीच आठवत असेल.
मुंबईत घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्यात कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर असा प्रवास करता येत असे. १८९९ सालच्या प्रारंभी ट्रामने एका आण्यात मुंबईत कुठेही जाता येत असे. सहा ते ८ घोड्यांनी ओढली जाणारी ही ट्राम एका तासात सुमारे ५ मैल अंतर कापत असे.
मुंबईतली ट्राम सुरुवातीला व्यापारी विभागांमध्ये सुरु केली गेली. कुलाबा – क्रॉफर्ड मार्केट – पायधुणी आणि बोरीबंदर – काळबादेवी – पायधुणी अशा २ मार्गांवरून ती सुरु झाली. यामध्ये ग्रॅंट रोड, पायधूनी, गिरगाव, भायखळा आणि ससून डॉक या भागांचा समावश होता.
१९०७ मध्ये ट्रामचे विद्युतीकरण झाले आणि ती किंग्ज सर्कल पर्यंत धावू लागली. तोपर्यंत ट्रामचे शेवटचे स्थानक होते दादरचे खोदादाद सर्कल. शेवटच्या स्टेशनला टर्मिनस म्हणून संबोधतात. त्यामुळेच खोदादाद सर्कललाही दादर ट्राम टर्मिनस म्हणजेच दादर टीटी याच नावाने ओळखले जाऊ लागले. ट्रामची वाहतूक बंद झाल्यानंतर इतकी वर्षे लोटली तरी खोदादाद सर्कलचे दादर टी.टी. हे नावं आजही प्रचलित आहे. कधीतरी टॅक्सीवाल्याला सांगून बघा की खोदादाद सर्कलला जायचेय.. कदाचित त्याला कळणारही नाही.
१९०७ मध्ये BEST ने ट्रामवाहतूक आपल्याकडे घेतली. ७ मे १९०७ रोजी विजेवर चालणारी ट्राम सुरु झाली आणि १९२० मध्ये डबल डेकर म्हणजेच दुमजली ट्राम सुरु झाली.
३१ मार्च १९६४ पासून मुंबईतली ट्राम कायमची बंद करण्यात आली त्यानंतर मुंबईत जलद वाहतुकीसाठी BEST च्या बसगाड्यांना सर्वत्र रस्ते मोकळे झाले.
फेब्रुवारी २०१६ मध्ये दक्षिण मुंबईतल्या काही रस्त्यांचे दुरुस्तीकाम सुरु असताना अचानकपणे जुन्या काळातल्या ट्रामच्या रुळांचे अवशेष सापडले आणि मुंबईतली ट्राम पुन्हा एकदा चर्चेत आली होती.
— निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
www.marathisrushti.com
मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे – भाग ३
(क्रमश:)
छान नवीन माहिती मिळाली