
बर्लिनच्या भिंतीला पडून आज ३२ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त जर्मनीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ९ नोव्हेंबर १९८९ मध्येा पूर्व आणि पश्चिरम जर्मनीचे एकीकरण झाले. बर्लिनच्या मधोमध असलेली भिंत लोकांना पाडली.
दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या जर्मनीचे चार तुकडे करून ते चार जेत्यांनी आपसात वाटून घेतले. त्याचप्रमाणे राजधानी बर्लिनचेही झालेले चार तुकडे जेत्यांमध्ये वाटले गेले. त्यापकी पश्चिमेचे तीन तुकडे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सकडे आले, तर पूर्वेकडचा तुकडा रशियाच्या सोव्हिएत युनियनकडे आला.
पश्चिम बर्लिनमध्ये आर्थिक सुबत्ता, जीवनावश्यक वस्तूंची मुबलकता, व्यक्तिस्वातंत्र्य होते, तर त्याच्या उलट पूर्वेकडे डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती, वस्तूंची टंचाई आणि आकाशाला भिडलेले भाव, सरकारी जाच यामुळे १९४५ साली फाळणी झाल्यापासून पूर्वेकडचे लोक पश्चिमेकडे स्थलांतर करू लागले. १९४९ ते १९६१ या काळात पूर्वेकडचे २५ लक्ष विद्वान, बुद्धिजीवी, कुशल कारागीर पश्चिम बर्लिनमध्ये राहावयास गेले. या काळात पूर्व बर्लिनची लोकसंख्या वीस टक्क्यांनी घटल्यामुळे निकिता क्रुश्चेव्ह यांनी १३ ऑगस्ट १९६१ रोजी पश्चिम बर्लिनकडची सरहद्द बंद करून पूर्व आणि पश्चिम बर्लिनमध्ये एका दिवसात ४३ कि.मी. लांबीचे काटेरी तारांचे कुंपण घातले. त्यानंतर बाकी पश्चिम बर्लिनभोवती १५५ कि.मी. लांबीचे कुंपण घालून संपूर्ण कुंपणामध्ये ११६ वॉच टॉवर्स बांधले गेले.
पुढे पूर्व-पश्चिम बर्लिनमधील ४३ कि.मी. कुंपणाच्या दोन्ही बाजूंना ३.६ मीटर उंचीच्या दोन भिंती बांधण्यात आल्या. सवा मीटर रुंदीच्या या दोन भिंती मध्ये १०० मीटरचे अंतर होते. लोकांनी भिंती वरून पलीकडे जाऊ नये म्हणून वॉच टॉवर्समधल्या बंदुकधाऱ्या सैनिकांना भिंती वरून जाणाऱ्यांना गोळ्या घालायचे अधिकार होते, तारांच्या कुंपणात विद्युतप्रवाह सोडला होता. तरीही १९६१ ते १९८९ या काळात ५००० लोकांनी यशस्वी पलायन केले, तर त्या प्रयत्नात २०० जण मृत्युमुखी पडले.
पुढे सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर ९ नोव्हेंबर १९८९ रोजी पूर्व बर्लिन सरकारने पश्चिमेकडचा प्रवेश खुला केल्यावर दोन्ही बर्लिनवासीयांनी भिंतवर चढून नाचगाण्यांच्या जल्लोशात आपला आनंद व्यक्त करून ही बर्लिनची भिंत तोडूनफोडून टाकली.
Leave a Reply