लेखक : राहुल बोर्डे, पुणे
विविधतेत एकता जपलेला भारत देश म्हणजे जगासाठी ज्ञानाचा एक अथांग महासागर आहे. या देशाच्या इतिहास, परंपरा आणि वर्तमानातून जगाला घेण्या सारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. असंख्य क्षेत्रातील या देशाची वैशिष्ट्ये आणि ज्ञानाचा खजिना कदाचित भारतीयांना देखील माहीत नसेल. काही क्षेत्रानुसार आणि विषयवार अभ्यास केला तर आपल्याला आपल्या देशाच्या अमूल्य गोष्टी लक्षात येतील. विषय तर अनेक आहेत मात्र त्यातील काही निवडक गोष्टींचा घेतलेला हा धावता आढावा.
भाषा : जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे जिथे प्रमुख व उप अशा तब्बल १६०० भाषा शिकण्याची संधी एका व्यक्तीला उपलब्ध होते. यातील २२ भाषांना विविध राज्यानुसार सरकारी भाषेचा दर्जा आहे. जगात कुठेही न सापडणारे “ळ” हे अक्षर फक्त भारताच्या मराठी भाषेत सापडते. देशातील जवळपास ५५% लोक हिंदी भाषा अगदी व्यवस्थितपणे बोलू शकतात. परंतु आपल्या देशात १६०० भाषा असूनही गमतीचा भाग म्हणजे एकाही भाषेला राष्ट्र भाषेचा दर्जा नाही. हिंदी ही अनेक राज्यांमध्ये वापरली जाणारी सरकारी भाषा असली तरीही राष्ट्रभाषा नाही.
खाद्य पदार्थ : भारत हा एकमेव देश आहे जिथे राज्यनिहाय खाद्य पदार्थ बदलत जातात. तसेच शाकाहारी आणि मांसाहारी स्वरूपात खाद्य पदार्थांची सर्वात जास्त विविधता फक्त भारत देशातच बघायला मिळते. देशाच्या उत्तरेत गेलात तर आलू पराठा आणि छोले-भटूरे, दक्षिणेत गेलात तर उत्तप्पा/डोसा/इडली/वडा सांबर, पश्चिमेला गेलात तर ढोकळा आणि फापडा, आणि पूर्वेला गेलात तर बंगाली मिठाई. खाद्य पदार्थांची एवढी विविधता इतर देशात मिळत नाही. भारतीय मसाल्यांना तर अगदी इंग्रज काळापासून मागणी आहे. कोकणचा हापूस आंबा जगभरात अनेक देशात निर्यात केला जातो.
योगा : २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगा ही भारताने जगाला दिलेली एक उत्तम आरोग्यदायी भेट आहे. योगा म्हणजे शरीर आणि मन-स्वास्थ्य जपण्याचा व्यायामाचा एक प्रकार. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आधुनिक वैद्यक शास्त्राचा लवलेशही नव्हता, तेव्हा भारतीय ऋषी मुनींनी मन आणि शरीर स्वास्थ्य जपण्यासाठी योगशास्त्र विकसित केले. दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी भारत देशात विकसित झालेले योगशास्त्र हळूहळू आता इतरही देश आत्मसात करताना दिसत आहेत.
पंचांग : जेव्हा जगात आधुनिक खगोलशास्त्र विकसित झाले नव्हते तेव्हा प्राचीन भारतात पंचांगाच्या रूपाने ग्रहमान आणि ग्रहणाची स्थिती ओळखली जायची. पंचांग हे शास्त्र आहे की थोतांड याबद्दल आपल्या समाजात बरेच मतप्रवाह आहेत. मात्र पंचांगा नुसार एखाद्या सणाची तिथी आणि ऋतुचक्र यामध्ये कधीही चूक होताना दिसत नाही. आजच्या आधुनिक अवकाश संशोधन संस्था जी आकडे मोड करून ग्रहणाची तारीख आणि वेळ शोधून काढतात, तीच अचूकता पंचांगा मध्ये देखील सापडते.
आयुर्वेद : प्राचीन भारतात ऋषी मुनींनी विकसित केलेले वैद्यक शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये अगदी साध्या आजारापासून ते मोठ्या आजारावर मात करण्यासाठी, नैसर्गिक साधनांचा वापर करण्याचे वैद्यकीय उपाय सुचवले आहेत. यातील बरेचसे वैद्यकीय उपाय हे अगदी घरी सुद्धा करण्यासारखे आहेत. बदलत्या वातावरणा नुसार शरीर स्वास्थ्य कसे जपायचे यासाठी आयुर्वेदात बरेच घरगुती उपाय सुचवले आहेत. आयुर्वेद आणि योगाचे पालन हे व्यक्तीला दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळवून देण्यास मदत करते. एके काळी भारत देशापर्यंत मर्यादित असलेले आयुर्वेदाचे ज्ञान आता इतर देशांनिही आत्मसात करायला सुरुवात केली आहे.
मिशन मंगळ आणि इस्रो : आपण सर्वांनी मिशन मंगल हा चित्रपट बघितलाच असेल. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो ने यशस्वी केलेल्या मंगळ ग्रहाच्या मोहिमेवर हा चित्रपट आधारित आहे. भारत हा एकमेव देश आहे ज्याने पहिल्याच प्रयत्नात मिशन मंगळ यशस्वी करून दाखवले. अगदी अमेरिका सारखा विकसित देश देखील पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाला नव्हता. विशेष म्हणजे ही जगातील सर्वात कमी खर्चात यशस्वी पार पाडलेली मोहीम होती. तसेच इस्रो ही अवकाश संशोधन संस्था आज आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील प्रसिद्ध आहे. ही संस्था इतर देशांचे उपग्रह देखील अंतराळात सोडण्यास मदत करते. विविध देशांचे मिळून १०५ उपग्रह एकदाच अवकाशात पाठवण्याचा भीम पराक्रम देखील इस्रो या संस्थेच्या नावावर आहे.
खेळ : खेळाच्या बाबतीत भारत देशाची प्रगती ही अजूनही जेमतेमच आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये विविध क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू नक्कीच चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर असेही काही खेळ आहेत जे मूलतः भारतात विकसित झालेले आहेत. कब्बडी हा भारतीय खेळ आहे जो आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. मातीतील कुस्ती हा देखील भारतीय खेळ आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ मॅट कुस्तीच्या स्वरूपात खेळला जातो. कराटेच्या मार्शल आर्ट प्रकाराचा उगम देखील भारतातच झाला आहे. ऑलम्पिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या तिरंदाजी या खेळाचा उल्लेख अगदी महाभारत आणि रामायणात देखील सापडतो.
शिक्षण : गणित हा बहुतांश भारतीयांचा आवडता विषय. रामानुजन हे प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ होते. याच अंकाच्या आकडे-मोडीतील “शून्याचा” शोध हा भारतात लागला. असे म्हणतात की आर्यभट्ट ऋषींनी जगाला “शून्य” मिळवून दिला. तसेच भारत प्राचीन काळातही शिक्षणाच्या बाबतीत बराच प्रगत होता. प्राचीन भारतातील तक्षशिला हे विविध अभ्यासक्रम शिकवले जाणारे जगातील पहिले विद्यापीठ मानले जाते. आजच्या काळात शिक्षण क्षेत्रातील भारताचे स्थान बघायचे झाले तर, जगात सर्वात जास्त इंजिनियरची निर्मिती ही भारतात होते. आयआयटी आणि आयआयएम सारख्या उच्च दर्जाच्या भारतीय संस्थां आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रसिद्ध आहेत.
राजकारण : राजकारण म्हणजे डावपेच आखण्याचे क्षेत्र. चक्रव्यूह रचून विरोधकाला कोंडीत पकडण्याचा डाव म्हणजे राजकारण. शत्रूचा पराभव केल्याशिवाय शेंडीची गाठ सोडणार नाही अशी शपथ घेणाऱ्या चाणक्यचा जन्म भारत देशा मध्ये झाला. शेकडो वर्षां नंतरही राजकारणातील आदर्श निती म्हणून चाणक्य निती कडे बघितले जाते. चाणक्य निती ही फक्त भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी सर्व श्रेष्ठ निती समजली जाते.
जुगाड : जुगाड हे काही एखादे तंत्रज्ञान नाहीये किंवा शिक्षणाचा प्रकार देखील नाहीये. मात्र जुगाड हा शब्द जगाच्या पाठीवर फक्त भारतातच वापरला जातो. टाकाऊ मधून टिकाऊ निर्माण करणे म्हणजे जुगाड. ज्या समस्यावर विचारांची क्षमता संपते तिथे अनुभवाच्या जोरावर अनपेक्षित पर्याय उपलब्ध करून देणे म्हणजे जुगाड. सोशल मीडियावर आपण भारतीयांचे जुगाडाचे अनेक प्रयोग बघतोत. जुगाड करून कठीण गोष्टींवर स्वस्त आणि टिकाऊ उत्तर शोधलेले दिसते. जुगाडच्या बाबतीत जगात कोणीच भारतीयांचा हाथ धरू शकत नाही हे एक वास्तववादी सत्य आहे.
खरंतर असे अनेक विषय आहेत जिथे भारतीयांनी खूप अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. अगदी धावता आढावा जरी घ्यायचा झाला तर काही उदाहरणे बघता येतील. माहिती आणि तंत्रज्ञानाचा रोजगार पुरवणारे बेंगलोर शहर हे जगातील दुसरी सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या जगातील सर्वात प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीचे कार्यकारी संचालक हे भारतीय आहेत. इंटरनेटचा अविष्कार समजल्या जाणाऱ्या हॉटमेलचा शोध एका भारतीयानेच लावलेला आहे. स्टील उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात पहिल्या तीन क्रमांकात येतो. कोरोना काळात भारताने विकसित केलेल्या लसी इतर देशातही वापरण्यात आल्या.
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा…..!
— राहूलकुमार गोपाळराव बोर्डे
Leave a Reply