नवीन लेखन...

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ४

The Wild-Life in America - Part 4

अमेरिकेतल्या आमच्या ग्रामीण/निमग्रामीण भागातल्या वास्तव्यात आणि पाळीव/वन्य प्राण्यांच्या सहवासात मला अनेकदा कुमाऊंच्या जीम कॉर्बेटची किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या भानु शिरधनकर, मारूती चितमपल्ली किंवा व्यंकटेश माडगुळकरांच्या वन्यप्राणी जीवनावरील लिखाणाची आठवण यायची. वाटायचं, एखादा शेतकरी अंगणात येऊन सांगू लागेल, “दादानु, डुकरांनी लई वात आणलाय. उसाची लई नासाडी चालवलीय पघा. सांजच्याला बांधावर बसुया बंदुक घेऊन. एखादा डुक्कर मारलात तर पोरं खुष होतील. सागुती खायाला नाही मिळाली लई दिसांत”. किंवा एखादा खेडूत धापा टाकत येईल आणि म्हणेल, “सायेब, सखा पाटलाच्या मळ्यात अस्सल जातिवंत जनावर निघालय म्हंत्यात. चार बाप्ये काठ्या, भाले घेऊन उभे ठाकलेयात. चला बिगी बिगी बंदुक घेऊन. अंधार पडायच्या आत बार टाकता आला तर बघा”.

आपलं मराठी मातीतलं किंवा भारतातलं वन्य प्राणीजीवन त्यामानाने फारच वैविध्यपूर्ण, रोमांचक आणि मौल्यवान आहे. त्यामानाने कमी वैविध्यपूर्ण परंतु मुबलक आणि संवर्धित अशा अमेरिकन वन्य प्राणीजीवनाबद्दल हे विवेचन.

अमेरिकेत हरणं फार. ‘व्हाईट टेल डीअर’ आणि ‘म्यूल डीअर’ या दोन प्रामुख्याने आढळणार्‍या आणि एकमेकांशी काहीसे साधर्म्य असणार्‍या जाती. यातील व्हाईट टेल डीअर हे कॅनडाच्या दक्षिणेपासून मध्य अमेरिकेच्या पश्चिमेकडील राज्यांतील रुख्या सुख्या माळरानांवर व वाळवंटी भागात अधिक दिसते. व्हाईट टेल डीअरचा शेपटीच्या खालचा पुठ्ठ्याचा भाग पांढरा असतो, आणि घाबरल्यावर किंवा धावताना ती शेपटी उभारून आणि आपला पांढरा पृष्ठभाग दाखवत सैरावैरा पळत सुटतात. ऑक्टोबर ते डिसेंबर हा त्यांचा माजावर येण्याचा काळ असतो. एप्रिल – मे मधे एक-दोन पिल्ले जन्मतात. त्यावेळी बर्फ वितळून जमीन हिरवी गार झालेली असते. माळरानं, शेतं, चराऊ कुरणं लुसलुशीत ताज्या गवताने भरून गेलेली असतात. दोन तीन माद्या आणि दोन तीन पिल्लांचे छोटे छोटे कळप अनेकदा दृष्टीस पडतात.

आज घडीला व्हाईट टेल डीअरची संख्या १४० ते २०० लाख (14 to 20 millions) असावी असा अंदाज आहे. अमेरिकेत बर्‍याचशा पूर्वेकडच्या राज्यांमधे ह्या हरणांच्या संख्येने कळस गाठला आहे आणि दिवसेंदिवस ती मनुष्यवस्तीच्या अधिकाधिक जवळ सरकू लागली आहेत. ग्रामीण-निमग्रामीण भागात, छोट्या छोट्या गावांमधे बरीचशी मनुष्यवस्ती ही शेतांत, माळरानांत, टेकड्यांच्या उतरणीवर, गच्च झाडी आणि शेतजमिनीच्या सीमारेषेवर अशी असते. त्यामुळे हरणांसाठी हा सारा परिसर म्हणजे जणू एक प्रचंड मोठं असं चराऊ कुरण असतं. हरणांनी रस्त्यावर येणं, घरांच्या पुढच्या मागच्या परसदारात चरत चरत येणं, घरांच्या बागांमधील फुलझाडं, पाले भाज्या यांची नासधूस करणं हे नित्याचंच. त्यामुळे शहरी माणसाला जसं हरणांचं अप्रूप वाटतं आणि हरणांकडे जसं तो एक निरुपद्रवी, प्रेमळ आणि देखणं जनावर म्हणून पहातो तसं गावाकडचा माणूस पहात नाही. त्याच्या दृष्टीने हरीण म्हणजे, रस्त्यांवर गाड्यांच्या पुढे कडमडून अपघात घडवणारं, शेतांची नासाडी करणारं, परसदारीच्या बागा उध्वस्त करणारं, असं एक उपद्रवी जनावर असतं.

हरणांचे नैसर्गिक भक्षक (predators) म्हणजे लांडगे, बॉब कॅट्स, माउंटन लायन्स आणि कायोटी. परंतु शहरी वातावरणाच्या (urbanization) आक्रमणापुढे या भक्षकांचा प्रभाव कमी होत चालला आहे. याचा परिणाम हरिणांची संख्या बेसुमार वाढण्यामधे झाला आहे. त्यामुळे हरिणांची संख्या काबूत ठेवण्याचा एक मार्ग म्हणून हरणांची शिकार कायदेशीर करण्यात आली आहे. पण सारा प्रकार अगदी पद्धतशीर आणि कायदेकानुनानुसार चालणारा. प्रत्येक राज्याचे ‘वन आणि वन्यप्राणी विभाग’ (Park and wildlife department) किंवा ‘मासे आणि वन्यप्राणी विभाग’ (Fish and game department) शिकारीचा काळ ठरवून देते. तेवढ्या त्या ठरावीक काळामधेच फक्त शिकारीची परवानगी असते. प्रत्येक शिकार्‍याला दरवर्षीच्या शिकारीच्या सीझनसाठी परमीट घ्यावे लागते. त्यात देखील प्रत्येक प्रकारच्या बंदुकीच्या (मझल लोडर, शॉट गन, डबल बॅरल वगैरे) तसेच धनुष्यबाणाने करण्याच्या शिकारीचा ठरवून दिलेला कालावधी वेगवेगळा.

धनुष्यबाणाने शिकार करणारे म्हणजे शौकीन लोक; बाकी बहुतेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका वापरणारे. प्रत्येकाने किती हरणं मारायची याच्यावर बंधन. शिंगाड्या नरांची शिकार म्हणजे मोठी मानाची. त्यांच्या शिंगांच्या टोकांवरून (८ टोकं, १२ टोकं वगैरे) शिकारीची प्रत ‘उंचावणार’. जानेवारी फेब्रुवारीच्या सुमारास नरांची शिंग गळून पडतात आणि दुरून नर मादी मधला फरक ओळखणं कठीण होतं. मे जूनमधे शिंग पुन्हा उगवायला लागतात. बहुतेक राज्यांमधे प्रत्येक शिकार्‍यास एकाच शिंगांड्या नराची शिकार करता येते. माद्या मात्र दोन-तीन मारता येतात. प्रत्येक ठिकाणचे नियम देखील निराळे. कुठे शिकारी कुत्र्यांचा वापर करण्यावर बंदी, तर कुठे विजेरीचा प्रकाश टाकून जनावरांचे डोळे दिपवून त्यांची शिकार करण्यावर बंदी. बर्‍याच ठिकाणी, सूर्योदयापूर्वी अर्ध्या तासापासून सूर्यास्तानंतर अर्धा तासापर्यंतच, शिकारीचा खेळ खेळण्याची परवानगी असते.

क्रमशः …. 

— डॉ. संजीव चौबळ 

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..